शुक्रवार, ७ जून, २०१९

सापडला हो ऽ सापडला.

आज जागतिक पर्यावरण दिन.पर्यावरणाच्या संवर्धनासाठी थोडासा प्रबोधनात्मक असणारा माझा एक जुनाच लेख अनेक शुभेच्छांसह.... सर्वांसाठी....🙏🏻

*सापडला हो ऽऽ सापडला !!*
🌧🌧🌧🌧🌧🌧

     कोण हरवला? काय विचारता ? अहो  आपला पाऊस. अबाल वृध्दांपासून साऱ्यांचाच लाडका असणारा. आठवतयं का, गेली दोन महिने तो फिरकला सुध्दा नाही. आमच्या भागाकडे! नाही म्हणायला या वर्षी त्याने एंट्री मात्र झक्कास घेतली होती. अगदी शिस्तीमध्ये शहाण्या मुलासारखे मृगाच्या दिवशीच अवतरला. आणि कोण आनंद झाला साऱ्या जीवसृष्टीला!अंगाची काहिली कमी करण्यासाठी लहान थोर मंडळी मनमुराद भिजली ना या पावसाखाली ! किती आनंद दिला त्याने सर्वांनाच!
    शहरी मंडळींना आता गर्मीचा त्रास कमी होईल म्हणून हुश्श वाटले, तर ग्रामीण भागात काऴी आई त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसलेली, पाऊस धारांनी सुखाऊन गेली.किती किती म्हणून साठवून ठेवू  ढगांनी या दिलेल्या दानाला असे झाले तिला.
   शेतकरी राजा वेळेवर आणि संपूर्ण नक्षत्रभर व्यवस्थित बरसणाऱ्या या जलधारां कडे बघून किती समाधानी दिसत होता म्हणून सांगू ! बरसणा-या प्रत्येक थेंबागणिक तो देवाचे आभार मानत असावा.एवढी तृप्ती त्याच्या चेहराऱ्यावर ओसंडून वाहताना बघून, खरंच या निसर्गाचे आभार मानावे तेवढे कमी असे झाले होते.
   बळीराजा जोमाने शेती च्या कामाला लागला होता. वेळेवर पेरण्या पूर्ण करून तो आषाढीला पांडुरंगाची वारी मोठ्या भक्तीभावाने करून आला. तोपर्यंत त्याच्या शेतातील पिकं आपला लुसलुशीत पोपटी हिरवेपणा दाखवत आनंदाने बागडत डोलत होती. ही बाळं पाहून  तो हरखून गेला आणि त्यांच्या योग्य निरोगी वाढीसाठी त्यांना जास्तीचे शक्तीवर्धक औषधी तालूक्याच्या ठिकाणाहून आणण्याच्या लगबगीला लागला.
   आपण केलेल्या मेहनतीचे चीज डोळे भरुन बघताना , तो कित्तेकदा धरणी मातेच्या पायावर नतमस्तक झाला आणि आभाळाकडे मान वळवून या पाठवलेल्या आभाळ मायेसाठी मुजरा केला त्याने  याला कांही गणतीच नव्हती.      मशागतीच्या कामात आणखी एक महिना कसा निघून गेला ते त्यालाच कळले नाही....
       शहरी भागात पिण्याच्या पाण्याचा पुरेसा साठा धरणांमध्ये जमा झालाय हे एेकून ,वाचून मंडळी निर्धास्त झाली होती. कांही जण जमिनीतील पाण्याची पातळी वाढली आहे व बोअरवेल ला मुबलक पाणी आलंय या आनंदात पावसाळी सहली काढण्याच्या तयारीला लागली होती .....ज्या भागात जास्त पाऊस पडतोय त्यानुसार सहलींना भरती येऊ लागलेली दिसू लागली....
   असे सारे चालू असताना आपल्या भागात , अर्थातच माझ्या  मराठवाड्यात गेली दिड दोन महिने अगदी कोरडी गेली आहेत. निगा राखलेले हातचे चांगले पीक करपेल की काय ? या चिंतेने शेतकरी राजा ग्रासून गेला...त्याला खाल्लेला घास देखील गोड लागेना . तो सारखे आभाळाकडे डोळे लावून बसू लागला....कोरडा दुष्काळ येईल की काय ? याची भिती त्याचे मन पोखरु लागली....
    शहरी भागातही पावसाच्या गायब होण्यावर चर्चा होऊ लागली . महागाई आ वासून तोंड उघडेल अशी भिती वाटत असतानाच, "असे कसे घडेल ? त्याला काळजी आहे ना , मागच्या वर्षी नाही का आला वेळेवर ? याही वर्षी सुरुवात चांगली केली त्याने , नाही दगा देणार ..." असे संवाद कानावर येऊ लागले....
    शेतकरी राजा त्या वरुण राजाचा धावा करत , "कुठे हरवलायंस रे बाबा ?
आमच्या कडची वाट सापडतं नाही का तुले ? कुठे शोधावं रे बाबा तुले आता ? असा अंत बघू नकोस रं...औंदाच्या साली तरी  भरपूर पिकू दे रं , खरीप बी अन् रब्बी बी ....आरं तुझ्या जीवावर तर  लग्न ठरविलंय नं पोरीचं....तुच आसा हर्यूलास तर कसं व्हईल ? बरस रे बाबा आता लवकर ,"अशा आर्जवी स्वरात विनवणी करताना दिसत होता ......
     शहरी व ग्रामिण मंडळींची अशी धास्तावलेली गप्पाष्टकं चाललेली असताना पाऊस बिचारा गोंधळून गेला होता....गर्दीच्या ठिकाणी लहान बाळाने वडिलांचा धरलेला हात सुटल्यानंतर त्याला कसे भांबावले पण येते तसे झाले त्याचेही....वाऱ्याच्या संगतीने त्याचे वडिल म्हणजे ढग , यांनी आगेकूच केली नि ,पाऊस बापडा जाऊ लागला त्यांना शोधत शोधत वाट मिळेल तसा....आमची होणारी मनाची घालमेल त्याला का कळत नव्हती ? पण इकडे जाऊ की तिकडे ?या प्रश्नात हे बाळ अडकून पडलं होतं .....शिवाय वारा नि ढग यांच्या शिवाय ते काहीच करु शकत नव्हते....यांच्या मदतीची वाट बघत आपल्याकडे परतून येण्याचा रस्ताच विसरलं हे गोजिरवाणं लेकरु... त्यात त्याची तरी काय चूक ?
     आपल्या वृक्षतोड धोरणामुळे त्याला म्हणजे पावसाला बिचाऱ्याला दिशा दर्शक वारेच मिळत नव्हते ,आपल्या कडे येताना.सर्वत्र सिमेंटची जंगलं ,मोठ्या मोठ्या वृक्षांची वानवाच झालेली....
  प्रखर होत सुर्याने आग आेतायला सुरुवात केली की त्याला थोडा तरी बांध घालावयास झाडेच राहिली नाहीत ....मग काय ? वाराही नाही ,ढगही नाहीत अन् पाऊसही नाही ....हे चक्र आपणच तर चालू केलंय ना ? मग काय अर्थ आहे त्याला दोष देण्यात ? तरीही तो अंतर्यामी सर्वांना सारखेच लेखतो म्हणून बरे ,तो सर्वांचीच काळजी घेतो म्हणून दोन महिन्या नंतर का असेना ,पण वेळ निघून जाण्या पुर्विच ,बळीराजाच्या सणाच्या अगदी तोंडावर ,पोळ्याला त्या पर्जन्य देवतेनं  शेतकरी राजाला भरभरून पाऊस दिला .....त्याला खुष केले नि त्याच्या तोंडचा घास गोड करत ,त्याला पोटभर पुरणपोळीचे जेवण करु दिले ....सार्यांनाच सुखावत पुन्हा एकदा सृष्टिला अभिषेक घडवला ....
      खरंच , म्हणूनच तर हरवलेला पाऊस सापडला परत असं म्हणावसं वाटलंय मला सुरुवातीलाच...
   देवा कसे आणि किती आभार मानावेत रे बाबा तुझे , अशीच कृपादृष्टि असू दे रे तुझ्या या लेकरांवर ......

©नंदिनी म.देशपांडे.

२२ आॅगस्ट ,२०१७.
आैरंगाबाद.

🌧🌧🌧🌧🌧🌧🌧

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा