*नेपाळ सहल*
---------------
लेखिका--
ॲड.नंदिनी म.देशपांडे.
भारताच्या उत्तरेतील चार धाम यात्रेला, नेपाळच्या पशुपतीनाथाचे दर्शन घेतल्याशिवाय पुर्णत्व नाही असे मानले जाते...हेच पुर्णत्व सिध्दिस नेण्यासाठी आम्ही नेपाळ सहल ठरवली होती...
आणखी दुसरा हेतू म्हणजे, हिमालयाच्या पहाडी रांगांचे विलोभनीय दृश्ये डोळ्यात साठवून घेणे...काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, अरुणाचल प्रदेश या भारताच्या राज्यांंमधूून आणि थोडाफार भुतान या देशातून हिमालयाचे सौंदर्य निरखल्या नंतर, नेपाळ मध्ये हिमालयाचे अत्त्युच्च शिखर बघणे याची उत्सुकता शिगेला पोहोंचली होती अगदी....
मनाने ठरवले की प्रत्यक्षात कृती होण्यास वेळ लागत नाही आणि तसेच झाले....
मुंबईहून विमानाने अडीच तासात आम्ही काठमांडूच्या "त्रिभुवन " इंटरनॅशनल एअरपोर्ट वर उतरलो...क्षेत्रफळाने लहान असले तरीही विमानांची गर्दी खूप होती तेथे....जगभरातून देवदर्शन आणि ट्रेकिंग साठी येणारे पर्यटक यामूळे जवळ जवळ सर्वच प्रमुख देशांची कनेक्टिव्हिटी आहे या देशाशी....आणि म्हणूनच पाहिल्या पाहिल्या माझ्या मनात आले, "अरे हे तर बसस्टँड सारखेच विमानस्टँड वाटतंयं....
त्यातही नेपाळमधील डोमेस्टिक एअरपोर्ट काही कारणास्तव बंद होते...त्या विमानांचीही गर्दी याच इंटरनॅशनल त्रिभुवन एअरपोर्टवर झालेली होती...असो..
काठमांडू नेपाळच्या राजधानीचे शहर...तसे मध्यम आकाराचे पण शांत शांत वाटणारे...कोणतीही धावपळ नाही फारशी गर्दी नाही पण जुन्या भागांत मात्र स्थानिक आणि परदेशी पर्यटकांच्या भरपूर गर्दीत वावरणारं...
तेथील ऐतिहासिक वारसा स्थळं जी तेथील राजघराण्याशी संबंधित आहेत अशी सारी याच भागात आहेत आणि त्यांची रचना, कोरीव नक्षीकाम, त्यातील भव्यदिव्यपणा त्यातील आर्किटेक्चर या गोष्टी खूप निरिक्षण करण्यासारख्या आहेत...त्या भागांना, तेथील अशा लाकडी कलाकुसर असणाऱ्या या ईमारतींना "दरबार" असे संबोधले जाते....
नेपाळमधील हॉटेल मध्ये प्रवेश करताच तेथील स्थानिक गाईड ने पर्यटकांचे स्वागत गळ्यात झेंडूच्या फुलांचे हार घालून केले,हे थोडे गमतीशीर वाटले आणि मनालाही भावले....शिवाय हॉटेल मध्ये स्वागतासाठी प्रवेशव्दारातच दोन्ही बाजूंनी दोन स्त्रीया येणार्या प्रत्येक पर्यटकला कपाळी कुंकुम तिलक लावण्याचा सोपस्कार पार पाडत होती...तेंव्हाच लक्षात आले की, या देशावर हिंदू संस्कृतीचा फार मोठा प्रभाव आहे...आणि ते गर्वाने आम्ही हिंदुराष्ट्र आहोत असे सांगतात...
गाईड च्या सांगण्यावरून, नेपाळच्या राजाचे कुलदैवत आपली महाराष्ट्रातील तुळजाभवानी आहे, तिचे मंदिर दरबार परिसरात राजाने बांधले आहे... हे ऐकून तर हा देश आपल्या भारतासारखाच आहे याची कल्पना येऊ लागली...गेल्या काही वर्षांत नेपाळमधील राजघराण्यातील यादवीमुळे राजेशाही संपुष्टात येवून त्यांनी स्वतःला प्रजासत्ताक राष्ट्र घोषित केलेला आहे....आता तेथील राजा एका सामान्य माणसासारखे आयुष्य जगतो....
आपण अगदी आपल्या भारताच्या शेजारीच आलो आहोत हे पावलोपावली जाणवत राहिले...
मध्यम उंचीची, मध्यम बांध्याची, अपर्या नाकाची नेपाळी माणसं चमकदार गौरवर्णीय आणि हसतमुख आहेत...
नेपाळमधील पर्यटन स्थळं ही जवळपास तेथील धार्मिक स्थळांशी जोडली गेलेली आहेत...या निमित्ताने निसर्गाची सैरही होते...
काठमांडू
---------
काठमांडू हे राजधानीच्या शहराबरोबरच तीर्थक्षेत्रही आहे. अशी दंतकथा सांगितली जाते की,पशुपतीनाथ हे भारतातील केदारनाथ ज्योतिर्लिंगाचा प्राण आहे...म्हणजेच कंठापासून डोक्यापर्यंत चा भाग हा पशुपतीनाथ आणि पाठीकडून पार्श्वभाग म्हणजे केदारनाथ....दोन्हींचे दर्शन झाले म्हणजे, संपूर्ण ज्योतिर्लिंगाचे दर्शन झाले असे मानले जाते...
अक्षय्यतृतियेच्या दिवशी पशुपतीनाथाच्या दर्शनाचा योग आला आणि आम्ही समाधानाने भरुन पावलो....
हेमाडपंथी काळ्या पाषाणाचे मंदीर फार प्राचीन आहे...सहामुखी पशुपतीनाथाची मुर्ती, मनुष्य रुपात (भगवान शंकर यांच्या रुपाने)येथे वास करते....काळ्या पाषाणातील मुर्ती बघता क्षणीच आपले पटकन लक्ष वेधून घेते...
उर्ध्व आणि पाताळमुख आपल्याला दिसत नाही पण चार दिशेने चार असणारी शिवाची मुखकमलं बघून मन प्रसन्न होते...चारही मुखांचे दर्शन चार दरवाजातून घ्यावे लागते...या निमित्तानेच मंदीर प्रदक्षिणाही साधली जाते...
दर्शन झाल्यानंतर कृतकृत्य तेचे समाधान चेहर्यावर विलसत आपण बाहेर पडतो....
कुमारीमाता मंदिर.
----------------
काठमांडूतच दरबार स्क्वेअर भागात कुमारी माता मंदीर आहे...मला वाटले आपल्या कन्याकुमारी सारखे असेच काहीसे असेल..
पण नव्हे या दरबारात तिसऱ्या वर्षांपासून पासून ते बाराव्या वर्षांपर्यंत वय होईस्तोवर अक्षरशःएका जीवंत कुमारीका मुलीला बसवले जाते...दर बारा वर्षांनी म्हणजे ह्या मुलीस ऋतुप्राप्ती होण्याच्या वयापर्यंत देवाला वाहिलेलीच असते...त्यानंतर दुसर्या मुलीची निवड होते...ती विशिष्ट समाजाची आणि बरीच कठिण अग्निपरीक्षा घेवून तिची निवड होते...
माझ्या मनात आले,तिला तिसऱ्या वर्षी तिचे स्वतंत्र मत असे काय असणार?पालकांच्या हातची कठपुतळी ती नंतर नऊ वर्षे देवीला वाहिलेली कठपुतळी बनून रहाते...
तेथे तिला सामाजिक मान सन्मान भरभरुन मिळतो, तिचे शिक्षण वगैरेची जबाबदारी तथाकथित मठाधिकारी घेतात पण तिचं बाल्य मात्र ती हरवून बसलीए,स्वातंत्र्य कुलुपात बंद आहे आणि सामान्य माणूस म्हणून जगण्याच्या तिच्या वाटाच बंद केल्या आहेत असे सारखे वाटत राहिले...
तेथील गाईडने या विषयीच्या प्रथा परंपरा किती कर्मठ आहेत याचे विवेचन सांगितले...तेथील नागरीकही हा कर्मठपणा पाळणारे आहेत...प्रथा परंपरेत कोणी मोडता घालत नाहीत असे सांगत होता...पण हे सारेच अमानवीय आणि क्रुरपणाचे आहे असे मला सारखे वाटत राहिले...
या कुमारी मातेचे (मुलीचे)खिडकीतून घेतलेले दोन तीन सेकंदाचे मुखदर्शन अक्षरशः आपले काळीज चिरुन जाते....मनातून आपण या प्रथेचा निषेध करतच या दरबाराच्या बाहेर पडतो...
भैरवनाथाचा पुतळा.
-----------------
या मंदीर परिसरातच चौकामध्ये एक विशाल असा भैरवनाथाचा अक्राळविक्राळ स्वरुपाचा विशाल पुतळा दिसून आला....
एखाद्या नागरिकाने गुन्हा केलेला असेल,पण मी असा गुन्हा केलेलाच नाही असे ठामपणे जेंव्हा म्हणायचा तेंव्हा, त्याला या पुतळ्यासमोर बसवत असत, आणि खरे बोलण्यास भाग पाडत, असे सांगितले गेले...कारण येथे येऊन खोटे बोलल्यास त्याच दिवशी संबंधित गुन्हेगार गतप्राण होतो अशी प्राचीन काळापासून येथील लोकांची धारणा होती....
नेपाळमधील राजसत्तेने पूर्विपासूनच जेष्ठ नागरीक आणि आर्थिक विपन्नावस्थेत असणारे नागरीक यांच्या धार्मिक भावनांचा आदर केलेला असावा हे लक्षात येते...कारण भक्तपूर दरबारात या लोकांच्या सोयीसाठी केदारनाथ, बद्रीनाथ, व्दारका या मंदिरांच्या वास्तुरचनेसारखीच वास्तू(मंदिरं)उभी केलेली दिसून येतात...
बुधानिलकंठ मंदीर.
------------------
एका तलावात शेषशायी विष्णूंची निद्रिस्त अवस्थेत विशालकाय मुर्ति आहे...तलावात तरंगत्या अवस्थेत ती दुरुनही पटकन दिसेल अशी आहे...मंदिर स्वरुपात कोणतेही बांधकाम येथे केलेले नाही....
निलकंठ नावाच्या एका म्हातार्या (बुढा) व्यक्तीस ही मुर्ती तलाव खोदताना दिसून आली,आणि तिथेच त्याची प्रतिष्ठापनाही केली गेली...म्हणूनच हे "बुधानिलकंठ" विष्णूभगवान होत, अशी अख्यायिका ऐकण्यास मिळाली...
माउंट एव्हरेस्ट दर्शन.
------------------
आमच्या नेपाळ सहलीचे आणखी एक उद्दिष्ट म्हणजे,हिमालयिन रेंजेेसमधील सर्वात उंच असणारा, 8848.8M
(29031.69FT) असणारे"सागरमाथा" हे शिखर बघणे....
ट्रेक करत जाणे ही पूर्णपणे अशक्यप्राय बाब आहे, पण विमानातून का असेना मस्त सैर करत ह्या हिमालयिन रांगा प्रत्यक्ष बघून डोळ्यात साठवून घेऊ या, ही सुप्त ईच्छा प्रत्यक्षात अवतरली....हवामानानेही साथ दिली आणि आमची ही ईच्छा फळाला आली...
360 अंशातून विमान वळवून पहिली रांग जेंव्हा दिसली तेंव्हा मनाला झालेला अत्यानंद आश्चर्यकारक पणे शब्दांतून व्यक्त झाला आणि मग मात्र एक एक शिखर मनावर भुरळ पाडत गेले आमच्या....
" सागरमाथा " बघितले आणि सहलीचे चीज झाले आपल्या!अशी प्रचिती आली...
खरोखरच हा अनुभव आणि आनंद व्यक्त करावयास शब्द अपुरे पडतील!डोळ्यांनी अनुभव पिऊन घेणंच सार्थ ठरेल यासाठी असे माझे मत आहे...
काठमांडू दर्शनाने देवदर्शन आणि निसर्गदर्शन दोन्हीही साध्य झाले हे मात्र खरे....
चितवन.
----------
मी मघाशीच म्हणाले तसे, नेपाळमधील धार्मिक ठिकाणं आणि निसर्ग दोन्ही एकमेकांच्या हातात हात घालून चालताना दिसतात....
मनोकामना देवी मंदीर.
-------------------
काठमांडूहून चितवनला जाताना आम्ही केबल कारने पंधरा-वीस मिनिटांचा प्रवास करत या देवीचे दर्शन घेतले...नावाप्रमाणेच मनातील ईच्छांची पुर्ति करणारी ही देवता आहे असा तेथील लोकांचा विश्वास आहे....
या निमित्ताने आपल्याला नेपाळमधील पहाडी प्रदेशाचे विलोभनीय सौंदर्य न्याहाळता येते....
' चितवन नॅशनल पार्क' हे तेथील एक विस्तीर्ण असे घनदाट जंगल आहे...त्यातून जीपसफारी चांगली दोन अडीच तास केली आम्ही, विविध प्रकारचे पक्षी निरीक्षण झाले, मयुराचे सौंदर्य जवळून बघितले....हरणं, काळवीट, गेंडे, कोल्हा ह्या प्राण्यांचे दर्शन झाले पण पण, एकतरी वाघोबा बघावयास मिळाला असेल तर शपथ! अशा वेळी वाटतं माणूस वाघाला घाबरतो का वाघ माणसाला?
चितवनच्या आमच्या हॉटेल मध्ये नेपाळमधील अनेक आदिवासी जमातींपैकी एक असणारी "थारु",जमातीच्या लोकांचा लोकनृत्याचा कार्यक्रम आयोजित केला होता...अतिशय लयबद्ध, तालबद्ध आणि थरारक असे हे नृत्य आपल्याला बघताना खिळवून ठेवते...
नाचणारी पाऊले, हातातील काठ्यांचा ताल आणि लयबध्दता तसेच नृत्याची गती यांचा या नृत्यात घातलेला ताळमेळ
केवळ थक्क करणारा!
पोखरा
--------
पोखरा हे थोडे थंड हवेचे ठिकाण....एका गावातून दुसर्या गावी जाताना निसर्ग निरिक्षण करणं हे माझ्या आवडीचं...पहाडी प्रदेशातून जाताना तेथील पहाडांची वैशिष्ट्य, वनस्पती जंगल निरखत जाताना असं वाटतं आपण माणूस किती क्षुल्लक घटक आहोत या निसर्गाचा ! निसर्गाचा पर्यायाने पर्यावरणाचा ह्रास करणं हे काम फार पटकन जमतं माणसाला....तिथे त्याच्या बुध्दिची कीव कराविशी वाटते...असो...
तर नेपाळच्या पहाडांमध्ये,जंगलांमध्ये मला कडीपत्त्याची कितीतरी झाडं अच्छादलेली दिसली...
त्याच बरोबर रुद्राक्ष या फळांच्या विपूल वनराईने
हिरवंगार पांघरुण ल्यालेली ही पहाडं मला उत्तरांचल मधील पहाडांशी साधर्म्य सांगणारी जाणवली...
माझ्या उत्तरांचल चारधाम प्रवास वर्णनातही अशा पहाडांचा उल्लेख आला आहे...
अशाच पहाडांमधून वाहणाऱ्या फेवा लेक,जो जॉर्ज नावाच्या नदीमूळे बनलेला आहे....येथून
बोटिंग करत,आम्ही विंध्यवासिनी देवतेचे दर्शन घेतले...निसर्गाशी तादात्म्यता साधली...
आणखी एका लेक मध्ये लाकडी नावेमधून सफर अरताना मी तर अगदी जीव मुठीत घेवून बसले होते...कारण मला पाण्याची प्रचंड भिती वाटते आणि ती नाव सारखी मला, मी लहानपणी कागदाची नाव बनवून पावसाच्या पाण्यात सोडत असायची ती आठवण करुन देत होती...अगदी तशीच पण ही लाकडाची होती...
अन्नपूर्णा पर्वत रांगांमधून दिसणारे सौंदर्यपूर्ण सुर्योदयाचे क्षण अनुभवण्यास आम्ही भल्या पहाटेच गुलाबी थंडीत त्यांच्या जवळपास जाण्याचा प्रयत्न केला पण,आभाळात तळ ठोकून बसलेल्या ढगांनी हा आमचा हेतू साध्य होऊ दिला नाही...
गुप्तेश्वर महादेव गुफा
-------------------
या प्रवासात आम्ही गुप्तेश्वर महादेव केव्हज् बघितल्या...खरोखर थक्क करणारा पॉईंट आहे हा!
देवी वॉटरफॉल नावाचा एक सुंदर धबधबा आहे बर्याच उंचावरुन फेसाळलेल्या पाण्याचा गाज घालणारा स्रोत आपण येथे बघतो...नंतर तो खाली कुठे जात असेल?याचा कोणताच अंदाज बांधता येत नाही...
आपण या धबधब्याच्या पाण्याच्या मार्याने बनलेल्या एका गुहेत प्रवेश करतो....तेथे मोठी महादेवाची पिंड आहे एवढी जमिनीच्या पोटात आहे की जणू पाताळात जात आहोत की काय असा भास होतो....या पिंडीवर शंकरांचे जटाधारी मुखदर्शन होते आणि आपण आणखी खाली जात रहतो तेंव्हा परत आपल्याला धबधब्याच्या पाण्याची गाज ऐकू येते आणि तो दिसावयास लागतो!मध्येच लुप्त झालेला धबधबा एवढ्या खालच्या लेव्हलला येऊन बघण्यातील थ्रील काही ओरच आहे....एक चांगला पॉईंट बघितल्याचे समाधान निश्चित मिळते...
याशिवाय एलेफंट ब्रिडींग अँड ट्रेनिंग सेंटर तसेच इंटरनॅशनल माऊंटेरिनिंग म्यूझियम ही ठिकाणंही निश्चित भेट देण्याजोगी आणि नेमकी माहिती समाधान निश्चित मिळते...
एकूण आमची नेपाळसहल,थोडी धार्मिक, थोडी धाडसाची आणि निसर्गाच्या सान्निध्यात नेणारी अशी खूप समाधान देणारी आणि ठरली यात वादच नाही...