रविवार, १ एप्रिल, २०१८

*१ एप्रिल च्या निमित्ताने.....*

*ईश्वरी वरदान.*

       " अहो आबा ,तुम्ही मला नोटबुक्स साठी पैसे दिलेले पण मी मात्र आणले आईस्क्रीम....आबा, तुम्ही एप्रिल फूल बनला आहात चक्क....छोटा ईशू चेहऱ्यावरचा आनंद उडवत आपल्या आजोबांची गम्मत‌ करत होता....
    मग माझ्याही लक्षात आले,अरे,आज १ एप्रिल .मुर्ख बनणे आणि बनवण्याचा दिवस.आपण जरा सावधच रहायला हवे...
एरवी कधी आपल्याला कोणी उल्लू बनवले तर,हा नाकाच्या शेंड्यावर येणारा राग आज मात्र जरा बाजूलाच  ठेवायला लागतो.
    ‌‌खरंच, विनोदबुद्धी ची ही ईश्वरी देणगी माणसाला मिळालीच नसती तर....जीवन किती निरस बनले असते ? या विनोदांमूळे माणसाच्या जगण्यातली लज्जत वाढते.सुखदु:खाच्या चढ उतारांचे हिंदोळे घेत असताना येणारा मानसिक ताण हळूवारपणे बाजूला सारणाऱ्या ‌या विनोदबुद्धीचे मानावेत तेवढे धन्यवाद कमीच आहेत....
   ‌विनोदबुध्दी ही माणसाच्या वृत्तीचा एक स्थायी भाव.ती किती प्रमाणात अॅक्टिव्हेट करावी आणि तिला कुठे ब्रेक लावावा हे कसब ज्याला जमले तो व्यक्ती सुखी आनंदी झालाच म्हणून समजावे.अहो,विनोद करणे आणि तो समजणे या उभय गोष्टी जमल्या ना,की त्याला सुखी जीवनाची चावीच सापडली आहे हे म्हणणं अतिशयोक्तीचे ठरणार नाही.....
     एकदा ही चावी चांगली सांभाळता आली ना,की आयुष्यात येणाऱ्या ताणाचा निचरा क्षणभरात होऊ शकतो.
‌ ही विनोदबुद्धी बापडी कोणताही भेद न करता प्रत्येकाच्या मनात आपली जागा शोधून ती मिळवत रहाते.कारण प्रत्येकाला हसरे ठेवण्याचा वसाच जणू तिने घेतला आहे....पण असे असले तरीही प्रत्येकाने आपल्या तार्किक क्षमतेनुसार या चावीला किती फिरवावे?हे ठरवायला हवे.नाही तर 'आ बैल मुझे मार'अशी गत होऊ शकते.
      उगाच नाही काही पु. ल. देशपांडे ,चि.वी. जोशी,व.पु.काळे वगैरे लेखकांच्या विनोदी साहित्यावर आपल्या कित्येक पिढ्या पोसल्या गेल्या आहेत या पुढेही पोसतीलच....याच हेतूने चित्रकार आपल्या व्यंग चित्रांतून अणि अभिनेते आपल्या अभिनयातून सशक्त मानवी मनांवर हसण्याचे संस्कार घडवत आहेत...हे संस्कार होत असतानाच आपल्या उपजत विनोदी बुध्दीला कायम जागृत ठेवून आपल्या बरोबरच इतर अनेकांना हास्यकल्लोळात सामावून घेण्यासारखे दुसरे मोठे पुण्य नाही.
   ‌विनोद बुध्दीतून हास्य, हास्यातून तणाव मुक्ती तणाव मुक्तीतून आनंद नि आनंदातून सशक्त मनाची जडणघडण घडण हे असे चक्र कायम ‌टिकवून ठेवण्याच्या लॉजिक मधूनच हास्य क्लब नावाचा प्रकार अस्तित्वात आला असावा....
   ‌चला तर मग या दैवी देणगीचा उपयोग करुन घेत जीवनाचा निर्भेळ आनंद लुटू या....


*नंदिनी म.देशपांडे*© ‌‌   १ एप्रिल ,२०१८.

🍉🍉🍉🍉🍉🍉
   ‌‌

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा