मंगळवार, २७ ऑगस्ट, २०१९

आयुष्य.

*आयुष्य*

    माणसाचं जीवन किंवा आयुष्य म्हणजे शेवटी काय असतं....तर सोबत येताना घेऊन आलेल्या श्वासांचं गणित...‌.एका श्वासाचं अंतर वाढलं तर मांडलेल्या गणिताचं उत्तर शून्य रहातं.....

    तर हे श्वास आपण कसे,कोणत्या पध्दतीनं घ्यायचे यांचं नियोजन केवळ करणं आपल्या हातात....हेच श्वास अव्याहत घेत असताना या आयुष्याच्या प्रवासात सहवासात,सोबत असणाऱ्या लोकांशी,आप्त स्वकियांशी आपण कसे वागतो,बोलतो,त्यांच्या वर प्रेम आपुलकी चा वर्षाव करतो.....किती सत्कर्म करतो,किती प्रमाणात दुसऱ्यांना मदत करतो आणि किती प्रमाणात स्वतःशी प्रामाणिक राहून स्वतः आनंद घेतो आणि दुसऱ्यांना आनंद देतो....आनंदाच्या लावलेल्या या रोपट्याची जोपासना करत त्याच्या छायेखाली किती जणांना सामावून घेतो आणि स्नेहाच्या फुलांची शिंपण घालतो.....या सर्व निकषांवर आपणच आपल्या आयुष्याची प्रत ठरवत असतो....

म्हणूनच मित्र मैत्रिणींनो,ह्या श्वासांचे गणित मांडून ते यशस्वीपणे सोडवण्यातच खरे कसब,असे म्हणता येईल....हे कौशल्य ज्याला जमले तो आयुष्यात बाजी मारुन यशस्वी झाला...नि,ज्याला जमले नाही तो कायम जीवनानंदाला मुकला...असेच म्हणता येईल....
  
   शेवटी प्रत्येकाच्या श्वासाचा संग्रह संपला की उरणार तो फक्त शुन्यच असेल हे निर्विवादपणे पूर्णसत्यच....

     केवळ आपल्या मागे कांही दिवस तरी आपले नाव काढत आठवणीतील क्षणांचे स्मरण कोणी केले, तर आपण जीवंतपणी मिळवलेले सुखानंदाचे क्षण नंतर काही दिवस त्या उडालेल्या आत्म्याला एक समाधान देऊन जातात...हिच काय ती आपल्या आयुष्यात आपण कमावलेली पुंजी....बाकी काय!!!

बाकी मग आहेच,

जन पळभर म्हणतील हाय हाय।
मी जाता राहिल कार्य काय ।
जन पळभर म्हणतील हाय हाय ।

©
*नंदिनी म. देशपांडे*

🌹🌹

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा