सोमवार, २० नोव्हेंबर, २०१७

*सुखानंद*


    आहो,काय आहे हा वात्रटपणा ? आपली नातवंड लग्नाच्या वयाची होताहेत आता!तुम्ही हे काय खुळ घेतलंय डोक्यात?शोभतंय का तुम्हाला? सुनिता काकू,सुदर्शन काकांकडे मिश्कील नजरेने बघत गालातच हासत हासत बोलत होत्या.....आपली मुलं काय म्हणतील?याचा काही विचार केलात का तुम्ही?थोडं तरी जिभेला हाड असू द्यात.....
     'सुनी डार्लिंग,चल ,पुढच्या रविवारी जाणार आहोत आपण हनिमुनला', हे वाक्य काकांच्या तोंडून बाहेर पडले रे पडले नि सुनिता काकूंच्या तोंडचा पट्टा हा अस्सा चालू झाला होता....
     या उभयतांच्या लग्नाला कांहीच दिवसांत पण्णास वर्षे पुर्ण होणार होती....काकांना वाटले,आता पैशाची कांही चणचण नाहीए आपल्याला.दोन्हीही मुलं आपापल्या संसारात चौकोनी आकारात व्यवस्थित स्थिरावलेली आहेत.दोन्ही संसारातील आठही हात त्यांच्या स्वतःच्या बौध्दिक कौशल्याच्या जोरावर खोर्याने पैसे आेढत आहेत....नातवंड योग्य मार्गावरून वाटचाल करत आहेतच....
    मुलांना आवश्यक तेंव्हा त्यांच्या अडचणीच्या  काळात जमेल तशी आर्थिक मदत करून त्यांची नड आपण भागवलेली आहेच....आता मात्र त्यांना आपल्यावर अवलंबून रहाण्याची गरज नाही लागत,आपले बँक बॅलन्स ही बराच मोठ्ठा आकडा दाखवत आहे....नोकरीतून निवृत्त होताना शेवटचा पगार उचलला त्याच्या दिडपट आकड्यात आता पेन्शन जमा होते आपल्या अकाउंटवर,आणखी काय हवे? आकडा वाढता असला तरी खर्च असा कितीसा लागतो आम्हा दोघांना?दोघांचे आरोग्यही आहे उत्तम काय हरकत आहे ? थोडे लांब पर्यंत फिरुन यावे नि नव्याने ताजेतवाने व्हावे....असा पुर्ण विचार करत ,सुदर्शन काकांनी ,सुनिता काकूंच्या एकाहत्तरीत प्रवेशाच्या वाढदिवसाला सिंगापूरची दोन तिकिटं दाखवत सरप्राईज दिले....आणि फ्रेश होण्यासाठी का वयाचे बंधन लागते ?असा प्रतिप्रश्न काकूंना विचारत आपल्या म्हणण्याची री पुन्हा आेढली....
      गेल्या पन्नास वर्षांत काकांना आपल्या बायकोचा स्वभाव मुख:पाठ झालेला होता.कोणत्याही गोष्टीवर दुसर्याच क्षणी रिअॅक्ट होणं या काकूंच्या स्वभावाला अजून औषध काही सापडलंच नव्हतं. चालू असणारा काकूंचा तोंडपट्टा सवयी प्रमाणे काका शांतपणे एेकून घेत  गुणगुणत होते....
     मेर्रा नाम चून चून चू
      चून चू चू बाबा चून चू चू
      रात चाँदनी मै आैर तू
     हैल्लो मिस्टर हाऊ डू यू डू.....
आणि सुनिता काकूंकडे मिश्कील नजरेने बघत होते....
       सुनिता काकू का जाणत नव्हत्या ,आपल्या पति देवांचा स्वभाव?प्रचंड हौशी,हरहुन्नरी,नि तेवढाच मिश्किल.पण, तरुण वयात जबाबदारी आणि नौकरीच्या आेझ्याने दबला गेला होता तो.नव्हे,काकांनी जाणीवपूर्वक मुरडच घातली होती त्याला....संसारात कमवणारे त्यांच्या एकट्याचेच दोन हात.बहिणीच्या लग्नाची ,आईच्या तब्येतीची नि मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी .होताच कुठे पैसा आणि वेळ हौस मौज करावयाला....
      अंथरुणाला पाठ टेकल्यावर रात्रीच्या निरव शांततेत विचार करताना काकूंच्या डोळ्या समोरून आपले पुर्विचे दिवस झर्रकन सरकत गेले....याच विचार वलयात त्या मनोमन बोलत्या झाल्या ",तोंडचा पट्टा चालवला तरीही केवढी खूष झाले होते मी ,यांच्या बोलण्याने सकाळी!ह्यांना थांगपत्ताही लागू दिला नाही ....!"
     दहा बारा दिवसांत जायचेच आहे सिंगापूरला तर तयारीला लागायलाच हवे उद्या पासून.आपणही अश्शी झक्कास करू ना तयारी, की तेथे आपल्याला बघून यांनी तोंडात बोटे घातलीच पाहिजेत...
     दुसर्याच दिवशी आपल्या महिला मंडळातील एका मैत्रिणीला सोबत घेऊन, त्यांनी आपल्या स्वतःसाठी व काकांसाठी भरपूर खरेदी केली.जिन्स बरमोडा काय नि प्लाजो टी शर्टस् शॉर्ट शर्ट्स काय!शूज,पर्स बॅग्ज अशी एक ना अनेक वस्तूंची खरेदी! आपली मुले टूरवर जातात ना तेंव्हा ती करतात अगदी तश्शी खरेदी! त्यातून नवीन मेकअप कीटही सुटला नाही....जात्याच सुंदर असणाऱ स्वतःच सौंदर्य पार्लर मध्ये जाऊनआणखी परिपूर्ण बनवत,काकांनाही जेंट्स पार्लर मध्ये जाऊन येण्याविषयी सुचवले अप्रत्यक्षपणे.....
    वय लपवता येत नव्हते तरीही,मन मात्र तारुण्यात भिजून चिंब होत होते दोघाही नवरा बायकोचे.चाणाक्ष सुनेच्या नजरेने हे बरोब्बर हेरले .तिने सुहास,आपला नवरा याच्या लक्षात त्यांच्यातील हा बदल आणून दिलाच. त्यांच्यातील या बदलाचे त्यालाही काहिसे आश्चर्य च वाटले.
     सुहासने सुध्दा आपल्या आई बाबांच्या मनात फुललेल्या या प्रसन्नतेच्या फुलबाज्यांचा वेध घेण्याचा आडून आडून प्रयत्न चालवलाच.आॅनलाईन माहिती नुसार बाबांनी सिंगापूरसाठी फ्लाईटची दोन तिकिटं बुक केली असल्याचे सुहासच्या लक्षात आले.मग मात्र आई बाबांची  गोल्डन ज्यूबली मॅरेज अॅनिव्हरसरी आहे काहीच दिवसांत,  या आठवणीने लख्ख प्रकाश पडला त्याच्या डोक्यात...त्या दोघांनाच एवढ्या हौसे मौजेची अनुभूती घेताना बघण्याची कधी सवयच नव्हती ना मुलांना ,म्हणून थोडे वेगळे वाटत होते एवढेच ! पण करु देत त्यांना एन्जॉय , तरुण वयात नाही जमले म्हणून काय झालं ? आता आलंय ना मनात त्यांच्या ,अगदी पंचेवीस वर्षांनी तरुण वाटत आहेत दोघेही .त्यांच्या मनांच्या या उत्साहात आपणही कांही तरी भर घालत  योगदान द्यावयास हवे हे सुहासने निश्चित केले.
     सुनिताबाई आणि आणि सुदर्शन काकांचाच मुलगा तो...त्यांच्या प्रमाणेच गुप्तता ठेवत,आपली बहिण सुनयना आणि बायको सुरुची यांच्या मदतीने त्याने आईबाबांना त्यांच्या टूर ला निघावयाच्या पुर्व संध्येला एक पार्टी आयोजित करण्याचा बेत आखला...
     शनिवारची सायंकाळ खूपच लगबगीची ठरली.सुनयना आपल्या पति समवेत नियोजित ठिकाणी निमंत्रितांच्या दिमतीला हजर होती.बच्चे कंपनींनी मोठ्ठा केक ऑर्डर करत आजी आजोबांच्या मधुर आठवणींच्या फोटोंचे कोलाज बनवले होते ,स्वादिष्ट असा डिनरचा मेन्यू आॅर्डर केलेला होताच....
     इकडे घरी कोणत्याशा मोठ्या खास कार्यक्रमाला जायचे आहे ,असे सांगत सुरुचीने सासुबाईंना नवी कोरी अशी त्यांच्या आवडीची  रंगसंगती असणारी पैठणी नेसावयास देत छान पैकी तयार होण्यविषयी सुचवले. सुहासनेही बाबांना आग्रहाने थ्री पीस सुट घालावयास भाग पाडले...ठरलेल्या वेळी नियोजित अशा सुंदर व्हेन्यू वर चौघेही पोहोंचले.मुलांनी दिलेल्या या सरप्रार्ईज गिफ्ट चा स्विकार करत ,सुनिता काकू व सुदर्शन काका यांनी परस्परांच्या गळ्यात सुगंधित फुलांचे हार घातले.आपल्या डोळ्यांच्या भाषेतच पुन्हा एकदा एकमेकांच्या प्रेमात नव्याने  पडल्याचे खुणावले.आपली मुले नातवंडे आणि मित्रमंडळ यांच्या साक्षीने परस्परांवरील प्रेम आयुष्याच्या या शेवटच्या ट्प्प्यात केक कापत कापत व्यक्त केले....
    मुलांच्या या सुंदर मेजवानीचे स्वागत व स्विकार कृतकृत्ततेच्या भावनेने करत उभयतांच्या चेहर्यावर हर्षोल्हासाच्या समाधानाचे तेज लख्खपणे झळकत होते. नातवंडांनी बनवलेल्या कोलाजमध्ये बारकाईने न्याहळत दोघेही जुन्या आठवणींमध्ये रमले....सर्वांसोबत गप्पा गोष्टी करत स्वादिष्ट जेवणाचा आस्वाद घेत ,सार्यांच्या शुभेच्छांचा आनंदाने स्विकार करत असताना दोघांच्याही आनंदाला पारावार राहिला नाही अगदी.
     घरी परतताना गाडीच्या पळत्या चाकांबरोबर उभयतांच्या मनात विचारांचे चक्र सुध्दा वेग घेत होते.आपल्या अवती भोवती तसेच मित्र मंडळींच्या अनुभवातून मुलगा सुन यांच्या वागणूकीतून निर्माण होणार्या धास्तीने भांबाऊन गेलेली मंडळी ,त्यांचे अनुभव यांच्या तुलनेत आपण किती तरी नशिबवान आणि पुण्यवान आहोत ! खरंच आपल्याला किती गुणी मुलं जावई आणि सुनेसहित मिळाली आहेत.या साठी ईश्वराचे आभार मानावेत तेवढे कमीच असे च काहींसे होते त्यांचे भावविश्व त्या वेळी....देवही सार्यांच्याच पदरी अशी गुणी बाळं का घालत नसावा?जन्म दात्यांना सांभाळण्या साठी कायदा बनवण्या ईतपत का निकड भासावी शासनाला? का अशी परिस्थिती यावी? अशा अनेक प्रश्नांची मनात चालू असणारी मालिका घर जवळ आल्याने खंडित झाली.
     आपल्या समाधानाच्या परिपूर्णतेच्या आस्वादा बरोबर मनात चालणार्या प्रश्नावलीची मांदियाळी भंग करत सुहास कांहीतरी बोलू बघतोय हे लक्षात आले त्यांच्या.सुहासने थायलंड आणि मलेशिया येथे जाण्याची आणखी दोन तिकिटं आईबाबांच्या हातात देत त्या देशांनाही भेटी देऊन यावे असे सांगितले त्यांना.आणि सुरुची व  मुलासह पण्णासाव्या मॅरेज अॅनिव्हरसरी साठी आईबाबांना शुभेच्छा दिल्या.सुरुचीने धावपळ होणार नाही अशी त्यांची पंधरा दिवसांची रुपरेषा आखत केलेल्या मांडणीचे नोटपॅड त्यांना सुपुर्त केले.
     ठरलेल्या म्हणजे दुसर्याच दिवशी सायंकाळी जावई,मुलं,नातवंडं,सुनबाई असे सर्वच जण उभयतांना सि आॅफ करण्या साठी एअर पोर्टवर आले होते.सर्वांचा निरोप घेताना सुनिता काकू आणि सुदर्शन काकांना गहिवरायला झाले नकळतपणे....आपल्या पुण्याईच्या या सुखानंदाला मनोमन हात जोडत त्यांनी सुहास्य मुद्रेने नजरे आड होई पर्यंत मुलांना टाटा केला....
  
    * नंदिनी म.देशपांडे.
nmdabad@gmail.com
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

1 टिप्पणी: