सोमवार, २२ फेब्रुवारी, २०२१

• वाळूक •

वाळूक.

    मराठवाड्यात, त्यातही परभणी जिल्ह्यात राहून नंतर इतर शहरात स्थायीक झालेली माणसं या वाळकाला खरोखरच फार मीस करतात....
  म्हणूनच शेतातील वाळकं आली आहेत, पाठवू का?असे विचारण्यात आले मला, आणि मी पटकन हो पाठव ना, तुला शक्य होतील तेवढे पाठव...असं लगेच उत्तर पाठवलं...
  खरं तर वाळकं घरी पोहोंचे पर्यंत त्यापासून काय काय पदार्थ बनवायचे?याच्या रेसिपीज मनात तयार झाल्या सुध्दा.....
   अहाहा!वाळकाचं थालीपीठ, धपाटे,लोणचं, एवढेच नाही तर भरडा भाजी, वरण असे साधेसेच पदार्थ पण कल्पनेतून या सर्व खमंग पदार्थांची चव जीभेवर रेंगाळत राहिली...या वाळकांना ना मुळी एक अंगचाच खमंगपणा असतो....
   वाळूक, म्हणावे तर फळ, म्हणावे तर फळभाजी....
लहानपणी खेळता खेळता नारळासारखे फोडून, आम्ही सवंगड्यांनी तुकडा तुकडा वाटून मोठ्या चवीनं खाल्लेल्या आठवणी जाग्या झाल्या...थोडेसे अंबूस, थंड, काकडी,कलिंगड, खरबूज यांच्या पंक्तीत बसणारं अंडाकृती, पिवळे धमक, गोल्डन कलरचे!
बघता क्षणीच मोहक वाटणारे!
या वाळकाची गंमत म्हणजे हिरवेगार  कच्चे वाळूक जेवढे शूष्क दिसते तेवढेच ते कडवटही असते...
    पण पिवळेधमक तेवढेच आकर्षक ! पिकलेल्या आंब्यांचा दरवळ जसा सुटतो, तसाच पिकलेल्या वाळकांचा अंबूस दरवळ घरभर पसरतो....
   केवळ टाळकी (शाळु) ज्वारीच्या पीकात अधनं मधनं डोकावणारी वाळकाची वेली जमिनीवर जोंधळ्याच्या कणसांच्या पायाशी लोळण घेत,  आपल्या अंगाखांद्यावर ही वाळकं खेळवतात....
खरं म्हणजे ग्रामीण शेतकऱ्यांच्या लेखी या वाळकांची महती फक्त गाई, म्हशी बैलांपूढे त्यांचं खाद्य म्हणून टाकण्या ईतपतच...
एकदा असाच त्यांच्याशी बोलताना वाळकाचा विषय निघाला आणि एकजण उद्गारला,"हो,आम्ही जनावारांना खाऊ घालण्यासाठी टाकत होतो वाळकाचं बी शेतात,पण त्यांना खाण्यासाठी उंदीर फार धुमाकूळ घालतात...मग सोडून दिलं टाकणंच"...
 पण खरंच जेथे सहज उपलब्ध होत नाही, पण लहानपणापासून ज्यांच्या जीभेवर त्याच्या चवीने गारूड केलेले असेल तर, अशी माणसं जगाच्या पाठीवर कुठेही असा, बरोबर सिझनमध्ये या वाळकांची आठवण होत ती नजरेसमोर तरळत रहातातच...
   बीयाही वाया जात नाहीत या फळाच्या...त्या उन्हात वाळवून त्याची मिक्सरमधे चटणी करावी... काय चवदार लागते म्हणून सांगू!ही आयडिया माझ्या सासूबाईंनी सांगून ठेवलेली मला...
त्या नाहीत आता पण आठवणी मनात घर करून आहेत ना!
  सामान्यपणे शहरात उपलब्ध होत नाही ना हे फळ...असेल तरीही फार महाग आणि अर्धा किंवा एक किलोत एकच बसेल असं वजनदार फळ हे! महिनाभर तरी टिकतेच...खरं म्हणजे हुरडा पार्टी बरोबर या वाळकाच्या थालीपीठांचीही पार्टी झालीच पाहिजे असं आपलं अस्तित्व टिकवणारं हे फळ!
आता मात्र बस करते हं हे वाळूक पुराण!

©️नंदिनी देशपांडे. 

🌹🌹🌹🌹🌹

२ टिप्पण्या: