गुरुवार, ३० जानेवारी, २०२०

सैर गुजरात राज्याची.

*सैर गुजरात     
        राज्याची*

♦ *अहमदाबाद*

‌‌   "परमार्थातून पर्यटन," हे ब्रीद समोर ठेवत गेल्या वर्षी आम्ही, आपल्या भारतातील तीर्थ स्थानं आणि त्या त्या राज्यांच्या परिसरात असणारी ईतर पर्यटन स्थळं,तेथील निसर्ग सौंदर्य व त्या ठिकाणची संस्कृती चालीरीती या गोष्टांची ओळख करुन घेण्यासाठी पर्यटन यात्रेला सुरुवात केली.

‌ ‌‌ उत्तरांचल मधील चारधाम यात्रा यशस्वीपणे पूर्ण करुन आल्यामूळे, इतर पठारी प्रदेशातील पर्यटन फारच सोप्प आहे.असं वाटू लगलं होतं.
  उत्तरेतला बद्रीनाथ केदारनाथ बघितल्या नंतर साहजिकच पश्चिमे चा "व्दारकेश"आम्हाला त्याच्याकडे यावयास खूणावत होता.

   दसरा आणि दिवाळी यांच्या मधल्या काळातील गुलाबी थंडीमध्ये,आकाशात शरदाच्या चांदण्यांची शिंपण घातलेली असताना, आम्ही व्दारकेशाच्या भुमीवर पाऊल ठेवण्याचं निश्र्चित केलं.
   गुजरात मध्ये प्रवेश करताना अहमदाबाद ला विसरुन चालणारं नव्हतंच...
    
     ठरल्या प्रमाणेअहमदाबादच्या एअरपोर्ट वर तीन्ही सांजा टळत असताना आम्ही प्रवेश केला.
"सरदार वल्लभभाई पटेल एअरपोर्ट." टापटीप असणारे, ठिकठिकाणी गुजरातच्या भुमीचे सुपुत्र म.गांधीआणि वल्लभभाई पटेल यांच्या छायाचित्रांवरुन इतिहासातील प्रसंगांची साक्ष देत होते.अधनं मधनं आपल्या भुमीतील ऐतिहासिक वास्तूंच्या, कोरीव नक्षीकामाचे नमूने वॉल पेपरवर झळकवत,अगदी ‌खरे वाटावेत ईतपत डोळ्यांचे पारणे फेडत होते.
स्वच्छ भारत अभियानाचा पुरस्कार करणाऱ्या घोषणा, ठिकठिकाणी मान उंचावत प्रवाशांना स्मित करताना दिसत होत्या.
तेथील जमेल तेवढी वैशिष्ट्यं डोळ्यांनी पित पित आम्ही आमच्या कॅब मधून हॉटेलच्या मुक्कामी पोहोंचलो.

   जेवणाच्या वेळी पोटात कावळ्यांची कावकाव झाली.तेथेच जेवणाचा आस्वाद घेऊन सकाळी ' हेरिटेज वॉक'घ्यायचा आहे हे मनाशी ठरवूनच झोपेच्या आधिन झालो...

"हेरिटेज वॉक".या भारदस्त शब्दांत खूप कांही दडलेलं असेल असा आमचा अंदाज होता.ही सारी ठिकाणं जवळ जवळ आहेत, आणि पायी दोन तासांत बघून होतील, असं सांगण्यात आलेलं.त्यासाठी स्पेशल गाईड लागेल,ह्या सर्व ऐतिहासिक स्थळांची माहिती गाईड कडून घ्यावयास माणसी रु.दोन हजार दोनशे खर्च येईल,असे सांगण्यात आले आम्हाला.पण हा म्हणजे पर्यटकांकडून निव्वळ पैसे उकळण्याचा मार्ग आहे. हे आमच्या वेळीच लक्षात आलं.अव्वाच्या सव्वा रक्कम उकळण्याची ही व्यपारी वृत्ती खरोखरच चीड आणणारी होती.
शेवटी एका भल्या माणसाने अम्हाला बाहेर येऊन सल्ला दिला,"तुम्ही अॅटो रिक्षा ठरवा...दोन तीनशे रुपयांत ही सारी ठिकाणं माहितीसह तुम्हाला दाखवून पुन्हा तुमच्या गाडीजवळ आणून सोडण्यात येईल...हो, कराण,मोठी गाडी जुन्या शहरातून फिरवणं अशक्यच होतं.

  प्रसिध्द ऐतिहासिक स्थळं बघण्यासाठीचा, त्यांचा इतिहास जाणून घेण्यासंबंधीचा हा वॉक होता.अर्थात ही सर्वच ठाकाणं जुन्या शहरात,अगदी वस्तीमध्येच,किंबहूणा गल्लीबोळतच होती.बऱ्याच ऐतिहासिक ईमारतींचे अवशेष खिळखिळे झाले होते.कांही ऐतिहासिक ठेवा म्हणून जाणीव पूर्वक जोपासली होती, तर कांहींच्या छताखाली कुटुंब आसऱ्याला होती.त्यामूळे थोडी अस्वच्छता,गलिच्छपणा,सुध्दा वास्तव्यास होता तेथे.
   या ऐतिहासिक ठिकाणांत आम्ही, अहमदाबाद मध्ये असणारे प्राचीन दरवाजे,कांही मज्जिती,कांही मंदिरं,तर कांही चौक तसेच कांही जुन्या हवेल्या,जुने स्टॉक एक्सजेंज अॉफिस अशी बरीचशी ठिकाणं बघातली.
  थोडक्यात पहिल्या दिवशी जुने अहमदाबाद शहर बघून झाले.
एकूणच शहर बरेच मोठे वाटले.विमानतळावरुन शहरात येताना नवीन शहर रचना खूप नियोजनबध्द पध्दतीने झाली असावी,असे जाणवत होते.
   गुजरातच्या रस्त्यांची महती खूप ऐकून होतोच आम्ही.त्या रस्त्यांवरुन प्रत्यक्ष प्रवास करताना ही महती पुरेपूर पटली.
अगदी तरंगत प्रवास करत आहोत हा फिल येत होता.
    
    अहमदाबाद च्या दोन दिवसीय मुक्कामात,तेथून जवळच असणाऱ्या राजधानीच्या शहराला,गांधीनगरला आम्ही भेट दिली...
गुजरात विधानसभेचं कामकाज तेथूनच चालतं.शिवाय राजधानीचं शहर म्हणून भरपूर सुनियोजित पध्दतीनं,नव्यानं उभारणी केली आहे असं वाटत होतं.महत्वाची कार्यालंयं तेथेच होती.
गांधीनगरला गांधी आश्रम बघण्यात आला.महात्मा गांधी आणि कस्तुरबा गांधी यांच्या वास्तव्याचं हे ठिकाण.आश्रम म्हणजे त्यांचं रहातं घरच ते.किती तरी ऐतिहासिक घटनांचं साक्षिदार असणारं.या ऐतिहासिक घटनांचं,गांधीजी आणि कस्तुरबा यांच्या जीवनावर प्रकाश टाकणाऱ्या असंख्य घटनांच्या छायाचित्रांचं जणू प्रदर्शनच होतं हे. खूप चांगल्याप्रकारे ह्या वास्तूचे जतन करुन ठेवल्याचे बघता क्षणीच लक्षात येत होतं.

   शहराला साबरमती नदीने पूर्ण वेढा दिलाय असे चित्र दिसत होते.म्हणूनच गांधी आश्रमाला,'साबरमती आश्रम' असेही म्हटले जातं.
   कृष्ण सखयाच्या अस्तित्वाच्या खूणाही आपल्या तेजाची प्रभावळ दाखवत होत्याच.रस्त्यात असणाऱ्या राधा-माधवाचं देखणं मंदिर बघावयास मिळालं.

   आता आम्ही निघालो होतो,अदालज स्टेपवेल किंवा "अदालज नि वॉव" हे ठिकाण ‌बघण्यासाठी.
    गुजरात मध्ये इंडो इस्लामिक स्थापत्यकलेचा उत्कृष्ट मिलाफ साधलेला आपल्याला दिसून येतो.हेमाडपंथी मंदिरं किंवा ऐतिहासिक ठिकाणांवर भौमितिक पध्दतीने पण अतिशय बारीक सारीक नजाकतीतून त्यावर नक्षीचे कोरीवकाम अप्रतीम असेच आहे.
अदालज स्टेपवेल ही नावाप्रमाणेच पायऱ्या पायऱ्यांच्या रचनेने बांधलेली एक सुंदर ईमारतवजा विहिर आहे.ही विहिर हिंदू राणी रुपबा हिनं,शेजारच्या मुस्लीम राजाची म्हणजे,राजा मेहबूब बेगड याच्या मदतीने आपला पती,राजा वीर सींग याच्या स्मरणार्थ बांधलेली अशी उत्कृष्ट स्थापत्य कलेचं एक सुंदर उदाहरण होय.पाच मजल्यांच्या स्वरुपात बांधलेल्या या भव्य विहारीला तळाशी उतरण्यासाठी रुंद पायऱ्या व प्रत्येक मजल्याला स्वतंत्र प्लॅटफॉर्मस् आहेत. प्रत्येक खांबावर अतिशय सुबक अशी नक्षी बनवलेली दिसून येते.अप्रतीम वास्तूकलेचा नमुना म्हणता येईल असेच हे ठिकाण आहे.
   तेथून आम्ही अक्षरधाम मंदिराकडे कूच केली.नव्यानंच बांधल्या गेलेल्या मंदिराचं बांधकाम अजूनही चालू असल्याच्या खूणा दिसत होत्या पण तेथील मुख्य आकर्षण होतं ते,तेथे दाखवला जाणारा,सत् चिदानंद साऊंड आणि लाईट शोचं.कोजागारी पौर्णिमेच्या चंद्राच्या साक्षीने,किंचित झोंबणाऱ्या गारव्यात आम्ही या अप्रतीम शो चा आनंद घेतला आणि या मंदिराच्या,सत्पुरुषाच्या कार्याविषयी जाणून घेतलं. परतीच्या वाटेवर चवीष्ट गुजराती थालीचा मधूर बांसुंदीसह साऱ्या पक्वान्नांचा यथेच्छ आस्वाद घेतला.

    दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्ता आटोपून,गुजरातच्या उत्तरेकडे सिध्दपूर साठी प्रयाण केले.रस्ते एवढे गुळगुळीत की,जणू आपण हवेवर सैर करत आहोत. खूप रुंद रस्ते,वाहतूकही खूप कांही गर्दीची नाही त्यामूळे प्रवास खूपच सुखावह होत होता.
सिध्दपूर या गावी मूळचे येथील रहिवासी असणारे पण आता बरेचसे गल्फ कंट्रीज मध्ये स्थायिक झालेल्या बोहरा समाजाची ठराविक साचेबध्द घरं,हवेल्या बघितल्या.लाकडी कलाकुसरीने सजलेली ही घरं एकसारखी अशी एखाद्या चाळीसारखी भासत होती...त्यांचे असणारे ऐश्वर्य या घरांमधून डोकावत असल्याचा भास मात्र होत होता.
   त्यानंतर असणारं आमचं आकर्षण होतं ते",रानी की वाव",पाटण स्टेपवेल.
तेथे जाताना रस्त्यात मातृतीर्थ मंदिरात दर्शन घेतलं.त्याच प्रमाणे गुजरातची ओळख असणाऱ्या "पटोला", या आकर्षक डिझाईन ने तयार होणाऱ्या प्यूवर सिल्क हातमाग  केंद्राला.भेट दिली.अत्यंत सुंदर आणि नाजूक,विविध आकर्षक रंगसंगतीनं बनवलेल्या,बनत असलेल्या साड्यांचे नमुने आम्ही डोळे भरुन बघितले.कारण त्यांच्या किंमती आमच्या सारख्या सामान्य माणसांच्या अवाक्याबाहेरच्या होत्या.सहज म्हणून डोक्याला बांधण्याच्या स्कार्फ ची किंमत विचारली,आणि पंचेवीस हजाराचा आकडा ऐकून चक्रावल्या सारखंच झालं.
रेशिम किड्यांनी बनवलेल्या रेशमाच्या धाग्यांनी आणि अथक् मेहनतीनं बनवलेल्या वस्त्राची किंमत अशी असणे सहाजिकच आहे.
राणी की वाव!हा आणखीन एक अप्रतीम वास्तूकलेचा, नाजूक नक्षींनी बनलेला विहिरीचा नमुना.पाटण या गवात असणारी गुजरात मधील एक सौंदर्यानं नटलेली ही वास्तूकला!
ही विहिरही राणी उदयमती हिनं अकराव्या शतकात,आपल्या राजाच्या,राजा भिमदेवच्या स्मरणार्थ बांधलेली आहे.यांच्या भिंतींवर अप्रतीम अशा हिंदूंच्या देवदेवतांच्या मूर्ती कोरलेल्या दिसून येतात.फारच रेखीव अशा या वास्तू वरचे नक्षीकाम मला पटोला साडीच्या पदरावर विणलेले आहे हे लगेच लक्षात आले.आणि "पाटण ची पटोला" ही ओळख पटकन समजली.

   एव्हाना,ह्या दोन विहिरी बघितल्यानंतर  आम्ही गुजरातच्या स्थापत्य कलेच्या आणि त्यावरील कलाकुसरीच्या नक्षीकामाच्या प्रेमात न पडलो असतो,तरच नवल होते! या दोन वास्तू नंतर कलेची खाण असणाऱ्या 'मोधेरा,सनटेम्पल,' म्हणजेच सुर्य मंदिराला आम्ही सुर्यास्ताच्या पुर्वार्धात भेट दिली.... अक्षरशः डोळे दिपवून टाकणारं असं हे गुजरातचं सौंदर्य वैभव,सुर्यास्ताच्या सोनेरी किरणांनी न्हाऊन निघत आणखीनच सुंदर दिसत होतं.
इ.स.१०२६-२७ मध्ये बांधलेल्या या वस्तूचे तीन स्वतंत्र भाग आहेत.श्राईन (तीर्थस्थान) हॉल,असेंब्ली हॉल(सभागृह) आणि रिझर्व्हायर(जलाशय).हे ते भव्य दिव्य तीन हॉल्स आहेत.
हॉल्सचे पिलर्स आणि छत अप्रतीम नक्षीकलेतून साकारलेली आहेत.उच्च पातळीवर बांधलेली ही दालनं उतरताना भरपूर पायऱ्या आहेत.
   आपल्या आवडत्या व्यक्तीच्या स्मरणार्थ बांधण्यात येणारी जलाशयांची ही कल्पना खरोखरच लोकोपयोगी व कौतुकास्पद आहे.तसेच अनुकरणीय सुध्दा आहेच.
    एकूणच या वास्तू बघून,त्या वेळच्या राज्यकर्त्यांच्या वैभवाचे व भव्यतेचे दर्शन घडल्याचा आनंद मिळतो.

©
नंदिनी म.देशपांडे
    औरंगाबाद.

⚛⚛⚛⚛⚛⚛

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा