शुक्रवार, १० मे, २०१९

पावा

कृष्णसखा तू
शामल घननीळ
वाजवितो बासरी
सूर बासरीचे
गोड मधुर ते
वेड जीवा लावती
प्राणाचेही कान करुनी
मज होईना तृप्ती
चिंब चिंब भिजावे
सुरात तुझिया
सांगे हा पावा
आळव रे तू प्रेमगीत
सखया अधिर ही राधा
राधेचे बावरणे तुजला
साद घाली मनरमणा
सवे तुझ्या रमण्याने मीही 
रंगूनी जावे तुझ्या संगती
आस असे ही जन्मांतरीची
व्हावे एकरुप इतके की
न रहावे माझे मी पणही
तू अन मी एक रहावे
दिसे ना वेगळेपण
मुर्ति असे कान्हाची
परी प्राण हा राधेचा
सुरात तुझिया
विरघळले मी
कोण कान्हा अन्
कोण राधा
कान्हा राधा
अस्तित्व एकच
एक श्वास अन् ध्यास एक तो भक्तिप्रेमाचा
अलौकिक हे प्रेम मनांचे
साधती अव्दैता
साधती अव्दैता....

© *नंदिनी*

🎼🎼🎼🎼🎼

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा