#आठवणीतील कविता#
हे विश्व प्रेमिकांचे!
कवयित्री- शांता शेळके.
रसग्रहण.
शांताबाईंची ही कविता,म्हणावी तर,प्रेम कविता किंवा त्या पेक्षा व्यापक अर्थानं सांगायचं झाल्यास,ही प्रेमाचा खरा अर्थ उकलून सांगणारी,प्रेमिकांमधील प्रगल्भ प्रेमाची व्याख्या करणारी कविता...
खरं प्रेम कसं असावं?त्याची महती काय आहे हे शिकवणारी ही कविता....
आधुनिक काळात आजूबाजूला दिसणाऱ्या, प्रियकर आणि प्रेयसीच्या किंवा नवरा बायकोच्या प्रेमातील उथळपणा,गांभिर्याचा अभाव किंवा परस्परांशी समरस न होता स्वार्थ साधण्याची प्रवृत्ती यांवर लगाम घालण्याच्या दृष्टीने खरे प्रेम कसे असते?त्याची महती काय आहे?
याची जाणीव करुन देणारी ही कविता!
दोन खऱ्या प्रेमिकांची आयुष्य ही दोन वेगळी माणसं असूनही ती, मनानं एकमेकांच्या खूप
जवळ असतात... हे दोन्ही निराळी नसतातच कधी...
ही दोघं जवळ असतात तेंव्हा न बोलताही, शब्दांशिवाय त्यांना परस्परांची मनं वाचत असतात...त्यांना बोलण्याचं कामही पडत नाही....मनाची भाषा मनाला नि डोळ्यांची डोळ्यांना कळते....
एवढे ते मानसिक पातळीवर एकरुप असतात...
परस्परांच्या विरहातही ते सुखी असतात प्रेम करणारी ही दोन माणसं
मुळी वेगळी नसतातच...
माणूस म्हटला की राग लोभ आलाच,पण प्रेमाच्या या विश्वात,रागाला थारा नसतो... वरकरणी दिसणारा राग हा लटका खोटा किंवा लाडिक म्हणता येईल असाच असतो...तो काही क्षणातच विरुन जातो....
ह्या दोन्ही प्रेमिकांना एकमेकांचे भारी कौतूक असते...ते अखंड परस्परांच्या प्रेमात असतात....
प्रेमी युगुल दूर असतील एकमेकांपासून तरीही त्यांच्यात अजिबात दुरावा नसतोच...दूर असूनही परस्परांच्या आठवणींनीसुध्दा ते मोहरुन जातात...हाही एक प्रेमाचा आविष्कार होय!
आपण एकमेकांवर करत असणाऱ्या प्रेमाची खोली त्यांनी जाणलेली असते...
तो आणि ती वेगळी नाहीतच याची होणारी जाणीव त्यांच्या मनाला तृप्त करुन जाते आणि आपले आयुष्य परस्परांच्या सहवासात सार्थकी लागले, याचा बोध त्यांना होतो....
खऱ्या प्रेमी युगुलांचे विश्व हे असे जगावेगळे असते...
हिच खऱ्या प्रेमिकांची ओळख आहे...
अगदी साध्या सोप्या शब्दांत प्रेमाची महती सांगणारी ही कविता मनाला भावते...वाचकाला आपल्या प्रेमाचं प्रतिबिंब दाखवते....
मनाने एकरुपकत्व साधणारं प्रेम वासनेला प्राधान्य न देता परस्परांच्या भावभावनांचा आदर करतं...परस्परांचा सन्मान करतं आणि एकमेकांना समजून घेत जीवन व्यतित करतं....
जणू काही शांताबाईंनी प्रेम हे अशा पध्दतीनं केलेलं असावं तरच ते अर्थपूर्ण ठरेल हे सांगण्यासाठीचा हा दिलेला मंत्रच!
अतिशय प्रतिभासंपन्न व्यक्तिमत्व असणाऱ्या शांताबाई म्हणजे मराठी साहित्याचं एक लेणं आहेत....
कथा,कादंबरी, कविता, चरित्र लेखन,वृत्तपत्रातून लेखन असे सारे साहित्य प्रकार हाताळणाऱ्या त्या एक चतुरस्त्र लेखिका होत्या...
अतिशय सुंदर गीत रचनांच्याही त्या उद्गात्या आहेत... तोच चंद्र मा नभात,रेशमाच्या रेघांनी,जे वेड मजला लागले,मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश ही कांही उदाहरणे सांगता येतील...
मराठी साहित्यातील विविध पुरस्कारांच्या या मानकरी...
अशा या थोर साहित्यिक व्यक्तिमत्वाला विनम्र अभिवादन.🙏🏻
नंदिनी म. देशपांडे.
🌹🌹🌹🌹🌹🌹
कविता.
असता समीप दोघे
हे ओठ मूक व्हावे
शब्दाविना परंतु
बोलून सर्व जावे
अमृत मीलनाचे विरहातही सुखावे
विश्वाहूनी निराळे
हे विश्व प्रेमिकांचे ।
फसवा वरुन राग
रुसव्यात गाढ प्रिती
होता क्षणिक दूर
वेडी मनात भिती
दिनरात चिंतनाचे अनिवार कौतुकाचे
विश्वाहूनी निराळे
हे विश्व प्रेमिकांचे
दुरातही नसावा दोघांमध्ये दुरावा
स्पर्शाविना सुखाने
हा जीव मोहरावा
ओठी फुलून यावे
स्मित गोड सार्थकाचे
विश्वाहूनी निराळे
हे विश्व प्रेमिकांचे!
शांता शेळके.
🌹
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा