शनिवार, २८ जुलै, २०१८

हासू ,एक निसर्ग दत्त अलंकार.


*हसू, निसर्ग दत्त  अलंकार*

        दररोज    सकाळी उठल्यानंतर फुरसतीच्या वेळात मोबाईल हातात घेतला की, की ढीगभर तरी गुड मॉर्निंग चे मेसेजेस असतात. त्यात किमान पाच-सहा मेसेजेस तरी “स्माईल” या विषयावर .असतातच. त्यातून हसू येणे याचे वेगवेगळ्या पद्धतीने महत्त्व पटवून दिलेले असते.तसेच हसणे ही प्रक्रिया मानवी आरोग्यासाठी किती उपकारक आहे, याची जाणीव करून दिलेली असते.
      थोडेसे मंथन केले तर असे वाटते, अरे हे सारं आपल्याला माहीतच आहे , यात नवीन ते काय? पण मानवाच्या याच हसण्याला शास्त्रीय आधार किती आहे? याची हास्यक्लब सारख्या सामाजिक संस्थांच्या कडे बघितलं की खरोखर महती पटू लागते. तसे बघितले तर हसू आणि आसू या आयुष्याच्या दोन बाजू. जशा एकाच नाण्याच्या दोन बाजू. काळाच्या हाती असणार्‍या नियती रुपी बाहुलीने हे नाणं जसं खेळवलं असेल त्यानुसार आपल्या आयुष्यातील कोणती बाजू वर येईल हे कोणाला सांगता येत नाही.
      अश्रुंची महती विशद करताना,माणसाचा भूतलावरील प्रवेशच मुळी त्याच्या रडण्याचा आवाज सहित होतो हेच रडू पण त्याच्या इतर आप्त स्वकीयांच्या ओठावर, मुखावर हास्याची चंद्रकोर  फुलवत जाते,याचा त्या जीवाला थांगपत्ता नसतो. म्हणूनच हसू आणि आसू या एकाच नाण्याच्या दोन बाजू.
      छोटेसेच बाळ जेव्हा शांत झोपलेले असते, तेव्हा कौतुकाने त्याचे मुखन्याहाळत असताना बाळ झोपेत हासत आहे असा सारखा भास होतो.त्याच्या चेहऱ्यावरचे गोजिरवाणे, लोभस हास्य नजरेने टिपत रहाणे हा घरात बाळ असताना मोठ्यांना लागलेल्या छंद होऊन बसतो.
      बाळाच्या वाढत्या वयाबरोबर एखाद्या फुलाप्रमाणे त्याच्या जाणीवांची एक एक पाकळी उमलत जाते. जसे बोलता येईपर्यंत रडून एखादी मागणी पूर्ण करून घेणे त्याला जमते तसेच, एखाद्या कृतीतून त्याला मजाही येते त्यातून त्याला आनंद मिळू लागतो तसा त्याच्या हसण्यात एक निरागसपणा, खळखळणारा त्याच्या हास्याचा धबधबा त्याच्या एवढाच इतर मोठ्या माणसांनाही निखळ आनंद देऊन जातो. आणि म्हणूनच हवाहवासा वाटतो मन मोहून टाकतो. ही झाली हसण्याची आनंददायक अनुभूती.
 वाढत्या वयाबरोबर हसण्यातून निखळ आनंद मिळत नाही असे नाही, पण निरागस हसणे मात्र कमी कमी होऊ लागते. बाल्यावस्थेत तर हसण्यातून ऊर्जा मिळते. त्यातूनच सवंगड्यांची टिंगल-टवाळी काढत काढत हास्याचे फवारे उडू लागतात. मुलांना मजेचा हा ऊर्जास्त्रोत त्यांना खेळण्यातून होणारा शारीरिक ताण नाहीसा करतात.
     मानसिक समज येऊ लागली की मग लक्षात येते की,किती रुपं आहेत या हसण्याची ! आनंद घेण्यासाठी, परिस्थितीतील ताण कमी करण्यासाठी एखाद्याला दिलासा देण्यासाठी, उसने आणलेले हसू असो किंवा विनोद बुद्धीने बोलल्यामुळे पटकन बाहेर पडणारे हसू ही सुद्धा रूपच ना त्याची? विकट खुनशी हसण्यातून सूडाची भावना प्रकट होते. एखादे दृश्य, एखाद्या माणसाच्या दुसऱ्या कुणा समोर होणाऱ्या फजिती मुळे येणारे हसू  हे सारे हास्याचेच अविष्कार.
            आपले हसू,हसणे ही दैवी देणगी माणसा जवळ नसती, तर आपले आयुष्य किती नीरस, रटाळ, उदासवाणा आणि गंभीर बनले असते नाही?अनेक भावनांची मांदियाळी मानवी मनामध्ये जोपासली गेली असल्यामुळेच रडणे किंवा हसणे या त्याच्या कृतींना काहीतरी अर्थ आहे. तसे नसते तर हे दोन्हीही अर्थहीन बनले असते खचितच.
        वर सांगितल्याप्रमाणे आनंद या भावनेचे सादरीकरण घडत असताना, आपोआपच आपल्याला हसू येते. ते प्रसन्नतेचे  द्योतक असते त्यावेळी. म्हणूनच आपल्या जवळच्या व्यक्तीला मिळालेले शैक्षणिक यश असू दे किंवा व्यावसायिक, आपल्या मुखावर समाधानयुक्त आनंदाचे हास्य प्रदर्शित होते. 
   एकदा माझ्या एका मैत्रिणीचा फोन आला मला,’ आपले ठरले होते ना शॉपिंग ला जायचे,मला नाही जमणार गं आज.’ असे ती म्हणाली. मी कारण विचारले तर तिने घरात पाय घसरून पडल्याचे सांगितले. तिच्या केवळ सांगण्यानेच ‘ते’ चित्र डोळ्यासमोर उभे राहिले. आणि सर्वात पहिली प्रतिक्रिया माझ्या हासण्यातून मिळाली तिला.  तिकडून आवाज आला, ‘अगं, मला येथे खूप  दुखतंय, आणि तू काय हसतेस?’ कोणतीही व्यक्ती अचानक वाकडीतिकडी पडल्यानंतर बघणाराल्या सर्वात अगोदर अगदी सहजपणे पटकन येणारी प्रतिक्रिया असते ती हसूच. एवढेच नव्हे तर आपणच कधीकाळी सायकलवरून पडलो होतो आणि संपूर्ण धुळीने माखलेलो होतो आपले हे वेंधळे रूप आठवले की, आपलेच आपल्याला आजही हसू आवरता येत नाही. पडणाऱ्या  व्यक्तीला समज कमी असेल तर राग येऊ शकतो. पण समजदार माणूस मात्र अशा  हसण्याकडे कानाडोळा करण्यातच शहाणपण मानतो. तर असे हे प्रसंग काही अंशी विनोदी दृश्य किंवा विनोद निर्माण करतात. तसेच झालेल्या प्रसंगाचे चित्रण डोळ्यासमोर उभे करताना, सांगणारा रंगवून रंगवून सांगतो आणि आपसूकच हसू अनावर होते कधीकधी. अशीच गत होते,जेंव्हा विनोदी चुटकुले, पुस्तक वाचताना. आपण पुलंच्या विनोदी शैलीचा अनुभव त्यांच्या पुस्तकातून अनुभवत  असतोच.  त्यांची शैली प्रत्यक्ष तो प्रसंग डोळ्यासमोर उभी करणारी अशी आहे हे सर्वश्रुतच आहे. आपल्या हास्याचे फवारे त्यामुळे न आले तरच नवल ! अशा प्रकारच्या वाचनातून आपल्याला एक प्रकारचा आनंद तर मिळतोच शिवाय आपल्यावर असणारा ताण थोडा फार कमी होण्यासाठीही मदत होते. म्हणून अशा प्रकारच्या वाचनातून  मनोरंजन आणि समाधान दोन्ही गोष्टी साधता येतात.
     काही वेळेला आपल्या एखाद्या ग्रुपमध्ये मग तो कौटुंबिक असो किंवा सामाजिक किंवा मित्रमैत्रिणींचा कधीतरी एखाद्या गंभीर विषयावर चर्चा चालू असते, अशा धीरगंभीर वातावरणात मनावर ताण येतो पण असे वातावरण बदलणे खूप गरजेचे असते. अशा परिस्थितीत एखादा हेतुपुरस्सरपणे काहीतरी विनोदी बोलत सर्वांना हासावयास भाग पाडतो. आणि अशा वातावरणातील गांभीर्य कमी होण्यास मदत होते. अर्थातच हास्याच्या साथीने हे सर्व शक्य होते. म्हणूनच मानवी जीवनात “हसणे” या कृतीला अनन्यसाधारण महत्त्व आहेच. 
       भारतीय  परंपरेमध्ये आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत आवर्जून हसतमुखाने करण्याची परंपरा आपण पाळतो अर्थात ती स्वागतार्ह आहे यात वादच नाही. आपणच कोणाच्या घरी गेलो आणि कोणी आपले स्वागत दुर्मुखलेल्या चेहऱ्याने केले तर नक्कीच आपल्याला वाईट वाटते, अवघडल्यासारखे ही होते. म्हणूनच ‘हसत मुखाने’ स्वागत हा सोपस्कार फार महत्त्वाचा आहे.
       एखादा परिचित व्यक्ती समोर आल्यानंतर त्याच्याकडे बघून किंवा उभयतांनी एकमेकांना किमान एक स्मित (स्माईल) देणे तरी अपेक्षित असतच असतं. हे माणुसकी जपण्याचं सुध्दा एक लक्षण आहे असे आपण म्हणू शकतो. शिवाय या स्मित हास्यामुळे दोघांनाही प्रसन्न वाटते आणि आपण परिचित आहोत याची ओळखही पटते. त्यामुळे भारतीय संस्कृतीतील स्मितहास्य हा एक सोपस्कार खूपच महत्त्वाचा आहे.
     हल्ली वृत्तपत्रे मासिके यांमधून वधु पाहिजे किंवा वर पाहिजे अशा जाहिराती आपण वाचतो. त्यातील नियोजित वधू-वरांची वैशिष्ट्ये बघीतली तर त्यात वधूच्या वैशिष्ट्यांमध्ये वधु गोरी, निमगोरी, हसतमुख , वगैरे वगैरे अशा प्रकारचे वर्णन असते. याचा अर्थ या ठिकाणी ‘हसतमुख’ या वधूच्या चेह-यासाठी एक चांगले विशेषण या अर्थाने असते. वधू परीक्षेच्या वेळी मुलीला बघून झाले की लगेच मुलगी छान आहे अगदी हसतमुख आहे असे आपण पटकन बोलतो. म्हणजेच हा प्रसन्नता दाखवणारा चेहरा असतो. अशा चेहऱ्यामुळे आपल्याकडे बघणाऱ्यालाही खरंच प्रसन्न वाटतं शिवाय त्यामुळे असे व्यक्तिमत्त्व समोरच्या व्यक्तीवर छाप पाडून जाते. असे नक्कीच म्हणता येते. ही झाली सुखात्मक हास्य अविष्काराची काही  रुपं.
      सुखात्मक प्रकारांप्रमाणेच क्लेशकारक हास्याचे प्रकारही बरेच आहेत. उपरोधिक हास्य हा एक क्लेशदायक प्रकार. ‘नाव सोनुबाई आणि हाती कथलाचा वाळा' अशी परिस्थिती जेंव्हा  असते,त्यावेळी बहुतेक असे हास्य प्रदर्शित होऊ शकते. एखादी व्यक्ती अगदी साधे वाटणारे कामही नीटपणे करू शकत नसेल पण तिचे गुणगान मात्र अगदी भरभरून होत असेल,उदाहरणार्थ एखाद्या स्त्रीला साधा वरण भातही चांगला बनवता येत नाही तरीही तिची आई आमच्या चिमणीला ना,पंच पक्वन्नाचा खूप छान स्वयंपाक करता येतो असे ठासून सांगते तेंव्हा तिच्या पाककौशल्याचा अनुभव असणारा व्यक्ती जेव्हा प्रतिक्रियात्मक हसतो, ते उपरोधिक हसू. त्यामुळे या हसण्यामागची भावना जेंव्हा समोरच्या व्यक्तीच्या लक्षात येते तेव्हा मनाला क्लेश झाल्याशिवाय राहात नाहीत.
      थोडक्यात उक्ती आणि कृती या दोन्हीत जेव्हा विरोधाभास असतो, तेंव्हा येणारे हसू उपरोधिक असू शकते. याला आपण उपहासात्मक हास्याचीही उपमा देऊ शकतो. सध्या टीव्हीवर चालू असणारी कोणती ती दुहेरी नावाची मालिका. खरे तर अशा मालिकांना प्रसारणासाठी परवानगीच का देतात? हा एक संशोधनाचा विषय ठरू शकतो.पण यातील खलनायक तो कोण बल्लाळ त्याच्या तोंडी मात्र पदोपदी विकट हास्याची रेलचेल दिलेली दिसते. एखाद्यावर आसुरी सूड उगवल्यानंतर येणारे हे विकट हास्य. तो बल्लाळ कायम सूड उगवल्याच्याच आनंदात  विकट खुनशी हास्याचे फवारे उडवत असतो. खरोखरच हे हसू बघणाऱ्या व्यक्तीच्या काळजाचा ठोका चुकवत जाते.
     एखाद्याच्या बाबतीत कायम काहीतरी कारणामुळे मनामध्ये खुन्नस ठेवत,आसुरी आनंदाचे  विकट हास्य प्रदर्शित करणे, म्हणजे काहीतरी फार मोठे शहाणपणाचे कृत्य नव्हे किंवा एखाद्या विजयाचा जल्लोषही नव्हेच. तर तुम्ही किती नीच पातळी गाठू शकता, हेच प्रदर्शित करणारी तुमची घाणेरडी वृत्ती असते.  ही आपल्याला  आपणच खोदलेल्या खड्ड्यात कशी ढकलते याची बरीच उदाहरणे सभोवती बघावयास मिळतात. त्यामुळे ही वृत्ती घातक आणि हास्य तर त्याहूनही घातक म्हणता येईल. 
     रहस्यमय हास्य ,हा प्रकारही क्लेशकारक ठरणाराच. आपल्या रिकामपणाच्या वेळात आपण आपल्या खिडकीतून किंवा बाल्कनीतून  येणार्‍या जाणार्‍यांचे निरीक्षण करत असतो कधीतरी. अशावेळी काही निरीक्षणातून जाणवते की,अमका एक व्यक्ती उगाचच विचित्रपणे हसतो आहे. हा विचित्रपणा, त्याच्या चेहऱ्यावरील हाव-भाव सुद्धा भीतीदायक असू शकतात. पण तो हसत मात्र असतो. वरकरणी तो का हसत आहे?याचा आपल्याला काही अंदाज ही येत नाही.यालाच आपण रहस्यमय हास्य असेही म्हणू शकतो. या   व्यक्तीच्या हसण्यात आणि वागण्या-बोलण्यात कोणतेही प्रकारचे तार्किक कारण दिसत नाही. म्हणून ते रहस्यमय बनत असावे. बहुतेक वेळेला मानसिक संतुलन गमावलेली व्यक्ती अशा प्रकारच्या हासण्यासाठी अधीन झालेली आपल्याला कित्तेक वेळा जाणवते. पण शेवटी ते क्लेशकारक हास्यच नव्हे काय?
        मोबाईल वर व्हॉट्स अॅप  वर मेसेज बघत असताना एका सचित्र मेसेजने  माझे लक्ष वेधुन घेतले. एक म्हातारे गृहस्थ मोबाईल रिपेरिंग च्या दुकानात आपला मोबाईल दुरुस्तीला घेऊन जातात. तो तपासून दुकानदार म्हणतो काका हा फोन चांगला तर आहे काही झालेले नाही त्याला तेव्हा ते  म्हातारे बाबा दुकानदाराला म्हणतात फोन तर चांगला आहे मग का बर मुलाचा फोन कधीच येत नाहीये मला……. आणि हे चित्र बघून आणि वाचून क्षणभर माझ्या ह्रदयात खूप कालवाकालव झाली खूप वाईटही वाटले. आणि मन दिङमुढ झाले. बाकी आपण काय करू शकणार? असे वाटून गेले. पण फोटोतील या वृद्ध गृहस्थाच्या चेहऱ्यावर मात्र हास्याची एक लकेर होती. याही परिस्थितीमध्ये हसू येणे किंवा हसणे हे कदाचित वेडेपणाचे वाटेल, पण हे केविलवाणेच  होते खचितच .
      बरेच वेळा केवळ असे केविलवाणे हसून प्रतिक्रिया देण्या शिवाय आपण काही करू शकत नाही. हे निश्चितच  हसणाऱ्याला आणि बघणाऱ्याला ही क्लेश देणारेच, पण अगतिकता दर्शवणारेही आणि म्हणूनच केलीवाणे. बरीच दुःखे झेललेल्या व्यक्तीच्या चेहर्‍यावर असे हसू नकळत पणे दिसून येते. बघणाऱ्या व्यक्तीच्या संवेदनशीलतेवर या हसण्या मागची पार्श्वभूमी अवलंबून असते. असे आपण म्हणू शकतो. याशिवाय काही काही व्यक्तींच्या बोलण्यातून संवादफेकीतून खूपदा विनोदी सुरू असतो. ही त्या व्यक्तीची  सवयच बनून गेलेली असते. हा निराळा. ही सवय त्या व्यक्तिमत्त्वाचे कायम एक अंग बनून जाते त्यामुळे समजून घेणारा देखील  कायम हास्याची दाद देऊ शकतो. अर्थात दरवेळी हास्य प्रकटीकरण झालेच पाहिजे असे नाही तर त्यातून गर्भितार्थ आणि गर्भित हास्याचे फवारे ही निघालेले आपण जाणून घेऊ शकतो. असा व्यक्ती स्वभावाने खूपच गप्पिष्ट असावा असा उगाचच भासही होतो. माणसाचे मन सुखावून जाते हे खरे.
   हल्ली होळी, धुळवंड किंवा कोणत्याही आनंदाच्या प्रसंगी एखादे पेय मग ती दारू असो की भांग किंवा बियर असे घेऊन तो विशिष्ट प्रसंग एन्जॉय करण्याची फार फॅड वाढले आहे. पण अतिसेवनाने परिस्थिती आणि चित्त थार्यावरून उडते. आणि असा माणूस वेड्यासारखा एक सारखा हसतच राहतो. ही मला ऐकून मिळालेली माहिती. एवढे हसतो की शुद्धीवर येईपर्यंत त्यालाही काही भान रहात नाही.  हे सुद्धा एक प्रकारचे असते हास्यच. यातून खरच आनंद मिळतो का? हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न. पण याला चित्रविचित्र हसणे एवढेच आपण म्हणू शकतो.
    गंमत वाटली ना एवढे सगळे हास्याचे अविष्कार आहेत ते वाचून! होय ना? आपण जीवन जगताना कित्येकदा हसतो खरे तर मानवी जीवनाला मिळालेले  हे हसू म्हणजे एक वरदान.  त्यामुळे जीवन जगणे हा एक सुखात्मक  अनुभव ठरतो प्रत्येकासाठी. एवढ्या भरपूर प्रकारचे आपण हसू हासत असतो. केव्हा तरी याचे भानही नसते आपल्याला.पण नक्कीच हसतच राहिले पाहिजे. तरच या अमूल्य मानव जन्माला आल्याचे सार्थक झाले असे म्हणता येईल. धन्यवाद त्या विधात्याला. ज्याने ‘हसणे’या संकल्पनेची रुजवात अगदी जन्मतः  मानव जातीमध्ये केली आहे….. हास्यमेव जयते……….

         ©  *नंदिनी म. देशपांडे *

😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा