*चोचले जीभेचे*
*दहीभात*
©️नंदिनी म. देशपांडे.
__________________
जीवन करि जीवीत्वा
अन्न हे पूर्ण ब्रह्म
उदरभरण नोहे जाणीजे
यज्ञकर्म ।
वैशाख वणव्यात सुर्यदेव अगदि सकाळपासूनच आपल्या किरणांच्या माध्यमातून या धरतीवर यज्ञोत्सव साजरा करतात ना, त्यावेळी
आपल्या पोटपुजेची सोय मस्तपैकी थंडावा देणाऱ्या एखाद्या पदार्थानं झाली तर किती छान ना!
चला तर मग आपण आपली हा क्षुधाग्नी आज मस्तपैकी रसरशीत दहीभातानं पूर्ण करुया!
ताजं ताजं लावलेलं गोडसं पण गारेगार अशा भरपूर दह्यामध्ये ताजाच शिजवलेला पण गार झालेला भात,त्यात चवीपुरते मीठ,साखर,कोथिंबीर घालून छानसं एकजीव कालवून त्यावर गार झालेली तुपजिऱ्याची फोडणी आणि त्यासोबत दोन तळलेल्या मसाला मिरची किंवा साधी सुकी मिरची....व्वा काय बिशाद आहे या मुखरसाची चव जाण्याची!
असा गार गार भात पोटात पडल्यावर काय पोटातून मिळणारा गारवा कोणत्याही कोल्ड ड्रिंक पेक्षाही तहान आणि भूक दोन्हीही शमवणाराच!
दक्षिणेमध्ये तर सकाळी नश्त्याला खावयाचा असेल दहीभात तर,भातातच रात्री दुधाचं विरजण लावतात म्हणे...आणि तो तसा एकजीव झालेला खातात त्यावर बारीक कापलेला कच्चा कांदा घालून असं ऐकण्यात आलंयं...
खूप जण शिळा भात दह्यात मिसळून हा दहीभात करतात...कधी कधी याला थोडेसे मेतकूटही लावतात....
महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृतीमध्ये जेवणात शेवटी थोडासा तरी दहीभात खाल्ल्याशिवाय जेवणाला पुर्णत्व येतच नाही,अशी रीत आहे...
थोडक्यात तुम्ही दहीभात कसाही बनवला तरीही चवीनं वेगवेगळा लागत असेल तरीही प्रत्येकाच्या आवडीचाच असेल हे मात्र नक्की!
🌹🌹🌹🌹🌹🌹
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा