मंगळवार, २४ एप्रिल, २०१८

*किती परिणामकारक?*

*किती परिणामकारक*?

    "बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण कायदा" (पॉक्सो) कायद्यातील शिक्षे संदर्भात दुरुस्ती करणारा अध्यादेश काल केंद्रीय पातळीवर मंजूर करण्यात आला.त्या अन्वये नराधम इसमास,कमाल जन्मठेपेच्या शिक्षे ऐवजी फाशीची शिक्षा सुनावली जाईल ही तरतूद स्विकारली गेली आहे.
    ‌‌ काही कायदे हे परिस्थितीजन्य असतात.समाजात उद्मवणाऱ्या समस्यांना समोर ठेवत,लोकक्षोभाच्या परिणामकारकतेवर ते बनवले जातात.त्यांपेकीच एक हा 'पॉक्सो' कायदा २०१२ साली बनवण्यात आला.
      आज २१ व्या शतकात चोहीकडे स्त्री मुक्तीचा नारा दुमदुमत असताना मुलींच्या किंवा स्त्रियांच्या ‌संरक्षणासाठी कायदे बनवण्याची निकड भासावी या सारखी दुसरी शोकांतिका काय असेल ?
      ज्या देशात गर्भावस्थेत असतानाच स्त्री भृण मारण्याची तयारी केली जाते, त्या समाजात सहाजिकच निगरगट्ट मनाचे,पाशवी वृत्तीची माणसं नव्हे तर जनावरंच रहातात असे म्हणावेसे वाटते.
       संस्कृति,परंपरा जपत, आदर्श मुल्यांच्या पायावर  उभं असणारं आपलं म्हणजे भारतीयांचे, वैचारिक विश्व. मोठ्या अभिमानाने प्रतिज्ञेतून आणि देशभक्तीपर गीतांतून आपण त्याचे गुणगान गात असतो.पण त्यात किती तथ्य आहे हे रोजच्या बातम्यांमध्ये झळकणाऱ्या माणसाच्या हीन प्रवृत्तीने गाठलेल्या परिसीमेतून दिसून येते.
     ज्या देशात स्वत:च्या घरातही मुली/स्त्रिया यांना ‌वखवखलेल्या नजरांशी सामना करावा लागतो ,कधी कधी शिकारही व्हावे  लागते अशा   विकृत नराधमांकडून.तेथे ईतर नात्यांची किती शाश्वती देता येईल?ही शंकाच आहे.कोण म्हणेल या देशात सुसंस्कृती रुजलेली आहे?       नैतिकतेच्या वाऱ्यालाही न शिवलेला फार मोठा समाज ‌आज आपली पाळं मुळं घट्ट रोवू पहात आहे.केवळ वासना आणि वासना एवढं एकच ध्यैय समोर ठेवून बुध्दी गहाण ठेवलेले,हे लोक  ठिकठिकाणी संचारत आपली दहशत निर्माण करत आहेत.त्यांना ना स्वत:च्या वयाचे बंधन असते ना समोरच्या सावजाच्या वयाचे.
     गेल्या काही काळात, क्रूर पणाचा कळस गाठणाऱ्या ‌घडून गेलेल्या घटना बघितल्या, वाचल्या की मन विषण्ण होते.कुठे चाललीय आपल्या समाजाची ,देशाची मानसिकता? असा प्रश्न मनाला सतत भेडसावत रहातो .   अशा बऱ्याच प्रकरणात पिडिताच नव्हे तर समोरचा गुन्हा करणारा पुरुष ही अल्पवयीन असतो.कठुआ प्रकरण असेच सुरु झाले . कुठे वाहवत चालली आहे आजची पिढी ? आणि का?यांचा मागोवा घेऊन, त्यावर उपाय शोधण्याची खरी गरज ‌आज निर्माण झाली आहे .
      ‌मुलांच्या मनावर विपरीत परिणाम ‌करणारी साधने ,असंख्य गोष्टी आज मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत.खरे तर त्यांवर तारतम्याची काही बंधनं घालणं आवश्यक आहे असे म्हणावेसे वाटते.
    ‌ बऱ्याच प्रकरणात प्रौढ माणसं राजरोस पणे अशा हीन वृत्तीच्या आधिन होऊन ‌गुन्हा करतात.चीड आणणाऱ्या या वृत्तीला काय म्हणावे? माणसाला आयुष्यात केवळ वासना,भोगलालसा ही एवढी महत्वाची आहे का?की,ज्या वेळी सावजावर झेप घेताना त्यांना कोणत्याही नैतिक जबाबदारीचे भान थोडे सुध्दा राहू नये ?
     कायद्यातील तरतुदी आणखी कडक बनवून अशा गोष्टींना थोडा फार चाप बसेल ,पण ही पाशवी वृत्ती मनातून समुळ नष्ट करण्यासाठी कुठला परिणाम कारक कायदा अस्तित्वात आणता येईल?मानवी प्रवृत्तीच्या अशा घाणेरड्या रुपांचा धिक्कार करणे हे सर्वस्वी कोणत्याही कायद्यान्वये नव्हे तर त्याच्या मनावर अवलंबून आहे.          माणसाच्या मनावर संस्कारांचा फार मोठा प्रभाव असतो.तोच योग्य दिशेने होणे,ही आज काळाची गरज आहे.केवळ कायदे करुन भागणार नाही तर, दारा दारातून ,शाळा शाळांतून किंबहूणा हल्ली वयाच्या प्रत्येक टप्प्यावर नैतिकता, नैतिक जबाबदारी म्हणजे काय?ती कशी पार पाडावयास हवी ?या साठी समुपदेशन होणे गरजेचे झाले आहे.माणसाच्या गोठलेल्या विचार क्षमतेला हलवून जागे करणे आवश्यक आहे.या सर्वांसाठी वर्ग घ्यावेत की काय?अशी अवस्था निर्माण झाली आहे.कांही अध्यात्मिक नेतृत्वाकडून ते थोड्या फार प्रमाणात होत असेल तरीही हे क्षेत्र सुध्दा वासनाकांडा पासून सुटलेले व       नैतिकतेच्या पायावर उभे नाही हे वास्तव आपण बघतो आहोतच.
   ‌‌म्हणूनच काही गोष्टी कायद्यातील बदलांतून साध्य होतील का?यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होते....

*नंदिनी म.देशपांडे*

nmdabad@gmail.com .

🌷🌷🌷🌷🌷🌷

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा