शनिवार, १ जून, २०१९

आमरस.

*आमरस*

     आमरस आणि अक्षयतृतीया यांचे नाते फार प्रिय आणि घट्ट! या दिवशी चैत्रगौरी पुढे आंबा ठेवला की मग, सुसाट वेगाने जेवणावळीत आमरसाच्या फैरी हातात हात  धरुन नाचू लागतात.येथूनच आंब्यातील माधुर्य आपल्यातील गोडवा अधिक व्दिगुणित करत जातो. अगदी सुपर फास्ट एक्सप्रेस प्रमाणे!
     आंबा,फळांचा राजा किती लोभस रुप!हिरव्या कंच कैरी पासून ते पिवळा धमक आंबा आकाराला येईपर्यंतचा काळ खरंच फार जीवघेणाच! कधी एकदा आंबा त्या चैत्र गौरीला नैवैद्य म्हणून ठेवला जातो आणि मग आपल्या जीभेला चाखायला मिळतो याची चातका प्रमाणे वाट बघावयास लावणारा हा वेळ.
      हे लोभस, आकर्षक , रसरशीत फळ आवडत नाही असे म्हणणारा माणूस या भूतलावर आणखी जन्माला आला असेल हे म्हणणे फार धाडसाचे ठरेल.
     किती किती म्हणून सांगू याची रुपं आणि नावं !
      कोकणचा राजा हापूस याचे करावे तेवढे कौतूक कमीच.आकाराने मध्यम ते मोठा तयार झालेला असा हा सोन्यालाही लाजवेल अशी पिवळाई लेऊन येतो! रुपाने आकर्षक शिवाय साखरे पेक्षाही गोड व टिकणारं हे फळ.रस श्रीखंडा सारखा दाट!तोंडाला सुटलं ना पाणी!
    त्या खालोखाल ‌केशर! थोडेसे लांबट  हिरवट, कोकण सोडून उर्वरित महाराष्ट्रभर‌ आपला डौल राखून लोकप्रिय असणारे हे फळ! आणि रसाला अगदी केशर लावलाय जसा असा केशरी रंगाचा!चवीला खूप गोडवा अणणारा!
      पायरी, कितीही पिकला तरी आपला आवडता हिरवा कंच रंग न सोडता थोडासा आंबट पणा सोबत ठेवणारं हे थोडं फसवं फळ.आपला स्वाद टिकवून ठेवणारं हे फळ मला एखाद्या खट्याळ मुलाप्रमाणे भासतं !
   पिवळा,तांबडा,हिरवा असा रंगीबेरंगी पोशाख करत येणारा लालबाग. आपली आब राखत वावरतो.किंचित आंबटगोड चव जिव्हेची लज्जत वाढवत रहातो!
     या शिवायही अनेक अनेक जाती आहेत आंब्याच्या!प्रत्येकाची आपली अशी वेगवेगळी अशी खास वैशिष्ट्यं जपून ठेवली आहेत ज्यानं.
      माझ्या लहानपणी खोबरा नावाचा एक आंब्याचा प्रकार होता.आकाराने अर्धा ते एक किलोचा ,हिरवाच रहायचा शेवट पर्यंत पण फार गोड.
     पातळ सालीचा,पातळ रसाचा मध्यम आकाराचा पण साखरे सारख्या रसाचा हा एक प्रकार. फार आवडायचा आम्हाला.
     अगदी छोटी गोटीच नाव तिचं!हा आंबा म्हणजे जातायेता खाण्याचा.अगदी छोटी चिप वाटावी अशी कोय असणारा हा ,एका बैठकीत सहज २५-३० फळांचा फडशा पडायचा!
     शेपा हा आंबा सहसा कुणालाच आवडायचा नाही.शेपू सारखा वास येणारा म्हणून शेपा.
    शिवाय बादाम तोतापूरी या प्रकारातील आंबे सर्वांत शेवटाला पर्यंत तग धरुन उभे रहातात आणि आपले महत्व वाढवतात.
     "आमरस,"केवळ नाव काढले तरीही तोंडाला पाणी सुटेल असं पक्वान्नाचं राजेशाही रुप!दर वर्षी मे आणि जून चे पंधरा दिवस आमरसा शिवाय जेवणाची मजाच नाही!
      साध्या पोळी बरोबर रस तर असतोच,पण पुरणपोळी बरोबर किंचितसा आंबट रस याची बातच न्यारी!काय चवदार लागतो म्हणून सांगू! सोबतीला कांदाभजी,कुरुडी,पापडी व्वा!
     तिकडे वैदर्भिय, भातावर आणि उकडलेल्या शेवयांवर आमरस टाकून खातात!ज्याची त्याची आवड बाकी काय?त्यांना असे का आवडत असावे?याचे कारण मला तरी आणखी सापडलेच नाही.
    आमरसाबरोबर धपाटं, थालिपीठ हे कॉम्बिनेशनही भाव खाऊन जाणारं!
    ‌आंब्याच्या दिवसात रोज आमरसावर ताव मारुन झाला तरीही,आंबा बर्फी,आंबावडी,आंबापोळी,आम्रखंड आंब्याचा जाम,साखरांबा,गुळांबा असे अनेक चवदार पदार्थ आपली हजेरी देऊन जातात,आंब्याच्या सरत्या दिवसांत!आणि जिव्हेचे चोचले पुरवतात माणसाच्या.
     आंब्याच्या या दिड दोन महिन्यात रसाळीच्या जेवणाची चंगळ असायची अगदी.हल्ली हळूहळू मागे पडत चाललंय हे थोडसं,पण खरंच, ही पध्दत पुनरुज्जिवीत करायला हवी.या निमित्ताने आपल्या घरी आप्तेष्टांना जेवावयास किंबहूणा चार दिवस रहावयासही बोलावणे,आपणही त्यांच्याकडे जाणे या गोष्टी फार आनंद देऊन जायच्या.या पध्दतीने आमरसाच्या वाट्या लागोलाग फस्त करण्या ऐवजी कापलेल्या आंब्याच्या कांही फोडी डिश मध्ये घेऊन खाण्याचे दिवस आले आहेत असे वाटतेय!
    पूर्ण पिकलेला आंबा माचून त्याचा रस तोंडाने चोखून खाण्यातील मज्जा आम्ही अनुभवलीए!काय बहार यायची या वेळी!
  हल्ली असा पध्दतीने आंबा खायचा असतो,या साठी मुलांना प्रात्यक्षिक करुन दाखवावे लागते मात्र.
      आंब्याच्या रसाने माखलेले तोंड हल्लीच्या मुलांनी बघितले तर,"इऽऽऽ"म्हणत ते गावंढळ ठरवतात आम्हाला.
    हल्ली मुलांकडे आंबा खाताना बघितलं की अक्षरशः कणव येते मनात दाटून. वाटतं,आपण कित्ती श्रीमंत होतो,अगदी मोठ्या घमेल्यात मध्यभागी आंबे ठेवून गोल फेरीने त्या भोवती बसत,आंब्यांचा समाचार घेतलेली आपली पिढी कुठे? आणि ही आजची पिढी कुठे?
     आपलं बालपण अगदी सुखनैव,वैभवी आणि अर्थातच मोहोत्सवी!आठवणीत का असेना पण पुन्हःपुन्हा आठवावे असेच....म्हणूनच म्हणावेसे वाटते,

" फळांच्या राजाची मिजास भारी

आंमराईचे वैभव असावे घरी

आंब्याच्या आढीची गोष्टच न्यारी

सुवासाचा दरवळ घरभर पसरी

आंबा मोहोत्सव असावा घरोघरी

जेवणाच्या पंक्तित रसाळीच्या फैरी

माणसांना जोडणाऱ्या
रसाळीच्या फैरी.

*नंदिनी म.देशपांडे*.

‌.🥭🥭🥭🥭🥭🥭🥭🥭🥭🥭🥭

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा