रविवार, ४ मार्च, २०१८

*गहिवर*

दि.मार्च१,२०१८.होळी. 

         *गहिवर*
   ****************

       होळी जवळ आली की माझ्या मनाचा गहिवर आणखीनच गहिरा बनू लागतो.त्यासाठी कारणही तसेच आहे. बरोबर तीन वर्षां पुर्विची होळी ही आईसोबतची शेवटचीच होळी ठरली....तो दिवस आजही डोळ्यासमोर लख्खपणे उभा ठाकतो....
   " अगं आई तू नको आता या फंदात पडत जाऊस बरं , तुला आताशी काम  नाही झेपत"; असे मी वारंवार सांगत असतानाही आईचे ते आर्जवी सूरात सांगणे , "तू नाही म्हणू नकोस, दोघेही जण या उद्या जेवणासाठी तिकडेच.(म्हणजे तिच्या घरी,माझ्या माहेरी.) जावई बुवा सांगतील त्या वेळी जेवण तयार ठेवते मी.... त्यांच्या अॉफिसच्या वेळेच्या सोयीनुसार.....", 'नको गं,ऐक माझे,' मी माझे म्हणणे रेटतच नेले.....
     पण कसचे काय, एकदा मनावर घेतलेली एखादी गोष्ट पूर्ण केल्याशिवाय रहायचीच नाही आई...."अगं पाच पौर्णिमा राहिलेल्या आहेत.उद्या‌ शेवटची आहे, एकत्रितपणेच कुळाचार करीन म्हणते.कधीच राहिल्या नाहीत आत्तापर्यंत....असे म्हणतात की,लेक जावयाला बोलावले जेवणासाठी तर,बारा ब्राह्मण जेवू घातल्याचे पुण्य पदरी पडते....", आईने आपले म्हणणे मांडले.तिच्या या भाबड्या श्रध्देला तडा जाईल असे वागणे मला शक्यच नव्हते....मी नकार देईन की काय?या धास्तीने आईने बाबांकरवी जावयाला लगेच आमंत्रण सुध्दा करावयास लावले.मग‌ काय तिच्या निर्णयावर शिक्कामोर्तबही झाले..... तशी तयारी साठी आई तिच्या घरी जाण्यासाठी वळली.....
      'अजिबात घाई करू नकोस तुझे जावाई येतील दुपारी दिड वाजता जेवणासाठी......', मी निक्षुण सांगितले होते आईला......त्या नुसार आपल्या सुनबाईला हाताशी मदतीला घेतले. हल्ली वर्षभरात आपल्याला एकटीला करावयास ईच्छा असूनहि शरीराची साथ मिळत नाही हे वास्तव तिने नाईलाजाने मान्य केले होते....
      तर, सुनबाईच्या मदतीने , संपूर्ण स्वयंपाक तयार ठेवत काही पुरण पोळ्या आणि भजी तेवढी पानावर बसल्या नंतर वाढण्यासाठी बनवण्याची शिल्लक ठेवली होती.....
  ‌‌ मधल्या काही वेळात आईने आपल्या धाकट्या लेकीला फोन करत सर्वांशी संवाद साधला. शुभेच्छा दिल्या......
     दुपारी दीड वाजेच्या सुमारास, आय आय टी मुंबई येथे प्रोफेसर असणा-या आपल्या भाच्च्याची पर्यावरणावर आधारित मुलाखत होती,ती आईने मोठ्या कौतुकाने डोळे आणि कान यात प्राण आणत ऐकली होती....तिने,या कार्यक्रमात मला थेट प्रश्न विचारण्यास उद्युक्त केले होते....माझ्या प्रश्नाचे उत्तर आले म्हटल्यावर, आईला स्वतः प्रश्न विचारावासा वाटला.तो तिने कागदावर उतरवला सुध्दा....पण क्षिण झालेला आपला आवाज पोहोचणार नाही तिथपर्यंत  फोनवरून हे तिने
ताडले होते आणि ते तसेच राहून गेले.....
  दरम्यानच्या वेळेत 'हे' पण आले आॅफिस मधून आईने, सुनबाई ला ताटं वाढण्यासाठी सुचना केली आणि स्वत: गरम गरम पुरणपोळी ,नि गरम भजी तळण्यासाठी गॅस जवळ सरसावली....स्वत:च्या हाताने बनवत गरमा गरम वाढल्या शिवाय चैन पडायची नाहीच तिला,हे मला सवयीने माहिती होतेच.....
      स्वादिष्ट जेवणावर यथेच्छ ताव मारत, "आमची जेवणं होतीलच आता पूर्ण,तुमची पानं पण घ्या आता." मी म्हणाले...पण जावयाच्या समोर कधीच जेवावयास न बसणारी आणि सुनेला सोबत घेऊन बसल्या शिवाय घास न जाणारी माझी आई माझ्या या सुचनेकडे दुर्लक्ष करणारच हे मला माहीतच होते.झालेही तसेच, सार्यांची जेवणं झाल्यानंतर दोघी सासा सुना गप्पा मारत जेवणाचा आस्वाद घेऊ लागल्या....
      तो पर्यंत जावई आणि मुलगा आपापल्या आॅफिस साठी निघून गेले.मग काय! त्यानंतर माझी,बाबांची आणि दोन्ही भाचरे अशी गप्पांची बैठक बसली.जेवत जेवत दोघी पण त्यात सामिल होत होत्याच.
  ‌‌   आईच्या जेवणानंतर अतिशय समाधानयुक्त चेहर्याने ती बैठकीत येऊन विराजमान झाली होती....कांही वेळाने, 'मी आत जाऊन थोडासा आराम करते,तू पण कर जरासा.'असे म्हणत आत गेली आई....मी मात्र बाहेरच नवीन अॅंड्रॉईड फोन मधील सोयी सुविधांची ओळख बाबांना करुन देण्यात मश्गुल होते....
      आईची वामकुक्षी नेहमीच फार अल्प असायची हे मी जाणून होतेच.पंधरा वीस मिनिटांतच आई बाहेर येऊन बसली....मात्र मी तिचा चेहरा निरखून बघते आहे हे तिच्याही लक्षात आले असावे.खूप कोमेजलेला,छातीत होणारी वेदना असह्य होत असल्यामुळे साडीचा पदर दोन्ही खांद्यावरुन घट्ट लपेटत कोणालाही दिसू न देता एका हाताच्या तळव्याने दुखर्या भागावर दाब देऊन खुर्चीत बसलेली आई मी काळजीयुक्त नजरेने बघत होते.... हलक्या आवाजात मी तिला विचारले सुध्दा,"खूप दुखतंय का गं? डॉक्टरांना फोन करु?" आई मानेने नाही ,नको म्हणत होती, पण दोन्ही डोळे पाण्याने दाटून आलेली तिची छबी आजही जशीच्या तशी आठवत आहे मला.....
       अधनंमधनं तिला त्रासदायक ठरणारं आईचं छातीचं दुखणं,' ठराविक ठिकाणी दाब दिला की बरे वाटते,मला'असे म्हणत आई स्वत:च आपली डॉक्टर बनली होती... खरंच ,तिला काही वेळातच एकदम आरामही पडायचा....ती पुन्हा आपली दिनचर्या चालू करायची....त्या दिवशी सुध्दा असेच घडले......नंतर माझ्या मोबाईलवरून तिच्या आवडीची दोन गाणीही ऐकवावयास लावली तिने मला.... त्यातील एक होते, 'बाई मी विकत घेतला श्याम'आणि दुसरे,'कानडा राजा पंढरीचा.' या गाण्यांना प्रसन्नपणे दाद देत स्व त: सुध्दा गुणगुणत आहे हे बघून मलाही खूप आनंद वाटला....
    'बराच वेळ झालाय,चल मी येते आता',असे मी म्हणत असताना ही मला आणखीन अर्धा तास बसवूनच ठेवले आईने.... 'चहा घेऊनच जा,मी बनवून आणते'असेही म्हणाली मला.'पण जेवण खूप झाले आहे ',आत्ता नकोच आहे मला...',असे म्हणत मी माझ्या घरी आले.....
  त्या‌नंतर तीन दिवस माझी आणि आईची भेटच झाली नाही.चतुर्थीच्या दिवशी झालेली ओझरती भेट, पण मी कुणाशी तरी फोनवर बोलण्यात गुंतलेली बघून क्षणभर माझ्या हॉल मध्ये थबकलेली आई,ऊभ्या ऊभ्याच माघारी जाण्यासाठी फिरली....
      दुसऱ्या दिवशी रंगपंचमीचा दिवस होता.कित्तेक वर्षांपासूनची योगा, प्राणायाम करण्याची आईची सवय या दिवशी पर्यंत चालूच ठेवली होती तिने.....आपला योगा संपवून, नव्यानेच केलेल्या बटाट्याच्या वेफर्सचा नमुना मला आणून देण्यासाठी म्हणून,स्वत:आली  माझ्या घराच्या व्हरांड्यापर्यंत ! काहीही नवीन केले की,'लव्ह अॅंड अॅफेक्षन' हा निसर्गाचा नियम आईला माझ्या पर्यंत यावयास भाग पाडत असायचा....
         पण त्या दिवशी कधीही सकाळी माझ्या घरी न येणारी आई स्वत:च या निमित्ताने आलेली बघून मलाही थोडे आश्चर्यच वाटले....जणू काही निरोपाचा संवाद साधत आम्हा दोघांना डोळे भरून बघण्या साठीच आली होती ती.... बाहेरुनच आमच्याशी बोलत, घरातील ईतर सदस्य कुठे कुठे बाहेर गेले आहेत आणि केवळ ती व बाबाच घरी आहोत याची जाणीव पुर्वक कल्पना दिली आईने मला....हा कशाचा तरी संकेत असेल याची शंका सुध्दा आली नाही अजिबात...आमच्याशी केवळ तीनच मिनिटांची भेट आटोपून आईने रस्त्याच्या त्या कडेला असणारे आपले घर जवळ केले.....
       घरात पोहोचल्यानंतर हॉल च्या सोफ्यावर फार‌तर तीन चार मिनिटं विसावली असेल,आईने डायनिंगरुम मधनं जाणार्या बाबांच्या पाठमोऱ्या मुर्तिला बघितले आणि  एका क्षिण कन्हार्याने बसल्या ठिकाणीच, आपल्यातील ,चैतन्याला, शरिर रुपी पिंजर्यातील प्राणपाखराला तिने स्वच्छंदपणे विहार करण्यासाठी कायमचे अवकाशात सोडून दिले.... कोणाच्याही ध्यानीमनी नसताना किंबहूणा तिच्याही नकळत.....त्या वेळी होणारी वेदना कोणालाही दिसू न देता, अगदी एकटीच असताना........
       नवरात्राच्या नवमीच्या दिवशी पुरणपोळी बनवत असताना बत्तीस वर्षांपूर्वी तिच्या पाठी लागलेल्या या वेदनांची कळ आईने, कित्येकदा जिद्दीने परतवून लावली, थोपवून ठेवली २०१५ या वर्षी च्या होळीच्या  दिवशी पुरणपोळी बनवतानाच तिने उचल खाल्ली. पण त्याही दिवशी जिद्दीने परतवून लावलीच.....
  ‌ रंगपंचमीच्या दिवशी मात्र अत्यंत तृप्ततेने सा-यांच्या चेहर्यांवर उमटणार्या सुख, समाधान,प्रगतीच्या  रंगांकडे बघत, अतिशय शांतपणे सार्यांना निरोप देती झाली..... स्वतः बरोबर समाधानाची शिदोरी घेऊन.....

      उद्या रंगपंचमी.आईचा तिसरा समृतिदिन, तिच्या स्मृतिंना वंदन करत शब्दसुमनांची ही भावमाला माझ्याकडून मन:पुर्वक अर्पण .....

*नंदिनी म. देशपांडे*.©*
🌹🌹🌹🌹🌹🌹

1 टिप्पणी: