मंगळवार, ७ एप्रिल, २०२०

करोना कर्फ्यूच्या करामती.

कोरोना कर्फ्यूतील करामती....

    त्या दिवशी संपूर्ण शहर बंद होते, कोरोनामूळे.... आणिक काय गंमत, खरोखर व्यापाऱ्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच असे वाटत राहिले...एखाद्या वाईट गोष्टींसाठी निषेध म्हणून पाळलेला बंद एवढा यशस्वी होत नाही,तेवढा ह्या करोनाच्या निषेधासाठी झाला होता....
    लागोलाग दुसरे दिवशी जनता कर्फ्यू आणि लॉकडाऊन ची घोषणा झाली....सलग सुट्टी अनुभवायला मिळतीए....शाळांना तर सुट्टी आहेच....बरीच अॉफिसेसही बंद किंवा अंशतः चालू....पण सर्वत्रच फील आहे तो सुट्ट्यांचा! 
   
       या कर्फ्यू मूळे
   ‌‌ घरातील जेष्ठांना सर्वात मोठा आनंद झालायं....घरातील लहानथोर मंडळी सारीच एकाच छताखाली....मस्त घर भरुन वाटतंयं...गप्पांष्टकांच्या बैठकी होताहेत...त्यांना दिवसभराची अशी सोबत खूप आनंद देऊन जातेय....
    
     गप्पांच्या ओघात घरा्तील तरुणांची गुपितं उलगडली जाताएत....
तरुणांच्या गाली गुलाब फुलताएत....चिडवा चिडवी...रुसवे फुगवे अगदी न्हाऊन निघालंयं अख्खं घर अशा खेळकर वातावरणानं...

      निमित्त कसंही असू देत पण शिक्षणासाठी बाहेर मोठ्या शहरात रहाणारी, हॉस्टेलवर रहाणारी सारी तरुणाई आपापल्या घरी एकत्रितपणे रहाण्याचा आनंद उपभोगत आहेत...
      घराच्या भिंतीही प्रसन्न होऊन या अनुभवाला मोकळेपणानं दाद देताएत...
    घरातला दिवाणखाना दिवसभर खळखळून हसतो आहे...बैठ्या खेळांना उदा:पत्ते,कॅरम,बुध्दीबळ अशा प्रकारच्या खेळांना चांगले दिवस आले आहेत....त्यातच टीव्ही महाशय सुध्दा दिवसाचे बारा तास बोलत रहातात....त्यांना थोडीही उसंत म्हणून मिळत नाहीए...

      मुख्य म्हणजे घरातील मुलांना घरकामाची ओळख होतीए....
   आणि हो, घरातलं किचन तर  अगदी चैतन्यानं फुलून गेलंयं...
गम्मत म्हणजे घरातील तरुणाई स्वयंपाक करण्यात वेगवेगळे प्रयोग करण्यात गुंतत आहेत...त्यात जास्तीतजास्त नाविन्य आणण्याचा प्रयत्न होताहेत.....हॉटेलिंगला कांही दिवस तरी पूर्णविराम मिळालायं....घरच्या अन्नपदार्थांचा भाव बऱ्यापैकी वधारलायं... किंबहूना पारंपारिक पदार्थांच्या रेसिपीजची
देवाणघेवाण जोरदार गतीनं चालू आहे...त्या आमलात आणत फोटोंची(पदार्थांच्या)
पाठवापाठवी होऊन आपल्याला जमलंय तर... याचा आनंद चेहऱ्यांवर मावेल का?अशी शंका उत्पन्न होतीए.... पारंपारिक पदार्थांची चव चाखत चाखत मिटक्या मारत खाणं काय असतं हे लहान थोर मंडळींना समजू लागलंय....
    
     घरातील पुरुष मंडळी अगदी पडेल ते काम करण्याची तयारी दाखवतेयं....घर सांभाळणं हे किती कठिण काम आहे,याची प्रचिती ते अनुभवत आहेत....आपल्या गृहलक्ष्मीचे कौतुक त्यांच्या मनात कायम घर करुन बसलंयं....
संसाररथाची दोन्हीही चाकं सक्षम असावयासच हवीत याचं महत्व त्यांना पटलंयं....
घरातील साऱ्यानाच 'काटकसर कशी करावयाची असते'? याचं प्रात्यक्षिक परिस्थाती शिकवत आहे....कारण संपलेलं आणण्यासाठी बाहेर जाणं टाळायचं आहे....हे प्रत्येकाला उमगलंयं...

    सर्वांत मोठ्ठा सकारात्मक बदल झालाय तो,महिलावर्गाच्या मानसिकते मध्ये....
एरवी घरकामाचा बाईंनी सुट्टी मागितली तर 'का कू' करत सुट्टी देणारी ही महिला स्वतःहोऊन कामवाल्या बाईंना,"तू सुट्टीवर जा",असं सुचवत आहेत...अर्थातच घरातलं सारं काम ईतर सदस्यांच्या मदतीनं पूर्ण करत कपडे, भांडी अगदी झाडू फरशीही याची कामंही या महिला लिलया हाताळत आहेत....मुख्य म्हणजे त्यांचा, "आपण हे काम पूर्ण आणि व्यवस्थित करु शकतो"या बाबतचा आत्मविश्र्वास प्रचंड वाढला आहे...'मी एक यशस्वी गृहिणी आहे' हे सिध्द केलंयं हा फील त्यांच्या मनात आनंदाच्या उकळ्या काढत आहे....
उलट नेहमी पेक्षा लवकरच आटोपतंयं काम... शिवाय बायकांची वाट बघणं नको की त्यांची आदळ आपट नको.....त्यांच्या वेळांचं बंधन पाळणं नको.....या गोष्टींचं महिला वर्गाच्या डोक्यावरचं ओझंचं कमी झालयं एकदम....म्हणून महिला वर्ग सध्या तरी हूश हूश न करता खूष खूष आहेत....

     सर्वांनाच नेहमीच्या वागण्यातील औपचारिक पणा झटकून मनाला वाटेल तसं वागण्याची थोडीफार संधी मिळाली आहे....कारण बाहेरचं कोणी येणार नाही हे सर्वच जण जाणून आहेत....
स्वावलंबनाचे धडेही घराघरातून गिरवले जात आहेत....
    अजिबात बाहेर न पडता घरात रहाण्याचं सुख सर्वांनाच भावतंय हे मात्र खरं...नको ती गर्दी,नको प्रदुषण,नको घाई घाई आणि नको तो दिवसभर बाहेर घालवून घरी प्रवेशताच आलेला थकवा...
आयुष्यात निसर्गानं म्हणा किंवा नियतीनं, आणलेला हा टप्पा सारेच जण मस्त एन्जॉय करताहेत अगदी, अबालवृध्दांपर्यंत...
ही सारी करोना कर्फ्यूचीच करामत नव्हे काय?
    लुटा तर मग या सुट्टीची मज्जा!घरातच राहून,सुरक्षित अंतर ठेवून पण खेळीमेळीनं....आपली आणि कुटुंबाची काळजी घेऊन....😊🙏🏻 

नंदिनी म.देशपांडे.

🌹🌹🌹🌹🌹🌹

‌.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा