मंगळवार, ४ नोव्हेंबर, २०२५

दिवाळी.

आली बघा आली दिवाळी आली

चांदण सडा शिंपत शिंपत
बांधूनि तोरंणं दारोदारी

      आली बघा आली दिवाळी आली

आईची माया बाबांची छाया
उधाण भावा बहिणींच्या प्रेमा
हृदयस्थ नात्यांच्या पखरणीला

आली बघा आली दिवाळी आली

दिवाळी मनसुब्यांची परिपुर्ति*
मिष्टान्न फराळाची आरास पात्री
मंगल दिव्यांची ही मांदियाळी

आली बघा आली दिवाळी आली

घेवूनि सौख्य समृध्दीच्या राशी
अंगणी रंगावली या खाशी
उजळूनि टाकण्या आसमंती

आली बघा आली दिवाळी आली

आनंदाने करा दिवाळी साजरी
शुभेच्छा आपणांस त्यासाठी भारी
आयुर् आरोग्य ज्ञानदिप हाती

आली बघा आली दिवाळी आली
दिवाळी आली.

*नंदिनी म. देशपांडे*

🙏🏻😊

💥💥💥💥💥💥

सोमवार, ६ ऑक्टोबर, २०२५

हौसेला मोल नसते?

हौसेला खरंच मोल नसते?
**********************

लेखिका --- 
ॲड.नंदिनी म.देशपांडे. 
९४२२४१६९९५..
छ.संभाजीनगर. 


     "हौसेला मोल नसते", असे आपण पूर्विपासून ऐकत आलो आहोत...काही अंशी ते 
बरोबर असतेही...
     हौस म्हणजे आवड, आपल्या दैनंदिन आयुष्यात प्रत्येक जण आपल्या मनात असणाऱ्या आवडी निवडी वेळ मिळेल तश्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतो. 
     काही आवडी पूर्ण करण्यासाठी पैसा आवश्यक असतो...
       पण तरीही आपल्या ऐपतीनुसार आपण प्राधान्यक्रम ठरवत त्या जास्तीत जास्त पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतोच ना...
       मनात कायमचे घर करुन बसलेल्या आवडींचे रुपांतर हौसेमध्ये केंव्हा होऊन बसते हे 
आपल्यालाही कळत नाही...
याच हौसेचा पाठलाग करत आपण ती पूर्ण करण्यासाठी मिळणाऱ्या संधीची वाट बघत रहातो...कधी कधी अख्खे आयुष्यही खर्ची होत जाते या साठी...
       पण हल्ली पैसा मिळवण्याचा मुख्य उद्देश हा आपल्या असणाऱ्या हौसे मौजेसाठीच आहे आणि तो 
माझ्या कमाईचा आहे, मग मी तो माझ्या "ऐंजॉयमेंट"साठी खर्च करणार ही भावना वाढीस लागलेली दिसते...
     मान्य आहे हा विचार पूर्णपणे अयोग्य आहे असे अजिबात नाहीच..पण जीवन जगत असताना आपला सभोवताल, आपली माणसं, आपलं कुटुंब यांचा विचार करणंही अपरिहार्य असते. 
आज आपल्या हाती महिन्याच्या शेवटी पैशाचा मोठ्ठा आकडा येत आहे हे दिसत असेल तरीही त्या आकड्याची किंमत दिवसेंदिवस कमी होत चालली आहे हे विसरुन चालणार नाही...त्यामूळे आपली हौसमौज, आपला पैसा आणि आपला प्राधान्यक्रम यांचा ताळमेळ साधता येणं फार गरजेचं असतं...
 "यालाच आपण अंथरुण बघून पाय पसरणे",म्हणतो. 
       उदाहरणच द्यावयाचे झाले तर,आजच्या काळात विवाह विधी हा केवळ सोहळा न रहाता एक अफाट खर्चिक असा "इव्हेंट" झालेला आहे...
हौसेखातर आपण यावर कितीतरी मोठी रक्कम खर्च करत जातो...हे खरंच एवढे गरजेचे आहे का?आपले बजेट
त्यामूळे कोलमडणार तर नाही ना?किंवा इतरांनी असे केले तर आपणही असेच केले पाहिजे, अशी तुलना किंवा स्पर्धा करणं आवश्यक आहे का?या आणि इतर अनेक गोष्टींवर विचार करणं नितांत गरजेचं आहे असे वाटते. 
      आज विवाह,त्यातील विधींपेक्षा भव्यदिव्यपणा, दिखाऊपणा, त्यातील मनोरंजनाच्या कार्यक्रमांचे अतीरेकी प्रदर्शन आणि इतर तांत्रिक गोष्टींवर अवाढव्य खर्च,यांवर एवढेच नव्हे तर 
जेवणाच्या पदार्थांतील वाया जाण्या इतपत असणारी विविधता यांच्या निकषावर
होताना दिसतात. या बाबी किती तरी महागड्या आहेत याची कल्पनाही अंगावर शहारे आणते हे वास्तव सत्य आहे...पण तरीही आपण या सर्व गोष्टी करण्यासाठी बळी पडतोच आहोत!
      आपल्याजवळ पैसा आहे म्हणून?की आपल्या श्रीमंतीचे प्रदर्शन करावयाचे म्हणून?याचाही विचार केला गेला पाहिजे...
      लग्नाचा इव्हेंट पार पाडण्यासाठी हल्ली बर्‍याच साधनांची आवशयकता असते.ही एक चैन आहे आणि कितीतरी लाखांची उलाढाल यातून होत जाते...या प्रत्येक उद्योगांची साखळी ही परस्परांवर अवलंबून असते...प्रत्येकाला एका इव्हेंट मधून मोठा बिझनेस मिळतो...त्यांचे फावत जाते पण ग्राहकाचे खिसे रिकामे होत जातात त्याचे काय?
आयुष्यभर खस्ता खाऊन जमवलेली पै पै दोन दिवसांच्या एका इव्हेंट मध्ये रिकामी होऊच शकते...
"ॠण काढून सण साजरा करण्याची" आपली परंपरा नव्हे....
       आपल्याला मार्केट मिळावे म्हणून हे उद्योजक अनेक राज्यांतून परंपरा "उसन्या", आणत आपल्या महाराष्ट्रीयन विवाह परंपरेत घुसवत आहेत...त्यात त्यांचे फावते पण ग्राहकाच्या तोंडाला फेस येवू शकतो...
    तसे बघितले तर, केवळ देवाब्राम्हणाच्या, अग्नीच्या आणि काही थोडक्या लोकांच्या साक्षीने पूर्ण करावा असा अगदी साधा असणारा आपला महाराष्ट्रीयन विवाह विधी आहे...
      कायद्याच्या चौकटीत नोंदणी पध्दतीने करावयाचा असेल तर तो आणखीनच सोपा आहे...नवरा-नवरीने स्वखुषीने दोन्ही बाजूंच्या दोन दोन साक्षीदारांसमोर विवाहासाठी असणाऱ्यां नोंदणीपत्रावर सह्या करुन आमचे परस्परांशी लग्न झाले आहे, आम्ही आजपासून नवरा बायकोच्या नात्यात बांधले गेलो आहोत,हे मान्य करणे होय....
      एवढे सगळे साधे सोपे असताना यातील साधेपणा केंव्हाच लोप पावला आणि विधींनी सोहळ्याचे रुप घेतले...सोहळा एक वेळ ह्रद्य होऊ शकतो...त्याला भावनेच्या ओलाव्याचा गंध असतो...म्हणून सोहळा होणेही  असंयुक्तिक नाही,असे आपण म्हणूया, पण "इव्हेंट" मध्ये रुपांतर खरंच तोंडचे पाणी पळवणारे आहे...
शिवाय इव्हेंट मध्ये भावनांपेक्षा दिखावा, देखावा, कृत्रिमपणा आणि तंत्रज्ञान याच गोष्टींचे पारडे जड असते..
      मला वाटतं या साऱ्या गोष्टींचे प्रत्येक आईवडिलांनी, लग्नाळू मुलामुलींनी खूप सखोल परीक्षण करावे...
 आपल्याजवळ भरभक्कम पैसा असेल तरीही हा नाहक खर्च कसा टाळता येईल याचा विचार करावा...
      आपल्याजवळ असणारा पैसा इतर अनेक जीवनोपयोगी बाबींवर, सामाजिक बांधिलकी जाणत त्यावर काही प्रमाणात खर्च करावा. उद्या वाढत्या संसारातील वाढत्या खर्चासाठी, तसेच गरज पडल्यास आपल्या आणि कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्य संवर्धनासाठी तरतूद म्हणून गुंतवणूक करावा.....
     आपल्या हक्काचे घर घेणं ही गरजही आपल्या मनातील हौस असू शकते...त्यासाठीही भरपूर रक्कम हाताशी असावी लागते...
     थोडक्यात सांगण्याचा मुद्दा हा आहे की, आयुष्यातील एकाच" इव्हेंट " वर भारंभार पैसा खर्च करण्या ऐवजी, दूरदृष्टिने विचार करत त्या पैशाची सुयोग्य गुंतवणूक करावी आणि आपल्या आयुष्यातील आनंद कायम टिकवण्यासाठी असणाऱ्या पैशांचा योग्य विनियोग करत 
सुखाने जगावे...
हौसेला मोल नसते हे जरी खरे असले तरीही,हौसेसाठी आपण किती रकमेचा विनियोग करावा?याचे सूत्र मनात तयार करावे...म्हणूनच हौसेला मोल असते...
असावयास हवे असे माझे मत आहे...
आर्थिक विनीयोगाचे सूत्र मनात तयार असले तर, यामूळे 
आपल्या जीवनातील आनंदाचे गणित जुळवण्यास नक्कीच मदत होईल यात शंकाच नाही...

🌹🌹🌹🌹🌹

शनिवार, ६ सप्टेंबर, २०२५

काल आमच्या काही मैत्रीणींच्या गप्पा चालू होत्या,शिक्षक दिन असल्याने ओघानेच त्या विषयावर गाडी आलीच...आमच्या लहानपणीच्या आठवणींना, त्यातही शिक्षक दिनाच्या दिवशी आम्ही शाळेत केलेल्या धम्माल गमती जमती सांगताना प्रत्येकजण भरभरुन बोलत होती..
      आजच्या दिवशी,सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला नमस्कार करत, त्यांच्या प्रति आदर व्यक्त करणं,सर्व शिक्षकवृंदांना नमस्कार करत त्यांचे आशीर्वाद घेणं...त्यांच्या कौतूकाची नजर आपल्यावर पडली की, चेहरा खुलून जाणं हे सारं आठवलं...
      याच दिवशिची आणखी एक अत्यंत महत्त्वपूर्ण आठवण म्हणजे, आम्हा विद्यार्थ्यांकडून "स्कूल डे " साजरा होत असे...
   एवढा एक दिवस आम्ही विद्यार्थी शिक्षक शिक्षिकेच्या भुमिकेत प्रत्यक्ष वावरत शाळेचा प्रत्येक विषयाचा तास वाटून घेत असू....काय मज्जा यायची! आपला तास पार पडेपर्यंत जाम टेन्शन असायचं...पण छान वाटायचं...बरंच काही शिकावयास मिळायचं, बरेच अनुभव मिळायचे आणि मुख्य म्हणजे,आमचा आत्मविश्वास वाढावयास मदत होऊन आत्मभान यायचे...आत्मसन्मान साधला जायचा...

     हे झालं आमच्या पिढीचं बालपण!खरोखरच आदर्श ठरावेत आणि आदर्शाच्या मार्गावरुन बोट धरुन चालवणारे होते त्यावेळचे बहुतांशी शिक्षक वृंद...अत्यंत साधेपणात मुर्तीमंत सात्त्विकता,विद्यार्थ्यांप्रति अत्यंत जिव्हाळा आणि प्रत्येक विद्यार्थी घडवण्यात त्यांची तळमळ त्यांच्या धाटणीचे कौशल्य या साऱ्या गोष्टी विद्यार्थ्यां साठी  अनुकरणप्रिय असायच्या...
       विद्यार्थ्यांसाठी शिक्षण हा एक महत्त्वपूर्ण संस्कार असायचा...त्याची किंमत शब्दांत किंवा पैशात होणं अगदीच दुरापास्त होतं....शिकवणी किंवा ट्यूशन हे आज असणारे  परवलीचे शब्द अर्थशून्य होते....
       मुळातच शिक्षकीपेशाला,त्यांच्या संस्कार वर्गांना आणि विद्यादानाच्या त्यांच्या निष्ठेला कोणताही पर्यायच असू शकत नव्हता...
     शिक्षकांचे अध्यापन कौशल्य एवढ्या प्रचंड ताकदीचे होते,की त्यांच्यामुळे संबंधित शाळेचे नाव भरभराटीला यायचे...
      खरखर नतमस्तक व्हावेसे वाटते ते अशा शिक्षकांसमोर!
धन्य ते शिक्षक आणि धन्य ते विद्यार्थी  असे समजले जाणाऱ्या पिढीचे आम्ही विद्यार्थी...आम्हाला याचा सार्थ अभिमान आजही वाटतो आणि म्हणूनच आम्हा मैत्रीणींच्या गप्पांनाही कढ येत गेला या विषयावर बोलताना अगदी!

      ओघानेच आजच्या शिक्षकांचा,विद्यार्थ्यांचा आणिक शैक्षणिक पध्दतींवरही नकळतपणे प्रकाशझोत पडत गेला...आज विद्यार्थी, शिक्षक आणि तिसरा महत्वाचा घटक म्हणजे पालक हे तीनही या शैक्षणिक क्षेत्राचा अनिवार्य भाग आहेत...
       पूर्विच्या काळी पाल्याच्या कौतुकासाठी किंवा त्याच्या तक्रारी साठीच कधीतरी पालकांना शाळेत बोलावले जायचे...पण हल्ली पालकांची आर्थिक संपन्नता आजमावणे हाच एकमेव उद्देश ठेवत पाल्याच्या अगोदर पालकाची मुलाखत होते...पालक शाळेतील शिक्षकांपेक्षा शाळेचे नाव/ इतर सोयी बघून मुलाला शाळेत घालतात...अध्यापन कौशल्यावर आधारित शिक्षक निवडण्यापेक्षा 'डोनेशन' म्हणून जास्तीत जास्त 'दाम'देणारा गृहस्थ शिक्षक म्हणून नेमला जातो...
       मुल्याधिष्ठित नेमणुकी ऐवजी आणि शिक्षणा ऐवजी, गोंधळाधिष्ठित वातावरणात शाळेला सुरुवात होते...भपकेबाज पणावर गुणांपेक्षा कितीतरी भर असतो बर्‍याच शाळांचा....अगदी बोटावर मोजण्या इतपतच शाळा किंवा शिक्षकही औषधाला उरले आहेत...
       मग अशावेळी "आडातच नाही तर पोहोर्यात कसे येणार"?अशी सारी परिस्थिती दिसते...

    मुळात शिक्षकांना प्रशिक्षित करुन मुल्ये काय असतात?गुणाधिष्ठित शब्दाचा नेमका अर्थ, संस्कार आणि त्याचे सामाजिक स्थान, भाषा, व्याकरण,भाषेची शुध्दता म्हणजे काय?किंवा विद्यार्थ्यांसाठी आदर्शवत वर्तन म्हणजे काय? शिकवावयास हव्या, तरच त्यांचे योग्य परावर्तन मुलांच्या मनावर पडेल...
     
         याचा अर्थ सरसकट असेच नाहीत असे अजिबात नाही पण यांचे प्रमाण मात्र नगण्यच असावे असे आज चित्र दिसते....शिवाय आपली संपूर्ण शिक्षण पध्दती ही "कोचिंग क्लासेस ",नामक वाळवीने पोखरुन निघाली आहेत...पैसा फेकला की कोणतीही गोष्ट अगदी सहज मिळते ही भावना वाढीस लागून शाळा ही केवळ परीक्षाकेंद्रेच आहेत की काय?असे खरे वाटणारे विदारक सत्य आहे दिसून येते.....
      आपल्या पाल्यांना (चांगले)?
शिक्षण देण्याच्या आणि भारंभार क्लासेस लावण्याच्या नादात पालक म्हणजे पैसा कमावणारी सजीव यंत्र, पाल्य म्हणजे मान हलवणारी बैलं आणि शिक्षक म्हणजे शाळेतील एक शोभेची वस्तू किंवा शिकवणे सोडून इतर भारंभार कामं कागदावर दाखवत निधी जमवणारे मशीन बनले आहे या कणभरही अतिशयोक्ती वाटू नये ही आजची शैक्षणिक पध्दतीची शोकांतिका....
   का म्हणून कोणाला आजच्या शिक्षक दिवसाचे महत्व वाटावे?
का म्हणून या दिनाचे सोहळे साजरे व्हावेत?

     एकूण या पध्दतीतील सर्व घटकांनी आत्मपरीक्षण करण्याची वेळ येऊन ठेपली आहे..
     अगदी मोजक्या म्हणता येतील अशा काही शाळा आजही आपली पत टिकवून आहेत त्यात भरपूर वाढ होणं फार गरजेचं आहेच...
     शिक्षणाचं बाजारीकरण थांबवून त्याला प्रेम वात्सल्याचं खतपाणी घालत जिव्हाळ्याची भावना 
मनापासून अर्पण करतील यातील सारे घटक तर, या क्षेत्रातील चमचमणारे तारे हे हिर्यांच्या लखलखीने तेजाळून निघतील असे नक्कीच म्हणावेसे वाटते...

शिक्षक दिन. 

©️ नंदिनी म. देशपांडे. 

🌹🌹🌹🌹🌹🌹

शिक्षकदिन

काल आमच्या काही मैत्रीणींच्या गप्पा चालू होत्या,शिक्षक दिन असल्याने ओघानेच त्या विषयावर गाडी आलीच...आमच्या लहानपणीच्या आठवणींना, त्यातही शिक्षक दिनाच्या दिवशी आम्ही शाळेत केलेल्या धम्माल गमती जमती सांगताना प्रत्येकजण भरभरुन बोलत होती..
      आजच्या दिवशी,सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला नमस्कार करत, त्यांच्या प्रति आदर व्यक्त करणं,सर्व शिक्षकवृंदांना नमस्कार करत त्यांचे आशीर्वाद घेणं...त्यांच्या कौतूकाची नजर आपल्यावर पडली की, चेहरा खुलून जाणं हे सारं आठवलं...
      याच दिवशिची आणखी एक अत्यंत महत्त्वपूर्ण आठवण म्हणजे, आम्हा विद्यार्थ्यांकडून "स्कूल डे " साजरा होत असे...
   एवढा एक दिवस आम्ही विद्यार्थी शिक्षक शिक्षिकेच्या भुमिकेत प्रत्यक्ष वावरत शाळेचा प्रत्येक विषयाचा तास वाटून घेत असू....काय मज्जा यायची! आपला तास पार पडेपर्यंत जाम टेन्शन असायचं...पण छान वाटायचं...बरंच काही शिकावयास मिळायचं, बरेच अनुभव मिळायचे आणि मुख्य म्हणजे,आमचा आत्मविश्वास वाढावयास मदत होऊन आत्मभान यायचे...आत्मसन्मान साधला जायचा...

     हे झालं आमच्या पिढीचं बालपण!खरोखरच आदर्श ठरावेत आणि आदर्शाच्या मार्गावरुन बोट धरुन चालवणारे होते त्यावेळचे बहुतांशी शिक्षक वृंद...अत्यंत साधेपणात मुर्तीमंत सात्त्विकता,विद्यार्थ्यांप्रति अत्यंत जिव्हाळा आणि प्रत्येक विद्यार्थी घडवण्यात त्यांची तळमळ त्यांच्या धाटणीचे कौशल्य या साऱ्या गोष्टी विद्यार्थ्यां साठी  अनुकरणप्रिय असायच्या...
       विद्यार्थ्यांसाठी शिक्षण हा एक महत्त्वपूर्ण संस्कार असायचा...त्याची किंमत शब्दांत किंवा पैशात होणं अगदीच दुरापास्त होतं....शिकवणी किंवा ट्यूशन हे आज असणारे  परवलीचे शब्द अर्थशून्य होते....
       मुळातच शिक्षकीपेशाला,त्यांच्या संस्कार वर्गांना आणि विद्यादानाच्या त्यांच्या निष्ठेला कोणताही पर्यायच असू शकत नव्हता...
     शिक्षकांचे अध्यापन कौशल्य एवढ्या प्रचंड ताकदीचे होते,की त्यांच्यामुळे संबंधित शाळेचे नाव भरभराटीला यायचे...
      खरखर नतमस्तक व्हावेसे वाटते ते अशा शिक्षकांसमोर!
धन्य ते शिक्षक आणि धन्य ते विद्यार्थी  असे समजले जाणाऱ्या पिढीचे आम्ही विद्यार्थी...आम्हाला याचा सार्थ अभिमान आजही वाटतो आणि म्हणूनच आम्हा मैत्रीणींच्या गप्पांनाही कढ येत गेला या विषयावर बोलताना अगदी!

      ओघानेच आजच्या शिक्षकांचा,विद्यार्थ्यांचा आणिक शैक्षणिक पध्दतींवरही नकळतपणे प्रकाशझोत पडत गेला...आज विद्यार्थी, शिक्षक आणि तिसरा महत्वाचा घटक म्हणजे पालक हे तीनही या शैक्षणिक क्षेत्राचा अनिवार्य भाग आहेत...
       पूर्विच्या काळी पाल्याच्या कौतुकासाठी किंवा त्याच्या तक्रारी साठीच कधीतरी पालकांना शाळेत बोलावले जायचे...पण हल्ली पालकांची आर्थिक संपन्नता आजमावणे हाच एकमेव उद्देश ठेवत पाल्याच्या अगोदर पालकाची मुलाखत होते...पालक शाळेतील शिक्षकांपेक्षा शाळेचे नाव/ इतर सोयी बघून मुलाला शाळेत घालतात...अध्यापन कौशल्यावर आधारित शिक्षक निवडण्यापेक्षा 'डोनेशन' म्हणून जास्तीत जास्त 'दाम'देणारा गृहस्थ शिक्षक म्हणून नेमला जातो...
       मुल्याधिष्ठित नेमणुकी ऐवजी आणि शिक्षणा ऐवजी, गोंधळाधिष्ठित वातावरणात शाळेला सुरुवात होते...भपकेबाज पणावर गुणांपेक्षा कितीतरी भर असतो बर्‍याच शाळांचा....अगदी बोटावर मोजण्या इतपतच शाळा किंवा शिक्षकही औषधाला उरले आहेत...
       मग अशावेळी "आडातच नाही तर पोहोर्यात कसे येणार"?अशी सारी परिस्थिती दिसते...

    मुळात शिक्षकांना प्रशिक्षित करुन मुल्ये काय असतात?गुणाधिष्ठित शब्दाचा नेमका अर्थ, संस्कार आणि त्याचे सामाजिक स्थान, भाषा, व्याकरण,भाषेची शुध्दता म्हणजे काय?किंवा विद्यार्थ्यांसाठी आदर्शवत वर्तन म्हणजे काय? शिकवावयास हव्या, तरच त्यांचे योग्य परावर्तन मुलांच्या मनावर पडेल...
     
         याचा अर्थ सरसकट असेच नाहीत असे अजिबात नाही पण यांचे प्रमाण मात्र नगण्यच असावे असे आज चित्र दिसते....शिवाय आपली संपूर्ण शिक्षण पध्दती ही "कोचिंग क्लासेस ",नामक वाळवीने पोखरुन निघाली आहेत...पैसा फेकला की कोणतीही गोष्ट अगदी सहज मिळते ही भावना वाढीस लागून शाळा ही केवळ परीक्षाकेंद्रेच आहेत की काय?असे खरे वाटणारे विदारक सत्य आहे दिसून येते.....
      आपल्या पाल्यांना (चांगले)?
शिक्षण देण्याच्या आणि भारंभार क्लासेस लावण्याच्या नादात पालक म्हणजे पैसा कमावणारी सजीव यंत्र, पाल्य म्हणजे मान हलवणारी बैलं आणि शिक्षक म्हणजे शाळेतील एक शोभेची वस्तू किंवा शिकवणे सोडून इतर भारंभार कामं कागदावर दाखवत निधी जमवणारे मशीन बनले आहे या कणभरही अतिशयोक्ती वाटू नये ही आजची शैक्षणिक पध्दतीची शोकांतिका....
   का म्हणून कोणाला आजच्या शिक्षक दिवसाचे महत्व वाटावे?
का म्हणून या दिनाचे सोहळे साजरे व्हावेत?

     एकूण या पध्दतीतील सर्व घटकांनी आत्मपरीक्षण करण्याची वेळ येऊन ठेपली आहे..
     अगदी मोजक्या म्हणता येतील अशा काही शाळा आजही आपली पत टिकवून आहेत त्यात भरपूर वाढ होणं फार गरजेचं आहेच...
     शिक्षणाचं बाजारीकरण थांबवून त्याला प्रेम वात्सल्याचं खतपाणी घालत जिव्हाळ्याची भावना 
मनापासून अर्पण करतील यातील सारे घटक तर, या क्षेत्रातील चमचमणारे तारे हे हिर्यांच्या लखलखीने तेजाळून निघतील असे नक्कीच म्हणावेसे वाटते...

शिक्षक दिन. 

©️ नंदिनी म. देशपांडे. 

🌹🌹🌹🌹🌹🌹

गुरुवार, २८ ऑगस्ट, २०२५

हुरहूर...

हूरहूर
--------------
    2025 च्या वर्षारंभीपासूनच लागलेली मनाची हूरहूर अजूनही कमी होत नाहीए...किंबहूना ऑगस्ट च्या प्रारंभापासून ती चांगलीच उसळी घेत आहे...कारणच तसे खूप ह्रदयस्पर्शी आहे... 
     ॲड.आनंद उमरीकर, याच्या आणि आम्हा सर्वांच्या आनंदाचा हा ऑगस्ट आणि पर्यायाने श्रावण महिना...
  माझा लहान भाऊ,ॲड.आनंदच्या वाढदिवसाचा हा महिना.  गोकुळ अष्टमीच्या पूर्व सुर्योदयाला, म्हणजे सप्तमीला (1975) आम्हा तीघी बहिणींना हक्काचा भाऊ दिला होता देवाने.त्यामूळे अख्ख्या श्रावणात आम्हा बहिणींसाठी सेलीब्रेटी असायचा तो....
     आजोबांचे नाव चालवावे म्हणून मोठ्या आईने बाळाचे नाव "आनंद",ठेवावे हे सांगितले होते...त्याच्या येण्याने आमच्या घरी आनंदीआनंद झाला होता,तो सार्थ ठरवला आनंदने.
त्याच्या नवसाची सत्यअंबेची पुजा दरवर्षीच्या श्रावणातच घालायची आईने...तसेच 
  गोकुळावर फुलोरा लावायची  तो आनंदच्या रुपाने घरात बाळकृष्ण आला तेंव्हापासूनच.... आजी नागनाथाच्या रथावर याच बाळकृष्णाला आशिर्वादासाठी निशान लावायची  महाशिवरात्रीला. राखी बांधावयास छोटा भाऊ झाला म्हणून आम्ही बहिणी किती सुखावून गेलो होतो, त्या लहान वयातही....तो न चुकता बांधून घ्यायचा तीनही बहिणींची राखी ....
     राखीपौर्णिमा काय, दिवाळी काय आमच्याकडे अगदी उत्सवी वातावरण ठेवण्यात आईबाबांसह आम्हा चौघाही भावंडांचा उत्साह ओसंडून वाहायचा...
त्यातच याच श्रावण/ऑगस्ट  महिन्यात 28 तारीख  आनंदच्या वाढदिवसाची...
वीस वर्षांपूर्वि याच महिन्यात सप्तश्रृंगीचा घाट चढत असताना आनंदला झालेला हार्ट अ‍ॅटॅक...पण तिच्याच आशिर्वादाने जवळ आलेल्या 
काळाशी खंबीरपणे लढत परतवून लावले होते त्याने...
आजही अंगावर शहारे आणणारी ती आठवण...
त्यानंतर बायपास सर्जरीला 
यशस्वीपणे तोंड देत त्यातून सुखरुप बाहेर पडल्याचा आनंदी क्षणही याच श्रावणातला....
24ऑगस्ट,2005 हाच तो दिवस...
28 ऑगस्ट 2005,या दिवशी त्याला हॉस्पिटल मध्ये जाऊन आनंदाने शुभेच्छा दिल्याचा क्षण आम्ही सुवर्णाक्षरात लिहून ठेवला अगदी...
    आजही आनंदच्या वाढदिवसाचा दिवस आहे,
त्याला मनभरुन शुभेच्छा आणि आशिर्वाद देण्याचा आजचा दिवस...
    त्याच्या शिवाय आलेला त्याचा हा पहिला वाढदिवस.... तोही पण्णासावा....पण आमचा, उत्साह कोमेजून टाकणारा, उदास बनवणारा आणि आनंदच्या आठवणींत रेंगाळत ठेवणारा...
     मागच्या वर्षी वाढदिवसानिमित्त आम्हाला नमस्कार करावयास आला तेंव्हा फार खुषीत होता आनंद. 
राखीपौर्णिमेला मी दिलेल्या शर्ट पँट ची घडी तो वाढदिवसाच्या दिवशी मोडायचा आणि ते नवीन कपडे घालून नमस्कार करावयाचा...आशिर्वादाचा हात कायमच त्याच्यावर होताच आमचा...तो हार्ट पेशंट म्हणून "खाली वाकू नकोस",नमस्कार करताना ही माझी नेहमीची सुचना डावलून आम्हा उभयतांना पदस्पर्श केल्याशिवाय रहात नव्हता कधीच आनंद....त्यावेळी बहिण आणि भाऊजी म्हणून...त्याच्या आणि आमच्या चेहर्‍यावर विलसत जाणाऱ्या समाधानाचे वर्णन करावयास शब्द तोकडे पडतील खरंच...
    मागच्या वर्षी याच दिवशी म्हणाला होता,"चला पण्णाशीत तर आलो"...माझा आवाज कातर होत गेला आणि मी म्हणाले होते,अरे,नव्वदी शंभरी गाठायची आहे तुला चांगली...आत्ताच काय वर्षे मोजतोस?"
    पण त्याच्या या वाक्याने निःशब्द केले काही वेळ आम्हा तिघांनाही...काहीतरी बोलतो म्हणत माझ्या मनाने देवाजवळ तक्रार केली आणि आनंदच्या उदंड आयुष्याचं मागणं मागितलं मी देवघरातील देवांना...
कारण त्याने कधीच त्याला असणाऱ्यां ह्रदयरोगाच्या व्याधीचा साधा उल्लेख सुध्दा केला नव्हता कधीच...

    पण नीयतीपुढे कोणाचे काही चाललेय का?अगदी सहज म्हणून तो बोलला आणि नीयतीनं त्यालाच शब्दांत पकडलं असं वाटतंय आज राहून राहून...
    कायमचं घर करुन मनात बसलेली हुरहूर व्यक्त होऊन काहीशी विरळ होईल का?असा एक बालीश प्रश्न शिवला मनाला आणि व्यक्त झाले...
    चि.आनंद तू लहान म्हणून नेहमीच तुला चिरंजीव हे विशेषण लावायची मी...
तू  "चिरंजीव" आहेसच नेहमीच..तुझ्या सर्व नातेवाईकांमध्ये, तू जोडलेल्या स्नेही जनांच्या मनातील आठवणीतून, तुझ्या कर्तृत्वातून,तुझ्यात व्यावसायिक कौशल्ल्यातून, तू केलेल्या धाडसी प्रवासवर्णनातून, तुझी जीद्द, आणि सकात्मकतेतून आणि तुझ्या मनावर कायम राज्य करणाऱ्या वास्तवाचे भान ठेवणाऱ्या तुझ्याच निर्णयातून...एवढेच नव्हे तर थोड्याशाच मिळालेल्या या आयुष्यात वारंवार काळाशी जिद्दीने लढत दोन हात केलेल्या कठिण प्रसंगांच्या स्मरण क्षणांतून....
    जिथे कुठे असशील तेथे सुखात रहाशील...आम्हा सर्वांकडे लक्ष ठेवून असशील आणि मुलांवर कायमच आशिर्वादाचा हात ठेवून असशील ही खात्री आहे आम्हाला...
   तुझे स्मरण नेहमीच चीरंतन,चिरंजीव असणार आहेच....आणि आठवणींतून
तू कायमच आमची साथ करणार आहेस...
तुझ्या पवित्र स्मृतींना त्रिवार अभिवादन...🙏🏻🙏🏻🙏🏻

तुझीच, 
ताई.
(ॲड.नंदिनी देशपांडे)

🌹🌹🌹🌹🌹

रविवार, १० ऑगस्ट, २०२५

स्मृतीरुपी रक्षाबंधन.

बहिणभावाचं नातं 
ह्रदयस्थ,निःस्वार्थ,निर्व्याज 
परस्परांचा आधारस्तंभ 

बहिणभावाचं नातं 
प्रेमळ  मायेने ओतप्रोत 
शब्दावीना संवाद साधणारं 

बहिणभावाचं नातं 
एक गोड माहेरपण 
बाल्य जपणारं 
अधिकार गाजवणारं 

बहिणभावाचं नातं 
मनाच्या कोंदणातील 
हळवा एक कप्पा 
निरोपाच्या वेळी 
ओलावणारं कडा 

आज मुर्त रुपात 
नसशीलही तू
पण मनात कायम 
वसलेला आहेस तू

माहितीए मला 
गोड आठवणींना 
झोके देत 
प्रसन्न मुद्रेने बघतो आहेस 
आपल्या बहिणींकडे 

तुझ्या मनगटी पोहोंचण्या 
राखी 
माध्यम आहे ईश्वरी श्रध्दा

बांधेन राखी मी देवाला 
तुझ्या पर्यंत पोहोंचली 
समजेल मला...

असशील तेथे 
रहा सुखी 
आशिर्वाद कायम आहेत 
तुझ्या पाठी. 

नंदिनी देशपांडे. 

राखी पौर्णिमा,2025.

🌹🌹🌹🌹🌹

शनिवार, २ ऑगस्ट, २०२५

रसग्रहण, डाव मांडून भांडून मोडू नको.

डाव मांडून भांडून
मोडू नको

आणले मी तुझे सर्व मी आणले
सर्व काही मनासारखे मांडले
तूच सारे तुझे दूर
ओढू नको

सोडले मी तुझ्या भोवती सर्व गे
चंद्रज्योती रसाचे
रुपेरी फुगे
फुंकणीने फुगा हाय
फोडू नको

गोकुळीचा सखा तूच केले मला
कौतुकाने मला हार
तू घातला
हार हासून घालून
तोडू नको

काढले मी तुझे नाव
तू देखिले
आणि माझे पुढे नाव
तू रेखिले
तूच वाचून लाजून खोडू नको

#आठवणीतील कविता#

    किती किती विनवणी आहे या शब्दांमध्ये!किती आर्जवं आहेत...एका पतीनं आपल्या संसार मोडावयास निघणाऱ्या पत्नीसाठी....
या गीतातील शब्दा शब्दांमधून या गीतातील नायकाचा (पतीचा)सच्चेपणा जाणवत जातो...
   
    दोघांनी मिळून आनंदानं थाटलेल्या संसारातून त्याची पत्नी,निघून जाण्याचं ठरवते....संसाराचा डाव मोडू बघते,त्या वेळी हा पती आपल्या पत्नीला त्या सुरुवातीच्या साऱ्या आनंदमय गोष्टींची मुद्दाम आठवण करुन देत असतो....

पती तिला एक एक आठवण सांगताना म्हणतो,संसारातली प्रत्येक वस्तू,तुझ्याच पसंतीनं मी आणलेल्या आहेत...त्या साऱ्यांना घेऊन आपण संसार मांडलाय आणि हे सारं तुझंच असताना तू दूर करु नकोस...

प्रिये,तुला मी सारी सुखं उपलब्ध करुन दिली आहेत...
ह्या सुखांना कवींनी दिवाळीत उडवल्या जाणाऱ्या चमकत्या फुग्यांची (झाड) उपमा दिली आहे....पण हे सारं तूच तुझ्या हातानं उध्वस्त करु नकोस...

आपण दोघांनी मिळून उभं केलेल्या गोकुळाचा
(संसार)सखा,सोबती तूच मला कौतुकानं बनवले आहेस,माझ्या गळ्यात वरमाला घालत तू माझी निवड कौतुकानं केली आहेस आणि आता तोच हार (संसार)सोडून तू अशी जाऊ नकोस...

आपल्या लग्नात मीच तुझे नाव देवापुढे लिहून तुला माझी अर्धांगिनी बनवले आहे...तू पण तुझ्या नावापुढे माझे नाव लावत, मला तुझा पती म्हणून स्विकारले आहेस,ते वाचताना तू लाजतही होतीस आणि तेच माझे नाव असे पुसून टाकून जाऊ नकोस....असा मांडलेला संसार भाझ्याशी भांडून तोडू नकोस....

गर्भितार्थानं किती आशयघन असं हे गाणं आहे... लहानपणापासून रेडिओ वर लागलेलं कानावर पडणारं हे गाणं मला त्यातील अर्थही कळत नव्हता पण तरीही आवडायचं...सूर, ताल,लय साऱ्याच बाबतीत सरस असणारं म्हणूनही असेल कदाचित...पण नंतर त्यातला अर्थ समजत गेला आणि हे तर तसं बघितलं तर,मनाला क्लेश करणारं गाणं आहे हे लक्षात आलं...
      या गाण्याचे गीतकार कवी ना.घ. देशपांडे....यांच्याच गावी,मेहकरला वास्तव्याचा योग आला आणि मग त्यांची रचलेली सारीच गाणी आवडू लागली....

नागोराव घनःश्याम देशपांडे.ना.घ.देशपांडे या नावानं मराठी माणसाला परिचित आहेत...
आपलं,एल.एल.बी.
करुन त्यांनी नंतर 'वकिली' व्यवसाय म्हणून स्विकारला...पण बी ए.चं शिक्षण चालू असताना त्यांनी,
"शिळ"ही त्यांची पहिली कविता लिहिली...त्यांच्याच वर्गमित्राने ती गायली आणि ती लोकांमध्ये अतिशय प्रसिध्द झाली...अगदी कविता वाचनाचे कार्यक्रम होऊ लागले...नंतर ती ध्वनिमुद्रित केली गेली आणि येथूनच मराठी मध्ये भावगीतांची परंपरा सुरू होत नावारुपाला आली....
या अर्थानं कवी ना.घ.देशपांडे भावगीतांचे जनक ठरले असे म्हणता येईल...

नंतरच्या काळात त्यांच्या हातून बरंच मोठं काव्यलेखन होत अनेक कविता संग्रह प्रकाशित झाले...ललित लेखनही झालं...
त्यांच्या खूणगाठ या काव्यसंग्रहास ')साहित्य अकादमी' पुरस्कार मिळाला....

साहित्यिक कारकिर्दी शिवाय त्यांनी ईतरही अनेक क्षेत्रात आपले महत्वाचे योगदान दिले आहे....
१९०९मध्ये जन्मलेल्या या कलासक्त व्यक्तिमत्वाचं २०००साली निधन झालं....पण त्यांच्या कवीता,गीतं,त्यांनी स्थापन केलेली शिक्षण संस्था वगैरे अनेक गोषटींमधून ते कायम आठवणीत राहिले आहेत...
अंतरीच्या गुढ गर्भि,
शीळ, मन पिसाट माझे अशी अनेक गाणी आजही प्रसिद्ध आहेत...
बाबुजींनी गायलेली ना घं ची गाणी तर अप्रतीमच!
त्यांपैकीच एक हे काव्य जे नंतर गाण्यात रुपांतरीत झालं....
डाव मांडून भांडून मोडू नको
डाव मोडू नको
डाव मोडू नको.

काव्य वाचा आणि गीतही ऐकाच...

©️नंदिनी म. देशपांडे.

🌹🌹🌹🌹🌹🌹

https://youtu.be/wgdacZ9fd98

शुक्रवार, १ ऑगस्ट, २०२५

रसग्रहण, "हे विश्व प्रेमीकांचे "

#आठवणीतील कविता# 

हे विश्व प्रेमिकांचे!
                    कवयित्री-     शांता शेळके. 

रसग्रहण. 

शांताबाईंची ही कविता,म्हणावी तर,प्रेम कविता किंवा त्या पेक्षा व्यापक अर्थानं सांगायचं झाल्यास,ही प्रेमाचा खरा अर्थ उकलून सांगणारी,प्रेमिकांमधील प्रगल्भ प्रेमाची व्याख्या करणारी कविता...
खरं प्रेम कसं असावं?त्याची महती काय आहे हे शिकवणारी ही कविता....

आधुनिक काळात आजूबाजूला दिसणाऱ्या, प्रियकर आणि प्रेयसीच्या किंवा नवरा बायकोच्या प्रेमातील उथळपणा,गांभिर्याचा अभाव किंवा परस्परांशी समरस न होता स्वार्थ साधण्याची प्रवृत्ती यांवर लगाम घालण्याच्या दृष्टीने खरे प्रेम कसे असते?त्याची महती काय आहे?
याची जाणीव करुन देणारी ही कविता!

   दोन खऱ्या प्रेमिकांची आयुष्य ही दोन वेगळी माणसं असूनही ती, मनानं एकमेकांच्या खूप
जवळ असतात... हे दोन्ही निराळी नसतातच कधी...
ही दोघं जवळ असतात तेंव्हा न बोलताही, शब्दांशिवाय त्यांना परस्परांची मनं वाचत असतात...त्यांना बोलण्याचं कामही पडत नाही....मनाची भाषा मनाला नि डोळ्यांची डोळ्यांना कळते....
एवढे ते मानसिक पातळीवर एकरुप असतात...
परस्परांच्या विरहातही ते सुखी असतात प्रेम करणारी ही दोन माणसं
मुळी वेगळी नसतातच...

माणूस म्हटला की राग लोभ आलाच,पण प्रेमाच्या या विश्वात,रागाला थारा नसतो... वरकरणी दिसणारा राग हा लटका खोटा किंवा लाडिक म्हणता येईल असाच असतो...तो काही क्षणातच विरुन जातो....

ह्या दोन्ही प्रेमिकांना एकमेकांचे भारी कौतूक असते...ते अखंड परस्परांच्या प्रेमात असतात....

प्रेमी युगुल दूर असतील एकमेकांपासून तरीही त्यांच्यात अजिबात दुरावा नसतोच...दूर असूनही परस्परांच्या आठवणींनीसुध्दा ते मोहरुन जातात...हाही एक प्रेमाचा आविष्कार होय!

आपण एकमेकांवर करत असणाऱ्या प्रेमाची खोली त्यांनी जाणलेली असते...
तो आणि ती वेगळी नाहीतच याची होणारी जाणीव त्यांच्या मनाला तृप्त करुन जाते आणि आपले आयुष्य परस्परांच्या सहवासात सार्थकी लागले, याचा बोध त्यांना होतो....
 
खऱ्या प्रेमी युगुलांचे विश्व हे असे जगावेगळे असते...
हिच खऱ्या प्रेमिकांची ओळख आहे...

अगदी साध्या सोप्या शब्दांत प्रेमाची महती सांगणारी ही कविता मनाला भावते...वाचकाला आपल्या प्रेमाचं प्रतिबिंब दाखवते....
मनाने एकरुपकत्व साधणारं प्रेम वासनेला प्राधान्य न देता परस्परांच्या भावभावनांचा आदर करतं...परस्परांचा सन्मान करतं आणि एकमेकांना समजून घेत जीवन व्यतित करतं....
जणू काही शांताबाईंनी प्रेम हे अशा पध्दतीनं केलेलं असावं तरच ते अर्थपूर्ण ठरेल हे सांगण्यासाठीचा हा  दिलेला मंत्रच!

अतिशय प्रतिभासंपन्न व्यक्तिमत्व असणाऱ्या शांताबाई म्हणजे मराठी साहित्याचं एक लेणं आहेत....
कथा,कादंबरी, कविता, चरित्र लेखन,वृत्तपत्रातून लेखन असे सारे साहित्य प्रकार हाताळणाऱ्या त्या एक चतुरस्त्र लेखिका होत्या...
अतिशय सुंदर गीत  रचनांच्याही त्या उद्गात्या आहेत... तोच चंद्र मा नभात,रेशमाच्या रेघांनी,जे वेड मजला लागले,मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश ही कांही उदाहरणे सांगता येतील...
मराठी साहित्यातील विविध पुरस्कारांच्या या मानकरी...
अशा या थोर साहित्यिक  व्यक्तिमत्वाला विनम्र अभिवादन.🙏🏻

नंदिनी म. देशपांडे. 
🌹🌹🌹🌹🌹🌹

कविता. 

असता समीप दोघे
हे ओठ मूक व्हावे
शब्दाविना परंतु
बोलून सर्व जावे

अमृत मीलनाचे विरहातही सुखावे
विश्वाहूनी निराळे
हे विश्व प्रेमिकांचे ।

फसवा वरुन राग
रुसव्यात गाढ प्रिती
होता क्षणिक दूर
वेडी मनात भिती

दिनरात चिंतनाचे अनिवार कौतुकाचे
विश्वाहूनी निराळे
हे विश्व प्रेमिकांचे

दुरातही नसावा दोघांमध्ये दुरावा
स्पर्शाविना सुखाने
हा जीव मोहरावा

ओठी फुलून यावे
स्मित गोड सार्थकाचे
विश्वाहूनी निराळे
हे विश्व प्रेमिकांचे!

शांता शेळके.

🌹

बुधवार, ३० जुलै, २०२५

कवितेचं रसग्रहण. "कढ"

#आठवणीतील कविता#
या शृंखलेतली पाचवी कविता, 

 ‌.    "कढ"

सुप्रसिद्ध कवियित्री,
इंदिरा संत (१९१४-२०००)यांची,
"कढ"
ही कविता आज आणली आहे वाचकांसाठी....

    "कढ", म्हणजे ऊकळी.हा झाला बोली भाषेतील शब्दशः अर्थ....पण कवियित्री इंदिरा संतांना,आपल्याला जाणवत असलेलं एकटेपण नकोसं वाटण्या ईतपत असह्य झालं असावं, म्हणूनच या त्यांच्या एकटेपणाच्या दुःखावेगात ही त्यांची कविता रचली गेली असावी....
     ह्या एकटेपणाला   अगदी कढ येईपर्यंत,तो उतू जाई पर्यंत असह्य होत,मन उद्विग्न झालं आहे हेच त्यांना आपल्या,"कढ"
या कवितेत सुचवायचे असावे...

कवियित्री म्हणतात,
माझी कुणीही निंदा केली,मला नावं ठेवली तरी,मी मात्र त्याला नेहमीच नमस्कारच केला आहे...त्याचे आदरातिथ्यच केले....कुणी आपल्या वागण्यातून माझ्याशी कितीही दुरावा निर्माण केला असेल तरी मी मात्र ते सारं विसरुन त्याचा नेहमी प्रमाणेच
सन्मानच केला आहे...

कोणीही माझ्याशी कसेही वागत गेले तरीही मी मात्र त्यांच्याशी कायम चांगलेच वागावयास हवे
माझा मान सन्मान,माझी अस्मिता,मीपण हे सारं सारं बाजूला सारुन....
कायम दुसऱ्यांकडून मी स्वतः गृहितच धरली जाते...माझ्या अस्मितेची दखल इतरांनी तर नाहीच पण मीही घेऊ नये कारण मीच साऱ्यांची मनं जपावित नेहमीच...

खरं म्हणजे,मी माझ्या आयुष्यात कितीतरी जणांची अन्नाची भूक माझ्या घासातला घास त्यांना देत भागवली आहे...कितीतरी लोकांचं दुःख जाणलंयं त्याना आधार दिलाय,त्यांचे अश्रु पुसले आहेत....

पण माझ्या मनात आज दुःखावेगाचा कढ आलाय अगदी,मला ते सहन होत नाहीए...पण माझं मन,माझं दुःख बोलून हलकं करण्यासाठी,माझे अश्रु पुसण्यासाठी मात्र माझ्याजवळ कोणीही नाही,एक तेवढे आभाळ सोडले तर...आणि मनात दाटून आलेला कढ,हे शल्य जाणून घेण्यासाठी मला साथ आहे ती केवळ या अंधाराची... म्हणूनच हा अंधार सुध्दा कवियित्रींना प्रेमळ वाटतोय...

माणसाला आपण इतरांकडून गृहित धरत जात आहोत ही होणारी जाणीव फार क्लेशदायक असते...त्यात आपलं अस्तित्व अगदीच नगण्य होत चाललंय अशी भावना निर्माण होत जाते...यातूनच एकटेपणाही वाढत जतो...नकोसा होण्याईतपतचा एकटेपणा आपोआप बाहेर व्यक्त होऊ लागतो...त्यालाच आपण कढ आलाय अगदी असं म्हणतो...
प्रत्येकाच्या आयुष्यात अशी परिस्थिती उद्भवू शकते म्हणूनच कोणाजवळ तरी 'व्यक्त'
होणं याला अर्थ प्राप्त झालाय असं म्हणावसं वाटतं...

इंदिरा संतांच्या अनेक कविता स्वानुभवाच्या दुःखावेगातून निर्माण झाल्या त्यातलीच ही एक...

प्रामुख्यानं काव्य आणि कथा लेखन करणाऱ्या या कवियित्रिचं मराठी साहित्य क्षेत्रात स्वतःच असं एक मानाचं स्थान आहे....पती नारायण संतही कवी मनाचेच!दोघांचाही एकत्रित असा,"सहवास नावाचा कविता संग्रह प्रसिद्ध झाला आणि तेंव्हापासून इंदिरा संत वाचकांच्या परिचयात आल्या....
आपली साहित्यिक कारकिर्द घडवताना त्यांनी अनेक काव्यसंग्रह आणि ललित कथा संग्रह लिहिले...अनेक पुरस्कारांच्या त्या मानकरी ठरल्या....
 त्यांची आम्ही लहानपणी शिकलेली बालकविता,
"रंगरंगुल्या सानुसानुल्या
गवत फुला रे गवतफुला"
ही आजही मनात गुणगुणून जाते...
एक थोर कवियात्री म्हणून नावलौकिक मिळवलेल्या या विदुषीला विनम्र अभिवादन....🙏🏻

आज या निमित्ताने मला सांगावयास हे आवडेल की,इंदिरा संतांची नात,मुलाची मुलगी आमच्या कुटुंब सदस्यांपैकी एक आहे....याचा आम्हा सर्वांना मनस्वी आनंद होत असतो नेहमीच...

©️नंदिनी म.देशपांडे.
संवाद.९४२२४१६९९५.

🌹🌹🌹🌹🌹

गुरुवार, २९ मे, २०२५

कढई.

*कढई*

     अहाहा! काय मस्त पाऊस पडतोय. पावसाळी वातावरणातील थंडगार हवा अंगाशी झोंबाझोंबी करतीए...
अशा निवांत संध्याकाळी गरमागरम भजी तेही कांदाभजी खाण्याचा मोह न झाला तरच नवल!
       हं, पण माझं "कांदाभजी", या विषयावर लिहून झालंयं, 
आज मी दोन कानांची पारंपारिक "लोखंडी कढई", या विषयाला अनुषंगिक लिहिणार आहे...
       खरं म्हणजे लोखंडाच्या कढईत केलेली,भजी, पिठलं, ठेचा, खर्डा, किंवा अगदी साधी  
फोडणी सुध्दा फार फार खमंग लागते!जातीच्या खवय्यांना सांगणे न लगे....असो. 
        माझ्याकडे माझ्या आजीच्या,मोठीआई च्या संसारातील छोटीच पण फार जड अशी कानांची लोखंडी कढई आहे...मी ती फार जपून ठेवलीए आणि वापरतेही जपूनच...तिच्याशी माझं भावनिक नातं जोडलं गेलंयं ना....
     लहानपणी मोठीआई च्या हातचं या कढईत लावलेलं थालीपीठ आणि वर उल्लेख केलेले पदार्थ वारंवार चाखले आहेत...शिवाय ती निमित्ताने हातात घेतली की, मोठीआई ची आवर्जुन आठवण येतेच...
       तर लोखंडी आहे म्हणून तिचे महत्व अजिबात कमी होत नाही बरं का...उलट आता नव्याने, लोखंडी कढईत केलेले पदार्थ कसे आरोग्यवर्धक आहेत हे कळू लागलंयं...
पदार्थाच्या खमंगाई बरोबरच,
रक्तातील लोहाचे प्रमाण वाढवण्यात या कढईचा मोठा हात आहे...
       म्हणूनच हल्ली, बिना कानाचे लोखंडी टोपले वजा कढई घेण्याचा "ट्रेंड",वाढत जातोय हे दिसतंयं...
 त्या प्रमाणे मी ही एक मध्यम आकाराची टोपले वजा कढई मुद्दाम खरेदी केलीय...पण पारंपारिक कढईची तिला काही सर नाही...साधे पोहे केले त्यात, तर खाली लागले...बुडात नुसती हलकी, मग कशी असणार?
     मग तर अजूनच मला माझ्या आजीच्या पारंपरिक कढईची महती वाटू लागली...
    तर, असे हे कढई पुराण आता थांबवते. काळाचा महिमा कधी कोणती गोष्ट, वस्तू उजागर होतील हे सांगता येत नाही...त्यातीलच एक अशी कढई!  
           
.....  ©️नंदिनी देशपांडे. 
🌹🌹🌹🌹🌹

सोमवार, १३ जानेवारी, २०२५

हम्पी साम्राज्य.

* हम्पीसाम्राज्य *
----------------------------
        शाळेत असताना पुस्तकाच्या दोन पानात वाचलेला, शिकलेला प्राचीन भारताचा इतिहास आपण खरोखरच या विजयनगर साम्राज्यात प्रत्यक्ष जाऊन बघू असे स्वप्नात देखील कधी वाटले नव्हते....
        एवढा प्रचंड ऐतिहासिक ठेवा हा गृपटूर बरोबर जाऊन समजावून घेणे केवळ अशक्यच...त्यामूळे यूट्यूब आणि गुगल ह्या अधुनिक शैक्षणिक साधनांचे सहाय्य घेवून आम्ही स्वतंत्रपणेच जावे असे ठरवले आणि पुण्याहून थेट रेल्वेने आम्ही नजीकच्या होस्पेट रेल्वेस्टेशनवर उतरलो...होस्पेट ते हम्पी हे अंतर 13 कि.मी.आहे केवळ...होस्पेट येथे रहाण्यायोग्य चांगली हॉटेल्स उपलब्ध आहेत...हॉटेल मध्येच गाड्या भाड्याने मिळण्याचे काउंटर्स (ट्रायव्हल डेस्क)उपलब्ध आहेत तेथे...संपूर्ण हम्पी दर्शनासाठी एखादी गाडी बुक करुन टाकावी...ते बरे पडते...आणि तेथे गाईडची मदत घेणं अनिवार्य आहे....आपण पुस्तकात कितीही वाचलेले असेल तरीही प्रत्येक शिल्पाचा अर्थ उलगडवून सांगताना आपल्याला नव्या दृष्टिने शिल्प अभ्यासल्याचा प्रत्यक्ष अनुभव आपल्या जाणीवा समृध्द करत जातो....
      छोट्याशाच असतील तरीही एकेका शिल्पाचे असंख्य कंगोरे आपण निरखत असतो तेथे...
        कर्नाटक शासनाचे मला फार कौतूक वाटले की, त्यांंची पर्यटकांसाठी गाईड म्हणून काम करणारी माणसं,अभ्यासपूर्ण माहिती असणारी आहेत...वारंवार त्यांचे या संदर्भातील ज्ञान अत्यंत अपडेट करण्यासाठी त्यांना व्यवस्थित प्रशिक्षण दिले जाते...
हिंदी, इंग्लिश आणि कर्नाटकी भाषेत माहिती सांगणारे हे गाईड्स आहेत...आपल्याला हवा तो गाईड सोबत ठेवावा....अतिशय वाजवी दरात हे गाईड येथे उपलब्ध असतात...
       
       बाय रोड जावयाचे असेल तर सोलापूर मार्गाने विजापूर बदामी हम्पी असेही जाता येते...रोड एकदम टकाटक आहेत!असो.

          संपूर्ण हम्पी मधील ऐतिहासिक ठेवा,समजून उमजून बघावयास कमीत कमी तीन ते चार दिवस निश्चित हवे....
        या विशाल मंदिरांपैकी एक कृष्णमंदिर आहे...राजा कृष्णदेवरायांनी चौदाव्या पंधराव्या शतकात हे मंदिर बांधल्याचे दाखले मिळाले आहेत...
      हे मंदिर संपूर्णपणे भगवान विष्णूंना समर्पित आहे....या मंदिरातील सभा मंडपाच्या सर्व खांबांवर आणि छतावरही महाभारत आणि भागवतातील कथा ,एक एक प्रसंग कोरलेले दिसून येतात...मला सर्वात आवडलेले शिल्प, यशोदा मैय्या रवीने ताक घुसळते आहे आणि बालकृष्ण भोवती लोण्यासाठी घुटमळतो आहे...लंगडा (रांगता बाळकृष्ण सुध्दा फार देखणा आहे...एक ना अनेक ही शिल्प बघताना अख्खे महाभारत डोळ्यासमोरून सरकत जाते आपल्या....गाईडची खरी गरज, शिल्पांच्या विश्लेषणासाठीच आहे...
        
          दुसरे एक मंदिर, जे उत्खननात सापडले आहे...कारण ते पूर्णपणे जमिनीत गाडले गेलेले होते, ते "भुयारी महादेव (शिव)मंदिर " जे आजही जमीनीच्या पोटात आहे आणि बर्‍यापैकी चांगल्या अवस्थेत आहे...येथील महादेवाची पिंड ,गाभारा, सभामंडप, नंदी सारेच विशाल आणि नतमस्तक व्हावयास लावणारे आहे....हे एवढे मोठे कसे काय गडब झाले असेल?याचे आश्चर्य वाटत रहाते...

      क्षेत्रफळाच्या दृष्टिने सर्वांत व्यापक असे आणखीन एक सुंदर मंदिर आणि उत्कृष्ट शिल्पकलेचा नमुना म्हणजे, हम्पी येथील "विठ्ठल मंदिर "
           आपल्याला विठ्ठल मंदिर म्हटले की आपली पंढरपूर नगरी आठवते पण याच पंढरपुराचा आपला विठोबा-रुक्मिणी मुळचे हम्पीमधील आहेत!ऐकून आश्चर्य वाटले ना?
     लगेच कानडाऊ विठ्ठलू कर्नाटकू किंवा कानडा राजा पंढरीचा असे संतांनी का म्हटले असावे?याचा बोध होतो!
        हे मंदीर निरिक्षण करताना आपली नजर सतत प्रत्येक शिल्पातून आपल्या विठोबाला शोधत असते....मंदिरात प्रवेशताच "देव देव्हार्यात नाही, देव नाही देवालयी" या सुधीर फडकेंच्या गाण्याच्या ओळी अगदी नकळत ओठांवर येतात आणि मन खट्टू होते आपले....
    हे एवढे मोठे वैभव सोडून देव पंढरीत का दाखल झाले असावेत?असा प्रश्न पडतो...पण कालिकतच्या लढाईत मुस्लीम शाह्यांनी हिंदू मंदिरांचे, मुर्तिंचे सहा महिनेपर्यंत जेवढे करता येईल तेवढे नुकसान केले होते ,आणि याच काळात मूळ गाभाऱ्यातील मुर्ति सुरक्षित रहावी या हेतूने ती त्यावेळी कोणीतरी पंढरपुरात स्थलांतरित केली असावी हा माझा अंदाज आहे...
आणि असे झाल्यामुळेच आज पंढरीचा विठोबा अख्ख्या महाराष्ट्राचे दैवत आहे!
        तर,हम्पीतील या विठ्ठल मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळच आपल्याला पंढरपुरात असणाऱ्या विठ्ठलाच्या आणि रुक्मिणीच्या छोट्याशा मुर्तीचे शिल्प कोरलेले स्पष्ट दिसते...
येथेही विठोबा आणिक रुक्मिणीची ही शिल्प परस्परांपासून दूरच आहेत आणि वठोबाच्या वामांगीच रुक्मिणी आहे! हे बघूनच या दोघांच्या मुर्तिंची प्राणप्रतिष्ठा पंढरपुरात त्याच रचने प्रमाणे केलेली आहे असे गाईडने सांगितले..... याला  ही शिल्प बघून पुष्टी मिळते...
       हे मंदिरही भगवान विष्णूंना समर्पित आहे....
   
         याच परिसरात कलाकारांसाठी एक मोठे,अप्रतिम सभागृह आहे...त्यातील सर्व रचना म्हणजे स्थापत्यशास्त्रातील ज्ञानाचा त्या शिल्पकाराने गाठलेला परमोच्च बिंदू म्हणता येईल...
       प्रत्येक खांबातून सप्तसुरांचे आणि निरनिराळ्या तंतू वाद्यांचे सूर त्यातून प्रतिध्वनीत होतील अशी नियोजनबद्ध रचना केलेली आहे...शिवाय हे सूर दीड कि.मी. लांब पर्यंत प्रतिध्वनीत होऊन ऐकू यायचे असेही म्हटले जाते...यांतील कोणत्या खांबातून कुठल्या प्रकारचा किंवा कोणत्या वाद्यांच्या सुरांचा नाद निघतो?यासाठी त्या विशिष्ट ठिकाणी ते ते वाद्य हातात घेतलेल्या कलाकारांची अप्रतीम शिल्प येथे बनवलेली आहेत!
    किती प्रगत होते हे सारे!!

        खरोखरच हा हम्पीतील साराच वैभवाचा ठेवा अक्षरशः अनुपमेयच आहे....शब्दांची कितीही उधळण केली तरी सांगता येणारच नाही...प्रत्यक्ष बघून डोळ्यात साठवून ठेवावे असेच आहे सारे!

      विठ्ठल मंदिर परिसरातच आणखी एक छोटेखानी  पाषाणरुपी सात स्तरांचे  सुंदर असे रथस्वरुपातील गरुडाचे मंदिर आहे...अतिशय लोभस आणि शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना आहे हेही मंदिर!
      भगवान विष्णूंचे वाहन गरुड आहे असे मानले जाते...आपण आत्तापर्यंत गरुडाचे रुप पक्षीरुपातच कल्पिलेले आहे...पण येथे आपल्याला मनुष्यरुपातील गरुडमुर्तिचे दर्शन होते....अगदी विष्णूदेवतेला साजेसा असाच शाही आणि विलोभनीय रथरुपी या मंदिराला,त्यात आरुढ होण्यासाठी छोटीशीच पाषाणशिडीही आहे आणि आतमध्ये मानवरुपी गरुड सारथी म्हणून उभे आहेत...अगदी बघतच रहावे असेच हे शिल्प!
युनेस्कोने उगाचच निवड केलेली नाही, जागतिक प्राचीन वारसा यादीमध्ये या शिल्पाची ,याची खात्री पटते आपल्याला...
      आणि आपल्या पण्णास रु.च्या नोटेवर याा चित्राला मानाचे स्थान मिळालेले दिसून येते...
      लेखाच्या सोबतच यातील संदर्भानुसार असणारे काही छायाचित्र मी पोस्ट केलेले आहेत....जे मी मोबाईलच्या माध्यमातून काढलेली आहेत...

       उपरोक्त मंदिरांशिवाय हम्पी येथेच राण्यांसाठी बांधलेलं विशाल स्नानघर जे ओपन टू स्काय आहे....अप्रतिम कोरीव बांधणीची पुष्करणी, हम्पी बाजार, राजपरिवारासाठी प्रासंगिक कार्यक्रमासाठी बसण्याचे व्यासपीठ, हाथीघर आणि त्यासोबतच माहूतांच्या रहाण्याचे ठिकाण,राजाची तुला ही ठिकाणंही नोंद घेवून बघण्यासारखी आहेत...

        याशिवाय मला आवडलेली आणखी एक वास्तू म्हणजे "लोटस महल"...जे इंडोईस्लामिक रचनेतून बांधलेली आहे...अत्यंत सुंदर, कलात्मक पध्दतीने आणि उन्हाळ्यात कायम थंडावा मिळेल अशा एअरकुलिंग रचनेत बांधलेली ही वास्तू आकाराने कमळाच्या फुलाशी साधर्म्य सांगते...म्हणूनच हा "लोटस महल"....

           अंजनाद्री पर्वत,जेथे हनुमंताचे जन्मस्थान आहे. ...तेथे ट्रेक करत बाल हनुमानाच्या मुर्तिचे दर्शन मन प्रसन्न करते. ...उंचावरुन हम्पीचा व्ह्यू फार छान दिसतो. ..

           तर अशी आमची हम्पीची सहल कायम स्मरणात राहिल अशीच पार पडली....प्राचीन इतिहासाची उजळणी होऊन हा ठेवा आम्ही डोळेभरुन बघितला, डोळ्यात साठवून ठेवला आणि कृतार्थ भावना मनात घेऊन दुसरे दिवशी सकाळी बदामीकडे प्रस्थान केले....जाताना रस्त्यात लागणाऱ्या आयहोळे आणि पट्टक्कल या ठिकाणी असणारा मंदिरांचा समुह जो बघण्यासाठी चुकून नये अजिबात,तो गाईड सह बघितला समजून घेतला आणि सायंकाळपर्यंत बदामी मुक्कामी पोहोचलो....
    या नंतरच्या लेखात तेथील पहाडांमध्ये कोरलेल्या भव्य अशा शिल्पांविषयी लिहिनच....

©️ॲड.नंदिनी म. देशपांडे.
nmdabad@gmail.com 

🌹🌹🌹🌹🌹