रविवार, १२ जानेवारी, २०२०

संकल्पांची ऐशीतैशी...

*संकल्पांची ऐशीतैशी*

     "नाही नाही,आता मात्र एक जानेवारी,नवीन वर्षारंभा पासून, मी दररोज जाणारच मॉर्निंग वॉक ला...."
बेमालूमपणे ही भिष्म प्रतिज्ञा वाटावी इतपत निग्रहाने झाली ही घोषणा....
अर्थातच आमच्या कडूनच....
"गर्जेल तो बरसेल काय",या उक्ती प्रमाणे "घोषणा करेल तर फोलपणा ठरेल", अशी एक नवी उक्ती आपण निर्माण केलीय....याचा मनस्वी आनंद मात्र वर्षारंभाच्या पहिल्याच दिवशी मिळाला.....कांही तरी 'क्रिएटिव्ह'केल्याचा आनंद....मनात उकळी काढून गेला....
संकल्प पहाल्याच दिवशी मोडित निघाला आहे हे वास्तव पचवण्याच्या आपल्यावरच्याच रागावर (उक्तीच्या) नवनिर्मितीच्या आनंदानं मात केली....
केवढी थंडी पडलीए सध्या!छान मऊ मऊ दुलई,त्याला आतून आईची कॉटनची उबदार स्पर्शाची साडी जोडलेली...जणू आई आपल्या बाळाला (?) मोठ्या प्रेमानं पांघरुण घालत झोपी घालते आहे....
अशा आविर्भावात
सकाळची लागलेली साखरझोप गुलाबी थंडीत मोडून काढणं केवळ अशक्यच!
याच्या पुढे कसचा संकल्प नि कसचे काय!....एवढ्या छान थंडीत मिळणाऱ्या उबदार झोपेच्या आनंदावर कोण पाणी सोडेल?....
त्याच क्षणाला सायंकाळी फिरावयास जाण्याचा संकल्प सोडला गेला.अर्थातच आमच्याच कडून....तो पुर्वापार चालत आल्यामूळे, थोडा तरी तडिस जातोय....असे वाटण्या ईतपत,मजल दरमजल करत अधनं मधनं सिध्दीस जातोय तो,याचे मिळणारे समाधान किलोभर वजन मात्र वाढवून जातंयं....ही जाणीव करून देण्यासाठी,की नवसंकल्पाचा फज्जा उडालाय....हा तरी चालू राहू दे....
कधी कधी घरच्या घरी योगा करत दररोज एक तास व्यायाम करायचा!असाही संकल्प मनातल्या मनात सोडला जातो.... 
या महिन्यात सुरुवातीच्या पंधरा दिवसांत कितीही सोडले संकल्प,तरीही ते नवीन वर्षातीलच असतात....(ही माझ्या भाबड्या मनाची कल्पना!)खूप छान पध्दतीनं करता येत असतील तरीही त्यात सातत्य टिकून राहिले तर शपथ!आज काय, बाहेर जायचे....उद्या काय अमक्याच्या बर्थ डे पार्टीला....परवा तर शॉपिंग ला त्यानंतरच्या दिवशी रिसेप्शन....असे करत करत अख्खा आठवडा गेला तरीही योगाचे 'योग' काही केल्याअजूनही जुळून येत नाहीएत....
नाही म्हणायला डिंकाचे लाडू नियमीतपणे खाण्याचा संकल्प,आणखी तरी तग धरुन आहे....तो मात्र आपली वेळही चुकवत नाही....बरोबर वेळेला आठवण करुन देण्याचे काम प्रामाणिकपणे मुखरसा करवी केलेच जाते....
तेवढं पौष्टिक गेलंच पाहिजे पोटात!त्या शिवाय शरीराचा स्टॅमिना कसा टिकेल?आता या वयात शक्ती कशी येणार?जणू काही अर्धी लाकडं.... ठिकाणी गेल्याच्या अभिनीवेषात माझंच मनंच सांगत रहात गुपचूप पणे... 
अजूनही पंधरा दिवस संपायला चार दिवस बाकी आहेत....आणखी किती संकल्पांची घोषणा होईल,त्यातील किती तडिस जातील,आणि कितींची ऐशीतैशी होईल ते हे चार दिवसच सांगतील....
बघू या....काय होते ते....
पुर्णत्वास गेलेच हे संकल्प तर पुढच्या वर्षीच्या नवीन संकल्पांची घोषणा करताना सांगीनच नक्की....तो पर्यंत नववर्षाच्या,नवसंकल्पांच्या योजनेसाठी,त्यांच्या पुर्ततेसाठी तुम्हा सर्वांना शुभेच्छा...💐💐

©
*नंदिनी म.देशपांडे*

🌹🌹🌹🌹🌹

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा