हूरहूर
--------------
2025 च्या वर्षारंभीपासूनच लागलेली मनाची हूरहूर अजूनही कमी होत नाहीए...किंबहूना ऑगस्ट च्या प्रारंभापासून ती चांगलीच उसळी घेत आहे...कारणच तसे खूप ह्रदयस्पर्शी आहे...
ॲड.आनंद उमरीकर, याच्या आणि आम्हा सर्वांच्या आनंदाचा हा ऑगस्ट आणि पर्यायाने श्रावण महिना...
माझा लहान भाऊ,ॲड.आनंदच्या वाढदिवसाचा हा महिना. गोकुळ अष्टमीच्या पूर्व सुर्योदयाला, म्हणजे सप्तमीला (1975) आम्हा तीघी बहिणींना हक्काचा भाऊ दिला होता देवाने.त्यामूळे अख्ख्या श्रावणात आम्हा बहिणींसाठी सेलीब्रेटी असायचा तो....
आजोबांचे नाव चालवावे म्हणून मोठ्या आईने बाळाचे नाव "आनंद",ठेवावे हे सांगितले होते...त्याच्या येण्याने आमच्या घरी आनंदीआनंद झाला होता,तो सार्थ ठरवला आनंदने.
त्याच्या नवसाची सत्यअंबेची पुजा दरवर्षीच्या श्रावणातच घालायची आईने...तसेच
गोकुळावर फुलोरा लावायची तो आनंदच्या रुपाने घरात बाळकृष्ण आला तेंव्हापासूनच.... आजी नागनाथाच्या रथावर याच बाळकृष्णाला आशिर्वादासाठी निशान लावायची महाशिवरात्रीला. राखी बांधावयास छोटा भाऊ झाला म्हणून आम्ही बहिणी किती सुखावून गेलो होतो, त्या लहान वयातही....तो न चुकता बांधून घ्यायचा तीनही बहिणींची राखी ....
राखीपौर्णिमा काय, दिवाळी काय आमच्याकडे अगदी उत्सवी वातावरण ठेवण्यात आईबाबांसह आम्हा चौघाही भावंडांचा उत्साह ओसंडून वाहायचा...
त्यातच याच श्रावण/ऑगस्ट महिन्यात 28 तारीख आनंदच्या वाढदिवसाची...
वीस वर्षांपूर्वि याच महिन्यात सप्तश्रृंगीचा घाट चढत असताना आनंदला झालेला हार्ट अॅटॅक...पण तिच्याच आशिर्वादाने जवळ आलेल्या
काळाशी खंबीरपणे लढत परतवून लावले होते त्याने...
आजही अंगावर शहारे आणणारी ती आठवण...
त्यानंतर बायपास सर्जरीला
यशस्वीपणे तोंड देत त्यातून सुखरुप बाहेर पडल्याचा आनंदी क्षणही याच श्रावणातला....
24ऑगस्ट,2005 हाच तो दिवस...
28 ऑगस्ट 2005,या दिवशी त्याला हॉस्पिटल मध्ये जाऊन आनंदाने शुभेच्छा दिल्याचा क्षण आम्ही सुवर्णाक्षरात लिहून ठेवला अगदी...
आजही आनंदच्या वाढदिवसाचा दिवस आहे,
त्याला मनभरुन शुभेच्छा आणि आशिर्वाद देण्याचा आजचा दिवस...
त्याच्या शिवाय आलेला त्याचा हा पहिला वाढदिवस.... तोही पण्णासावा....पण आमचा, उत्साह कोमेजून टाकणारा, उदास बनवणारा आणि आनंदच्या आठवणींत रेंगाळत ठेवणारा...
मागच्या वर्षी वाढदिवसानिमित्त आम्हाला नमस्कार करावयास आला तेंव्हा फार खुषीत होता आनंद.
राखीपौर्णिमेला मी दिलेल्या शर्ट पँट ची घडी तो वाढदिवसाच्या दिवशी मोडायचा आणि ते नवीन कपडे घालून नमस्कार करावयाचा...आशिर्वादाचा हात कायमच त्याच्यावर होताच आमचा...तो हार्ट पेशंट म्हणून "खाली वाकू नकोस",नमस्कार करताना ही माझी नेहमीची सुचना डावलून आम्हा उभयतांना पदस्पर्श केल्याशिवाय रहात नव्हता कधीच आनंद....त्यावेळी बहिण आणि भाऊजी म्हणून...त्याच्या आणि आमच्या चेहर्यावर विलसत जाणाऱ्या समाधानाचे वर्णन करावयास शब्द तोकडे पडतील खरंच...
मागच्या वर्षी याच दिवशी म्हणाला होता,"चला पण्णाशीत तर आलो"...माझा आवाज कातर होत गेला आणि मी म्हणाले होते,अरे,नव्वदी शंभरी गाठायची आहे तुला चांगली...आत्ताच काय वर्षे मोजतोस?"
पण त्याच्या या वाक्याने निःशब्द केले काही वेळ आम्हा तिघांनाही...काहीतरी बोलतो म्हणत माझ्या मनाने देवाजवळ तक्रार केली आणि आनंदच्या उदंड आयुष्याचं मागणं मागितलं मी देवघरातील देवांना...
कारण त्याने कधीच त्याला असणाऱ्यां ह्रदयरोगाच्या व्याधीचा साधा उल्लेख सुध्दा केला नव्हता कधीच...
पण नीयतीपुढे कोणाचे काही चाललेय का?अगदी सहज म्हणून तो बोलला आणि नीयतीनं त्यालाच शब्दांत पकडलं असं वाटतंय आज राहून राहून...
कायमचं घर करुन मनात बसलेली हुरहूर व्यक्त होऊन काहीशी विरळ होईल का?असा एक बालीश प्रश्न शिवला मनाला आणि व्यक्त झाले...
चि.आनंद तू लहान म्हणून नेहमीच तुला चिरंजीव हे विशेषण लावायची मी...
तू "चिरंजीव" आहेसच नेहमीच..तुझ्या सर्व नातेवाईकांमध्ये, तू जोडलेल्या स्नेही जनांच्या मनातील आठवणीतून, तुझ्या कर्तृत्वातून,तुझ्यात व्यावसायिक कौशल्ल्यातून, तू केलेल्या धाडसी प्रवासवर्णनातून, तुझी जीद्द, आणि सकात्मकतेतून आणि तुझ्या मनावर कायम राज्य करणाऱ्या वास्तवाचे भान ठेवणाऱ्या तुझ्याच निर्णयातून...एवढेच नव्हे तर थोड्याशाच मिळालेल्या या आयुष्यात वारंवार काळाशी जिद्दीने लढत दोन हात केलेल्या कठिण प्रसंगांच्या स्मरण क्षणांतून....
जिथे कुठे असशील तेथे सुखात रहाशील...आम्हा सर्वांकडे लक्ष ठेवून असशील आणि मुलांवर कायमच आशिर्वादाचा हात ठेवून असशील ही खात्री आहे आम्हाला...
तुझे स्मरण नेहमीच चीरंतन,चिरंजीव असणार आहेच....आणि आठवणींतून
तू कायमच आमची साथ करणार आहेस...
तुझ्या पवित्र स्मृतींना त्रिवार अभिवादन...🙏🏻🙏🏻🙏🏻
तुझीच,
ताई.
(ॲड.नंदिनी देशपांडे)