डाव मांडून भांडून
मोडू नको
आणले मी तुझे सर्व मी आणले
सर्व काही मनासारखे मांडले
तूच सारे तुझे दूर
ओढू नको
सोडले मी तुझ्या भोवती सर्व गे
चंद्रज्योती रसाचे
रुपेरी फुगे
फुंकणीने फुगा हाय
फोडू नको
गोकुळीचा सखा तूच केले मला
कौतुकाने मला हार
तू घातला
हार हासून घालून
तोडू नको
काढले मी तुझे नाव
तू देखिले
आणि माझे पुढे नाव
तू रेखिले
तूच वाचून लाजून खोडू नको
#आठवणीतील कविता#
किती किती विनवणी आहे या शब्दांमध्ये!किती आर्जवं आहेत...एका पतीनं आपल्या संसार मोडावयास निघणाऱ्या पत्नीसाठी....
या गीतातील शब्दा शब्दांमधून या गीतातील नायकाचा (पतीचा)सच्चेपणा जाणवत जातो...
दोघांनी मिळून आनंदानं थाटलेल्या संसारातून त्याची पत्नी,निघून जाण्याचं ठरवते....संसाराचा डाव मोडू बघते,त्या वेळी हा पती आपल्या पत्नीला त्या सुरुवातीच्या साऱ्या आनंदमय गोष्टींची मुद्दाम आठवण करुन देत असतो....
पती तिला एक एक आठवण सांगताना म्हणतो,संसारातली प्रत्येक वस्तू,तुझ्याच पसंतीनं मी आणलेल्या आहेत...त्या साऱ्यांना घेऊन आपण संसार मांडलाय आणि हे सारं तुझंच असताना तू दूर करु नकोस...
प्रिये,तुला मी सारी सुखं उपलब्ध करुन दिली आहेत...
ह्या सुखांना कवींनी दिवाळीत उडवल्या जाणाऱ्या चमकत्या फुग्यांची (झाड) उपमा दिली आहे....पण हे सारं तूच तुझ्या हातानं उध्वस्त करु नकोस...
आपण दोघांनी मिळून उभं केलेल्या गोकुळाचा
(संसार)सखा,सोबती तूच मला कौतुकानं बनवले आहेस,माझ्या गळ्यात वरमाला घालत तू माझी निवड कौतुकानं केली आहेस आणि आता तोच हार (संसार)सोडून तू अशी जाऊ नकोस...
आपल्या लग्नात मीच तुझे नाव देवापुढे लिहून तुला माझी अर्धांगिनी बनवले आहे...तू पण तुझ्या नावापुढे माझे नाव लावत, मला तुझा पती म्हणून स्विकारले आहेस,ते वाचताना तू लाजतही होतीस आणि तेच माझे नाव असे पुसून टाकून जाऊ नकोस....असा मांडलेला संसार भाझ्याशी भांडून तोडू नकोस....
गर्भितार्थानं किती आशयघन असं हे गाणं आहे... लहानपणापासून रेडिओ वर लागलेलं कानावर पडणारं हे गाणं मला त्यातील अर्थही कळत नव्हता पण तरीही आवडायचं...सूर, ताल,लय साऱ्याच बाबतीत सरस असणारं म्हणूनही असेल कदाचित...पण नंतर त्यातला अर्थ समजत गेला आणि हे तर तसं बघितलं तर,मनाला क्लेश करणारं गाणं आहे हे लक्षात आलं...
या गाण्याचे गीतकार कवी ना.घ. देशपांडे....यांच्याच गावी,मेहकरला वास्तव्याचा योग आला आणि मग त्यांची रचलेली सारीच गाणी आवडू लागली....
नागोराव घनःश्याम देशपांडे.ना.घ.देशपांडे या नावानं मराठी माणसाला परिचित आहेत...
आपलं,एल.एल.बी.
करुन त्यांनी नंतर 'वकिली' व्यवसाय म्हणून स्विकारला...पण बी ए.चं शिक्षण चालू असताना त्यांनी,
"शिळ"ही त्यांची पहिली कविता लिहिली...त्यांच्याच वर्गमित्राने ती गायली आणि ती लोकांमध्ये अतिशय प्रसिध्द झाली...अगदी कविता वाचनाचे कार्यक्रम होऊ लागले...नंतर ती ध्वनिमुद्रित केली गेली आणि येथूनच मराठी मध्ये भावगीतांची परंपरा सुरू होत नावारुपाला आली....
या अर्थानं कवी ना.घ.देशपांडे भावगीतांचे जनक ठरले असे म्हणता येईल...
नंतरच्या काळात त्यांच्या हातून बरंच मोठं काव्यलेखन होत अनेक कविता संग्रह प्रकाशित झाले...ललित लेखनही झालं...
त्यांच्या खूणगाठ या काव्यसंग्रहास ')साहित्य अकादमी' पुरस्कार मिळाला....
साहित्यिक कारकिर्दी शिवाय त्यांनी ईतरही अनेक क्षेत्रात आपले महत्वाचे योगदान दिले आहे....
१९०९मध्ये जन्मलेल्या या कलासक्त व्यक्तिमत्वाचं २०००साली निधन झालं....पण त्यांच्या कवीता,गीतं,त्यांनी स्थापन केलेली शिक्षण संस्था वगैरे अनेक गोषटींमधून ते कायम आठवणीत राहिले आहेत...
अंतरीच्या गुढ गर्भि,
शीळ, मन पिसाट माझे अशी अनेक गाणी आजही प्रसिद्ध आहेत...
बाबुजींनी गायलेली ना घं ची गाणी तर अप्रतीमच!
त्यांपैकीच एक हे काव्य जे नंतर गाण्यात रुपांतरीत झालं....
डाव मांडून भांडून मोडू नको
डाव मोडू नको
डाव मोडू नको.
काव्य वाचा आणि गीतही ऐकाच...
©️नंदिनी म. देशपांडे.
🌹🌹🌹🌹🌹🌹
https://youtu.be/wgdacZ9fd98
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा