बुधवार, ६ डिसेंबर, २०१७

*निमित्त*

     आज एका साहित्यिक ग्रुप वर एका मित्राने प्रश्न केला,"लेखक का बनायचे असते?पैसा ,कौतुक ,प्रसिध्दी की आत्मसुख यांसाठी?"हा प्रश्न वाचनात आला आणि मलाच आश्चर्य वाटलं हा काही प्रश्न असू शकतो! एखादा व्यक्ती लेखक बनतो म्हणजे काय तो ठराविक इन्सटीट्यूट मध्ये जाऊन त्या बद्दलची पदवी /पदविका घेतो की काय असे अभिप्रेत आहे का या प्रश्नात?हा प्रश्न वाचल्या पासून मी मात्र अस्वस्थ बनले.कधी एकदा व्यक्त होईल मी या विषयावर असे झाले अगदी!
       या प्रश्नाच्या निमित्ताने एक संधी चालून आली आहे व्यक्त होण्या साठी....असे वाटले खरे मनातून....
         अरेच्या!! एखाद्या विषयावर व्यक्त होण्या साठी आपल्या मनातील विचार लिहून काढणे  हा एक सोप्पा उपाय असू शकतो की!असे वाटून गेले पटकन. पण लगेच लक्षात आले,व्यक्त होण्यासाठी लिहावेच लागते असेच कांही नाही बोलण्यातूनही ते साधता येतेच ना ?
         प्रश्न वाचल्या बरोबर ,"आपण यावर व्यक्त झालेच पाहिजे," असे मनाच्या आतल्या कप्प्यातून बुध्दिला जो संकेत मिळाला ना ,हा संकेत  म्हणजे लेखनासाठी आवश्यक असणारे पहिले लक्षण होय.ज्याला साहित्यिक भाषेत "प्रतिभा" या नावाने संबोधले जाते.
          प्रतिभा ही एक कला आहे.कोणत्याही कलाकाराच्या अंगी असणारी कला ही त्याला उपजतच मिळालेली दैवी देणगी असते.कलेला जसजसे मार्गदर्शन, सराव,योग्य ती संधी मिळाल्यास तिचे सौंदर्य अधिकात अधिक प्रमाणात खुलवण्याचे प्रयत्न कलाकार करत असतो.कलेची प्रगल्भता वाढती ठेवतो,तसेच प्रतिभेचेही आहे.पुस्तकांचे जास्तीत जास्त वाचन,निरिक्षण क्षमता,आपल्या स्वतःला आलेले अनुभव,इतरे जनांचे अनुभव कथन एेकणे,एखाद्या विशिष्ट विषयाचा सखोल अभ्यास या सर्व  गोष्टींची मुबलकता ज्यांच्याजवळ असते त्यांची प्रतिभा सदाफुली सारखी असते.
      प्रगल्भ झालेली ही प्रतिभा मग काव्य किंवा गद्य लेखनाच्या स्वरूपात जेंव्हा प्रकट होते ना,तेंव्हा संबंधित व्यक्ती लेखक बनण्यासाठी पात्र आहे असे मला वाटते.तो आपल्या प्रतिभा शक्तीच्या जोरावर काल्पनिक रचनाही शब्दांमध्ये गुंफत रहातो.यातूनच कथा,कादंबरी,नाटक,ललितगद्य,विडंबन,प्रवास वर्णन,व्यक्तीचित्र,समिक्षण,काव्य वगैरे वगैरे लेखनाच्या स्वरुपात व्यक्त होऊ लागली की,ती व्यक्ती लेखक बनली आहे याला पुष्टीच मिळते.
       लेखकाची प्रतिभा जसजशी बहरु लागते,तसा त्याच्या लिखाणाचा वाचक वर्ग वाढू लागतो.लेखनाचे विषय समाजाभिमुख असतील तर नक्कीच ते वचकांच्या पचनी पडते.हाच वाचक वर्ग उस्फुर्तपणे दाद देऊन प्रशंसा करतो तेंव्हा,होणारे कौतूक कोणाला नको असते?अहो,देव सुध्दा भक्तिभावाचा भुकेला असतो म्हणतात,मग हा प्रतिभा संपन्न माणूस तर,हाडामांसाचा बनलेला असतो .तो कौतुकाचा भुकेला असणे अगदी स्वाभाविक आहेच.
        हळू हळू कौतूकाची ही पावलं पुर्णत्वाच्या दिशेने सरकत सरकत प्रसिध्दी पर्यंत पोहोंचतात.प्रसिध्दी हे कौतूकाचेच विस्तारित रुप आहे असे म्हणता येईल.ही वाट्याला आल्यास न आवडणारा व्यक्ती विरळाच.
       प्रश्नातला आणखी एक मुद्दा म्हणजे पैसा.याबाबत मी एकदा मत व्यक्त केले असल्याचे स्मरते आहे मला.लेखक किंवा कवी आपल्या प्रतिभेच्या माध्यमातून कौतूक प्रसिध्दी,अधुनिक काळात थोडाफार पैसा मानधन म्हणून मिळवू शकतो.पण त्याची शाश्वती देता येत नाही.त्यामूळे प्रतिभा शक्तीच्या जोरावर मिळणारा पैसा हा लेखकाचे जीवन आर्थिक दृष्टिने संपन्न करेलच असे अजिबात नाही.पण ही प्रतिभा त्याची स्वतःची वैचारिक आणि मानसिक क्षमता नक्कीच संपन्न बनवते हे तेवढेच खरे.
       कोणताही लेखक ,कवी आपल्या लिखाणातून जेंव्हा व्यक्त होतो,तेंव्हा त्याची प्रत्येक लेखन कलाकृति ही त्याची सवतःची अशी एक स्वतंत्र नवनिर्मिती असते.ती पुर्णत्वाला नेल्यानंतर त्याला मिळणारे आत्मसुख /आत्मानंद हा कुठल्याही एककात न मोजता येण्याजोगे असा अलौकिक असतो .त्याच्या या आत्मसमाधानापुढे इतर कोणत्याही गोष्टी क्षुल्लक असतात.तो कधीच 'कमाई'करण्यासाठी लिहित नसतो . आत्मसुखाच्या रुपाने त्याला मिळणारा मोबदला हा सर्वोच्च स्थानी असतो.हेच समाधान साध्य करण्याच्या ध्येयाने प्रेरित होत त्याची प्रतिभा त्याच्या लेखणीतून पाझरत रहाते.
        *नंदिनी म.देशपांडे*
nmdabad@gmail.com
✍✍✍✍✍✍✍✍✍✍✍✍✍✍✍✍✍
  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा