मंगळवार, २८ मे, २०२४

संस्कृती.

🌸 *संस्कृती* 🌸
             

©️ लेखिका.
ॲड.नंदिनी म.देशपांडे

      *संस्कृती*,शब्द केवढासा,पण त्यातील अर्थाची व्याप्ती आणि त्यामूळे त्याला आलेले जडत्व (घनता)महानच म्हणावी लागेल!

     संस्कृती हा शब्द प्रत्येक देशाच्या सामाजिक,सांस्कृतिक, आर्थिक, शैक्षणिक, धार्मिक,आध्यात्मिक,
क्रिडाविषयक अशा सर्व स्तरांना स्पर्श करणारा आहे.किंबहूणा, या प्रत्येक स्तरांचे काही मूलभूत वैशिष्ट्ये,काही महत्त्वपूर्ण संकल्पना, त्यांचा प्रत्येकाचा गाभा  एकत्रित केल्यानंतर जो एक जुडगा तयार होतो त्याला आपण "संस्कृती" असे नामाभिधान देऊ शकतो.

     या विश्वाच्या पाठीवर जेंव्हा जेंव्हा एखाद्या भूभागाचा शोध लागला;आणि त्या भूमीला ज्यावेळी मानवाचा स्पर्श झाला, त्या वेळेपासूनच त्या संबंधित भूभागावर एका विशिष्ट प्रकारच्या संस्कृतीच्या उदयाची सुरुवात होत असते असे म्हणता येते.

    प्रत्येक भागाची, आपल्या सोयीसाठी, आपण प्रत्येक देशाची असे येथे म्हणूया.
तर प्रत्येक देशाची संस्कृती ही कमी अधिक प्रमाणात लवचिक असते. या संस्कृतीवर परिणाम करणारे घटक किती प्रभावी आहेत? त्याचा तेथील समाजावर कितपत परिणाम होतो? यावर खूपसे बदल अवलंबून असतात. जी गोष्ट व्यक्तिसापेक्षतेशी जवळचा संबंध ठेवून असते, त्या गोष्टींमध्ये बदल होणे ही अपरिहार्य बाब आहे. कारण 'बदल',हे काळाचे एक गृहित तत्व आहे.जिथे जिथे जिवंत माणसाचे अस्तित्व आहे ,तेथे येथे बदल अनिवार्य आहेच. किंबहुणा ;बदल हे जिवंतपणाचे द्योतक आहे.

    आपल्या भारतीय संस्कृतीचा विचार केला गेल्यास; या बाबतीत होत जाणारे बदलही आपल्या पिढीने सुद्धा याची देही याची डोळा होत असताना बघितले आहेत, आजही आपण ते बघतो आहोत. हे सत्य नाकारता येत नाही. 

    आपण आपली    भारतीय संस्कृती ही,आपले सणवार, लग्न पद्धती, रूढी परंपरा, सामाजिक, धार्मिक तत्त्वज्ञान, कला, क्रीडा प्रकार, इत्यादि ईत्यादि अशा अनेक म्हणजेच दैनंदिन आयुष्य जगत असताना आपल्याला स्पर्श करणाऱ्या अनेक अंगांच्या माध्यमातून ,त्यांच्या नजरेतून ती आपण अवलोकन करत असतो. कळत-नकळतपणे तिचे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरण होत जाते. पण, मला वाटतं; हे सारे घडत असताना ज्या पिढीने संस्कृतीच्या मूल्यांचे अनुभव घेतलेले आहेत; ते चांगले किंवा वाईट असे दोन्ही स्वरुपाचे असू शकतात.त्यांचे मूल्यमापन करुन;त्यात सकारात्मक बदल घडवत/ सुचवत ते पुढच्या पिढीकडे हस्तांतरित करावेत.

     मुल्यांच्या  बदलां मध्ये लवचिकता असणे फार गरजेचे आहे .म्हणजे,जुने टाकून देत,नव्याचा स्वीकार करताना आपण या दोहोत सुवर्णमध्य साधावयास हवा. म्हणजे मूळ संस्कृतीचा पूर्णपणे ऱ्हास होणार नाही; आणि नव्याची नाळ जुन्याशी बांधलेली राहील. होय ना?

    मी सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे; संस्कृती या शब्दाची व्याप्ती फार मोठी आहे.पण आपल्या जगण्याच्या प्रत्येक क्षेत्राशी ती बांधिलकी ठेवून आहे. म्हणूनच या प्रत्येकाशी निगडीत गोष्टींचीही अशी एक वेगवेगळी संस्कृती असतेच असते.

    धार्मिक आणि कलेच्या क्षेत्रात तर ती प्रामुख्याने दिसून येते. एवढेच नव्हे तर प्रत्येक धर्माची  उदाः हिंदू,मुस्लीम, सिख वगैरे यांची वेगवेगळी अशी एक संस्कृती असते. 

    भारतीयांची खाद्यसंस्कृती, वाचन संगीत संस्कृती या सुद्धा फार महान आहेत.

    आपण आपल्या भारतीय संस्कृतीचा; ऐतिहासिक ठेव्यांतून, पुस्तकातून,चालीरीती रुढी परंपरा यांच्या माध्यमातून त्यांचा अभ्यास करु शकतो.हा अभ्यास करत, त्याच्या मूळ गाभ्यापर्यंत पोहोचू शकतो.

    आज इंटरनेट आणि दळणवळणाच्या अत्याधुनिक साधनांमुळे जग जवळ आले आहे.आपण कांहीच तसांत लिलया सातासमुद्रापार पोहोंचतो. परत येऊही शकतो. आपल्या सोबत आपल्या संस्कृतीचेही वहन आपण करत असतो.किंवा परदेशातून येणाऱ्या लोकां बरोबर त्यांची संस्कृती आपल्या देशात येऊन पोहोंचते. यातून दोन्ही बाजूच्या संस्कृतींमधील चांगली मुल्ये स्वीकारणं निश्चितच स्वागतार्ह आहे. 'आपलं तेवढं चांगलं आणि परकीयांचं सर्व वाईट', हा दृष्टिकोन बदलणे महत्वाचे. यातूनच परस्परात दोन्ही संस्कृतीची देवाण-घेवाण घडते.यामुळे आपल्या संस्कृतीचा जगभर प्रसार होण्यास मदतच होईल.

      प्रत्येकाच्या डोळस नजरेतून, वागण्या-बोलण्यातून, आवर्तन व अवलोकनातून संस्कृती प्रवाहित रहावयास मदत होते.या संस्कृती रुपी पाण्याचा प्रवाह प्रदूषित न होता दिवसेंदिवस तो नितळ शुद्ध कसा होत जाईल याचे भान प्रत्येकाने ठेवावयास हवे. संस्कृतीच्या नावाखाली अंधश्रद्धा किंवा अंधानुकरण यांना स्थान नसावे. त्यांचे उच्चाटण झालेच पाहीजे. जास्तीत जास्त शास्त्रीय दृष्टिकोन ठेवत,संस्कृतीची देवाण-घेवाण, संस्कारांच्या माध्यमातून आपण संक्रमित करावयास हवी.ही प्रत्येक पिढीची जबाबदारी आणि कर्तव्य आहे. हे काम करत असताना प्रत्येक संस्कृतीचा आदर पूर्वक सन्मान करावयास हवा. कारण वैविध्यतेने नटलेल्या आपल्या भारत देशात ;या तत्वांना अनुसरुन एकता कायम ठेवण्यास मदत होते. 

    अर्थातच हे सारं कृतीत उतरवण्यासाठी  प्रत्येक जण तेवढ्याच सशक्त मानसिक प्रगल्भतेच्या हवा. हेही विसरता कामा नये. अशी प्रगल्भ वृत्ती आपल्यात उतरवण्यासाठी नक्कीच कष्ट घ्यावे लागतील. प्रसंगी विरोध स्वीकारावा लागेल. बंडही करावे लागेल कदाचित. पण यातून हाती जे लागेल ते नक्कीच खूप समाधान देणारे, मनःशांती बहाल करणारे असेल एवढं नक्की.

चला तर मग,

रक्षिण्या संस्कृती आपली

सिध्द होऊ या एकीने

मानवतेचा धर्म पाळूनी

सन्मान करुया आदराने.....

😊🙏🏻

संवाद.९४२२४१६९९५.
औरंगाबाद.
🌹🌹🌹🌹🌹🌹

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा