शुक्रवार, ११ सप्टेंबर, २०२६

*कोपेश्वर थोपेश्वर मंदिर*. खिद्रापूर. --ॲड.नंदिनी म.देशपांडे. (लेखिका) छ.संभाजीनगर.

*कोपेश्वर थोपेश्वर मंदिर*. 
खिद्रापूर. 

--ॲड.नंदिनी म.देशपांडे. 
(लेखिका) छ.संभाजीनगर. 

     'खिद्रापूर' हे आहे  मंदिर असणाऱ्या गावाचे नाव. 
खिद्राखान नावाचा सरदार होता.तो मोगलांशी लढताना मारला गेला (1702 )
त्यावरुन या गावाला खिद्रापूर हे नाव पडले...
या गावाचे मूळ नाव "कोप्पम" (कोपलेला )
असे होते पण नंतर ते मंदिराला देण्यातआले.आणि
"कोपेश्वर" ह्या नावाने हे महादेवाचे मंदिर ओळखले जाऊ लागले. 
     या मंदिराचं अगदीच वेगळेपण दाखवणारा फोटो बघण्यात आला आणि तेंव्हा पासूनच,  या मंदिराला प्रत्यक्ष भेट देणारच.हे मनात ठरवून टाकले होते मी...
त्या दृष्टिने माहिती मिळवली आणि समजले अरे हे तर आपल्याच महाराष्ट्रात आहे...कोल्हापूर पासून केवळ 60 कि.मी.अंतरावर...असे असूनही नावही ऐकण्यात आले नव्हते आत्तापर्यंत! 
   खिद्रापूर नाव या गावाचे...खरे म्हणजे, "कट्यार काळजात घुसली",या चित्रपटातील एका गाण्याचे चित्रीकरण या मंदिरात झाले आणि या मंदिराला प्रसिध्दी मिळण्याची दारं उघडली गेली...
   स्थापत्य कलेच्या अद्भुत आणि अप्रतीम नमुना! सौंदर्याने नटलेलं हे मंदिर डोळ्यात किती साठवून ठेवू?अशी अवस्था होती मनाची...
भव्यदिव्य आणि आपली वेगळी वैविध्यपूर्ण वैशिष्ट्ये जपणारं हे मंदिर प्रत्येक भारतीयाने आपल्या आयुष्यात एकदा तरी पहावेच असे आहे. 
    यातील प्रमुख वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे सांगता येतील.
     इसवीसनाच्या सातव्या शतकात मंदिर उभारणीला सुरुवात केली गेली होती. चालूक्य राजांनी केलेली ही सुरवात नंतर पुलकेशी  शीलाहार राजांनीही चालूच ठेवली. मंदिर बांधणीला पाचशे वर्षे खर्ची झाली आणि कारागीरांच्या सात पिढ्या या बांधणीसाठी झिजल्या!असे सांगितले जाते. एकूण 126 खांबांनी हे मंदिर पेललंयं...
स्वर्ग मंडपाला 48 खांब,आणि सभामंडप 26 खांबांवर ऊभा आहे..
दक्षिण दिशेला महादेवाची पिंड असणारं हे बहूतेक एकमेव मंदिर असावं. सामान्यपणे महादेवाच्या पिंडीसमोर नेहमीच नंदीची मूर्ती असते कारण नंदी हे महादेवांचे वाहन आहे. येथे आपल्याला नंदीच दिसत नाही...किंबहूणा तो येथे नाहीच.हाच नंदी 
कोपेश्वराच्या दिशेने तोंड करुन कर्नाटकात,हासन तालूक्यात "येडूर", या गावी आहे.तेथे केवळ नंदीचेच मंदिर बांधले आहे अशी माहिती मिळाली. 
      यामागची गाईड कडून सांगण्यात आलेल्या अख्यायिकेचे 
शब्दांकन थोडक्यात असे, 
   महादेवांची पहिली पत्नी, सती,दक्ष राजाने पुत्रकामेष्टी यज्ञ केला तरीही आपली मुलगी सती हिला आमंत्रण केले नाही.असे असतानाही
शंकराजवळ हट्ट करुन सती 
नंदीवरती स्वार होत ती यज्ञासाठी गेली होती. 
पण तेथे सतीचा अपमान झाला.तो अपमान सहन न झाल्याने तिने स्वतःला
यज्ञात झोकून देत आहूती दिली...
तेंव्हापासून ",सती जाण्याची" प्रथा पडली 
असे मानले जाते...
     शंकराला सतीच्या आहूतीची ही बातमी समजताच ते अतिशय कोपले. अती रागाने आपल्या जटा ते जमीनीवर आपटून आपटून आपला क्रोध व्यक्त करु लागले. म्हणूनच या मंदिराला "कोपेश्वर",
महादेव मंदिर असे नाव पडले...
क्रोधयुक्त महादेवांना शांत करण्यासाठी साक्षात विष्णू भगवान
तेथे अवतीर्ण झाले. महादेवांना थोपटत थोपटत विष्णूंनी त्यांना शांत केले... म्हणून शेजारीच असणाऱ्या विष्णूंच्या पिंडीला "थोपेश्वर",असे संबोधन मिळाले. 
कालांतराने त्याचा अपभ्रंश करत त्याला लोकांनी "धोपेश्वर", असे नामाभिधान केले...
    पण सतीची वाट बघत नंदी आजही खिद्रापूर च्या दिशेने तोंड करुन उभा आहे.
    सामान्यपणे शिव आणि विष्णू यांची स्वतंत्र पण एकत्रित प्रतिष्ठापना कुठेच दिसत नाही. आपण "हरिहराची"
म्हणजे शिवतत्व व विष्णूतत्व यांची एकत्र मुर्ति बर्‍याच ठिकाणी बघतो.पण पिंडीच्या रुपात ही दोन्ही तत्वे अगदी शेजारी शेजारी ऊभी दिसतात ती याच 
खिद्रापूर येथील कोपेश्वराच्या मंदिरात!
     या मंदिराच्या स्वर्गमंडपाचे छत हे पूर्णपणे उघडे म्हणजेच याचे गोलाकार अंबर हेच याचे छत होय!
हे फार महत्वाचे आणि सुंदर असे या मंदिराचे वेगळेपण आपल्या मनाला भुरळ पाडते...त्रिपूरी पौर्णिमेला या मंडपाच्या बरोबर मध्यावर संपूर्ण चंद्र येतो, त्यावेळी दिसणारा नजारा केवळ अवर्णनीयच असणार यात शंकाच नाही...
     त्याच प्रमाणे दरवर्षी पाच मे, या दिवशी गर्भगृहातील दोन्ही पिंडींवर रवीकिरणांचा अभिषेक होतो...तोही नजारा काय अप्रतिम दिसत असेल!
     मुखमंडप,सभापंडप,
(स्वर्गमंडप),आणि गर्भगृह अशा रचनेतून तयार असणारे हे पाषाण देवालय प्रत्येक मंडपाचे वेगळेपण राखून आहे. 
मुखमंडपात प्रवेशद्वारावर गणेश विराजमान आहेत. 
सभा किंवा स्वर्गमंडपात 
प्रवेशद्वारावर सरस्वती देवी विराजमान आहेत. 
आणि गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर विष्णूपत्नी 
लक्ष्मी विष्णूंच्या मांडीवर विराजमान आहेत.हे दुर्मिळ शिल्प येथे बघावयास मिळते. 
यातून देवांच्या आशिर्वादाने अगोदर सरस्वती पुजन करुन विद्या प्राप्त करावी...विद्याप्राप्त झाली की, आपोआप लक्ष्मीची प्राप्ती होते.हाच संदेश यातून दिला गेलाय असे वाटते...
  या शिल्पातून काही बोधकथा,दंतकथा कथन केलेल्या आहेत. रामायणातील श्रीराम आणि हनुमंत यांची पहिली भेट झाल्याचा प्रसंग कोरलेला आहे...
 इंटरलॉक पध्दतीने शिल्पांची मांडणी केलेली भव्यदिव्य शिल्पे 
आपण बघतच रहातो. कोरीवकाम तर अत्यंत सुंदर!कोरलेला रुद्राक्ष अगदी खरा वाटावा असाच. तसेच साप,आपण शिल्परुपात बघतोय हे खरे वाटतच नाही!
     नृत्याविष्कारातील गणेशमूर्ती शिल्प येथेच बघितले. तर आसनस्थ विष्णूंचे शिल्प पहिल्यांदाच येथे बघण्यात आले...ही आणिक अजून कितीतरी वैविध्यपूर्णता आणि वैशिष्ट्य आपल्याला येथे दिसतील...ती प्रत्यक्षात तेथे जावून बघण्यातच मजा आहे. प्रशिक्षित गाईड घेवून यातील बारकावे समजून घ्यावित...आपण अक्षरशः अचंबित होऊन जातो...आज सातव्या शतकात बांधलेले मंदिर ,बांधावयास पाचशे वर्षे लागली..म्हणजे त्या काळातही आपली संकृती,वास्तूकला,स्थापत्यशास्त्र, शिल्पकला,किती प्रगत होती!याचा विचार कल्पनातीच... धार्मिक अधिष्ठानावर या साऱ्या गोष्टींची मांडणी असेल तरीही ती कितीतरी शास्त्रीय आणि तर्कशुद्ध होती याची प्रचिती येत जाते आपल्याला...
आपण आज एकवीसाव्या शतकातही ज्ञानाने किती तोकडे आहोत...याची जाणीव होत जाते...म्हणूनच हे मंदिर निरिक्षण करताना अर्थातच प्रशिक्षित व्यक्तीमार्फत आपण कणाकणाने समृध्द होत आहोत असे वाटते...
धन्य ते राजघराणे, राजे, ज्यांनी शिल्पकारांना राजाश्रय देत अतुलनीय 
शिल्प कला जपून ठेवली...त्या शिल्पकारांना त्रिवार वंदन ज्यांच्यामूळे आज आपण हा अप्रतिम खजाना डोळ्यात साठवून ठेवू शकतो...
संधी मिळेल तेंव्हाच नव्हे तर  मुद्दामहून जावून यावे असे हे शिल्पसौंदर्य आपल्याच महाराष्ट्रात आहे याच अभिमान वाटतोय...

तेथे माहिती सांगणारे प्रशिक्षित गाईड या मंदिरावर चार पाच तास 
बोलू शकतात...पण आम्हाला दिड दोन तासच वेळ होता...ऐकता येईल तेवढी महत्वाचे मुद्दे आम्ही ऐकले...

गाईड साठी संपर्क 
मो. 7083221199

🌹🌹🌹🌹

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा