हौसेला खरंच मोल नसते?
**********************
लेखिका ---
ॲड.नंदिनी म.देशपांडे.
९४२२४१६९९५..
छ.संभाजीनगर.
"हौसेला मोल नसते", असे आपण पूर्विपासून ऐकत आलो आहोत...काही अंशी ते
बरोबर असतेही...
हौस म्हणजे आवड, आपल्या दैनंदिन आयुष्यात प्रत्येक जण आपल्या मनात असणाऱ्या आवडी निवडी वेळ मिळेल तश्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतो.
काही आवडी पूर्ण करण्यासाठी पैसा आवश्यक असतो...
पण तरीही आपल्या ऐपतीनुसार आपण प्राधान्यक्रम ठरवत त्या जास्तीत जास्त पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतोच ना...
मनात कायमचे घर करुन बसलेल्या आवडींचे रुपांतर हौसेमध्ये केंव्हा होऊन बसते हे
आपल्यालाही कळत नाही...
याच हौसेचा पाठलाग करत आपण ती पूर्ण करण्यासाठी मिळणाऱ्या संधीची वाट बघत रहातो...कधी कधी अख्खे आयुष्यही खर्ची होत जाते या साठी...
पण हल्ली पैसा मिळवण्याचा मुख्य उद्देश हा आपल्या असणाऱ्या हौसे मौजेसाठीच आहे आणि तो
माझ्या कमाईचा आहे, मग मी तो माझ्या "ऐंजॉयमेंट"साठी खर्च करणार ही भावना वाढीस लागलेली दिसते...
मान्य आहे हा विचार पूर्णपणे अयोग्य आहे असे अजिबात नाहीच..पण जीवन जगत असताना आपला सभोवताल, आपली माणसं, आपलं कुटुंब यांचा विचार करणंही अपरिहार्य असते.
आज आपल्या हाती महिन्याच्या शेवटी पैशाचा मोठ्ठा आकडा येत आहे हे दिसत असेल तरीही त्या आकड्याची किंमत दिवसेंदिवस कमी होत चालली आहे हे विसरुन चालणार नाही...त्यामूळे आपली हौसमौज, आपला पैसा आणि आपला प्राधान्यक्रम यांचा ताळमेळ साधता येणं फार गरजेचं असतं...
"यालाच आपण अंथरुण बघून पाय पसरणे",म्हणतो.
उदाहरणच द्यावयाचे झाले तर,आजच्या काळात विवाह विधी हा केवळ सोहळा न रहाता एक अफाट खर्चिक असा "इव्हेंट" झालेला आहे...
हौसेखातर आपण यावर कितीतरी मोठी रक्कम खर्च करत जातो...हे खरंच एवढे गरजेचे आहे का?आपले बजेट
त्यामूळे कोलमडणार तर नाही ना?किंवा इतरांनी असे केले तर आपणही असेच केले पाहिजे, अशी तुलना किंवा स्पर्धा करणं आवश्यक आहे का?या आणि इतर अनेक गोष्टींवर विचार करणं नितांत गरजेचं आहे असे वाटते.
आज विवाह,त्यातील विधींपेक्षा भव्यदिव्यपणा, दिखाऊपणा, त्यातील मनोरंजनाच्या कार्यक्रमांचे अतीरेकी प्रदर्शन आणि इतर तांत्रिक गोष्टींवर अवाढव्य खर्च,यांवर एवढेच नव्हे तर
जेवणाच्या पदार्थांतील वाया जाण्या इतपत असणारी विविधता यांच्या निकषावर
होताना दिसतात. या बाबी किती तरी महागड्या आहेत याची कल्पनाही अंगावर शहारे आणते हे वास्तव सत्य आहे...पण तरीही आपण या सर्व गोष्टी करण्यासाठी बळी पडतोच आहोत!
आपल्याजवळ पैसा आहे म्हणून?की आपल्या श्रीमंतीचे प्रदर्शन करावयाचे म्हणून?याचाही विचार केला गेला पाहिजे...
लग्नाचा इव्हेंट पार पाडण्यासाठी हल्ली बर्याच साधनांची आवशयकता असते.ही एक चैन आहे आणि कितीतरी लाखांची उलाढाल यातून होत जाते...या प्रत्येक उद्योगांची साखळी ही परस्परांवर अवलंबून असते...प्रत्येकाला एका इव्हेंट मधून मोठा बिझनेस मिळतो...त्यांचे फावत जाते पण ग्राहकाचे खिसे रिकामे होत जातात त्याचे काय?
आयुष्यभर खस्ता खाऊन जमवलेली पै पै दोन दिवसांच्या एका इव्हेंट मध्ये रिकामी होऊच शकते...
"ॠण काढून सण साजरा करण्याची" आपली परंपरा नव्हे....
आपल्याला मार्केट मिळावे म्हणून हे उद्योजक अनेक राज्यांतून परंपरा "उसन्या", आणत आपल्या महाराष्ट्रीयन विवाह परंपरेत घुसवत आहेत...त्यात त्यांचे फावते पण ग्राहकाच्या तोंडाला फेस येवू शकतो...
तसे बघितले तर, केवळ देवाब्राम्हणाच्या, अग्नीच्या आणि काही थोडक्या लोकांच्या साक्षीने पूर्ण करावा असा अगदी साधा असणारा आपला महाराष्ट्रीयन विवाह विधी आहे...
कायद्याच्या चौकटीत नोंदणी पध्दतीने करावयाचा असेल तर तो आणखीनच सोपा आहे...नवरा-नवरीने स्वखुषीने दोन्ही बाजूंच्या दोन दोन साक्षीदारांसमोर विवाहासाठी असणाऱ्यां नोंदणीपत्रावर सह्या करुन आमचे परस्परांशी लग्न झाले आहे, आम्ही आजपासून नवरा बायकोच्या नात्यात बांधले गेलो आहोत,हे मान्य करणे होय....
एवढे सगळे साधे सोपे असताना यातील साधेपणा केंव्हाच लोप पावला आणि विधींनी सोहळ्याचे रुप घेतले...सोहळा एक वेळ ह्रद्य होऊ शकतो...त्याला भावनेच्या ओलाव्याचा गंध असतो...म्हणून सोहळा होणेही असंयुक्तिक नाही,असे आपण म्हणूया, पण "इव्हेंट" मध्ये रुपांतर खरंच तोंडचे पाणी पळवणारे आहे...
शिवाय इव्हेंट मध्ये भावनांपेक्षा दिखावा, देखावा, कृत्रिमपणा आणि तंत्रज्ञान याच गोष्टींचे पारडे जड असते..
मला वाटतं या साऱ्या गोष्टींचे प्रत्येक आईवडिलांनी, लग्नाळू मुलामुलींनी खूप सखोल परीक्षण करावे...
आपल्याजवळ भरभक्कम पैसा असेल तरीही हा नाहक खर्च कसा टाळता येईल याचा विचार करावा...
आपल्याजवळ असणारा पैसा इतर अनेक जीवनोपयोगी बाबींवर, सामाजिक बांधिलकी जाणत त्यावर काही प्रमाणात खर्च करावा. उद्या वाढत्या संसारातील वाढत्या खर्चासाठी, तसेच गरज पडल्यास आपल्या आणि कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्य संवर्धनासाठी तरतूद म्हणून गुंतवणूक करावा.....
आपल्या हक्काचे घर घेणं ही गरजही आपल्या मनातील हौस असू शकते...त्यासाठीही भरपूर रक्कम हाताशी असावी लागते...
थोडक्यात सांगण्याचा मुद्दा हा आहे की, आयुष्यातील एकाच" इव्हेंट " वर भारंभार पैसा खर्च करण्या ऐवजी, दूरदृष्टिने विचार करत त्या पैशाची सुयोग्य गुंतवणूक करावी आणि आपल्या आयुष्यातील आनंद कायम टिकवण्यासाठी असणाऱ्या पैशांचा योग्य विनियोग करत
सुखाने जगावे...
हौसेला मोल नसते हे जरी खरे असले तरीही,हौसेसाठी आपण किती रकमेचा विनियोग करावा?याचे सूत्र मनात तयार करावे...म्हणूनच हौसेला मोल असते...
असावयास हवे असे माझे मत आहे...
आर्थिक विनीयोगाचे सूत्र मनात तयार असले तर, यामूळे
आपल्या जीवनातील आनंदाचे गणित जुळवण्यास नक्कीच मदत होईल यात शंकाच नाही...
🌹🌹🌹🌹🌹