**आनंदी गोपाळ**
"अहो, पण आता हे सर्व वाया गेले ना, मी नाही आता कोणावर उपचार करू शकणार,कोणाचे प्राण वाचवू शकणार."
चित्रपटाच्या शेवटी शेवटी डॉक्टर आनंदीबाईंच्या तोंडून हे वाक्य ऐकले आणि पोटात खोलपर्यंत कालवाकालव झाली. केवळ नावापुरताच आनंद सामावलेल्या आनंदीबाईंच्या आयुष्यात दुःखच भरलेले होते. हे लक्षात आले.....
एकोणिसाव्या शतकातील उत्तरार्धाचा तो काळ. स्त्रियांच्या बाबतीत तर अंगावर शहारे आणणारा. आनंदीबाईं च्या रुपाने प्रातिनिधिक उदाहरण प्रत्यक्ष सिनेमातून चित्रित करत त्या काळात अक्षरशः नेऊन सोडले प्रेक्षकांना या सिनेमाने.
पंधरा वर्षांनी मोठा असणारा बीजवर नवरा .सात आठ वर्षांचं सवतीचं पोर. त्यात कुटुंबातून आणि संस्कृती परंपरांमधून मनावर बिंबवलेला कर्मठ रुढींचा अभेद्य पडदा.
लग्नाची बोलणीच मुळी ''मी माझ्या बायकोला लग्नानंतर शिकवणार आहे".या वचनावर झालेली.
कुटुंबाने कितीही प्रतारणा केली पुस्तकांची, तरीही भारतात स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवण्याचं उदात्त काम आपल्या बायको पासूनच चालू करावयाचे हा गोपाळरावांचा ध्यास. कितीही क्लेशदायक असला तरीही आनंदीला अभ्यासाची गोडी निर्माण करण्यात यशस्वी ठरला.
जिद्द ठेवली की गती ओघानेच येऊ लागते. सुरुवातीच्या बळजबरीच्या राम रामाला साजेसा आनंदीचा गोपाळरावांना प्रश्र्न, जगात चिक्कार पुस्तकं आहेत.
"अजून किती पुस्तक वाचायची आहेत?"
या प्रश्नाने तिच्या मनाला जणू काही किनाराच गवसला असे म्हणता येते. आनंदीच्या मिशनरी शाळेत जाण्याचा मार्ग यामुळे तयार झाला.केवढी ती अवहेलना! केवढा अपमान सहन करणे!आणि केवढ्या त्या तऱ्हेवाईक नजरा.
"स्त्रीयांनी शिक्षण घेणे म्हणजे,व्यभिचाराचा मार्ग दाखवणे".
अशा बुरसटलेल्या संकल्पना कुरुवाळत बसणारा तो समाज. पण आपल्या सहनशीलतेचा कळस गाठत, ही आनंदी मन लावून शिकते याचे करावे तेवढे कौतुक कमी तर आहेच शिवाय तिच्या जिद्दीला मनापासून अभिवादन करावेसे वाटते.
महाराष्ट्रात निर्ढावलेल्या लोकांनी गोपाळरावांच्या कुटुंबावर बहिष्कार टाकल्यानंतर ज्यावेळी हे कुटुंब कलकत्त्याला रहावयास जातं त्यानंतर जरा तरी मोकळा श्वास घेताना दिसते आनंदी. आपल्या बाळाच्या जाण्याने आनंदीच्या शिक्षणाच्या जिद्दीला योग्य दिशा प्राप्त होते.
"माझं बाळ उपचाराअभावी गेलं तरीही इतरांची बाळं वाचावीत. त्यासाठी मी डॉक्टर होऊन दाखवणारच. आणि परदेशात जाऊन शिक्षणही घेणार."
ही आनंदीची भीष्मप्रतिज्ञा गोपाळरावांच्या मनात कायम घर करून राहते. त्या दृष्टीने उद्दिष्टापर्यंत पोहोंचण्यासाठी संपूर्ण कुटुंबाचे प्रयत्न सर्व बाजूंनी सुरू होतात. पण परदेशी जाण्यासाठी धर्मांतर करावे लागणार ही गोष्ट लक्षात आली की, आनंदी आपल्या ध्यैय्याला काहीसे बाजूला सारते.आणि
"ज्या देशात मला माझ्या धर्मासकट स्विकारले जाणार नाही, तो देश मला मान्य नाही".
असे निक्षून सांगणारी आनंदी, मोठी करारी आणि धाडसी होती. याचे प्रत्यंतर येत रहाते.
परकीयांना पण कुठेतरी भारतीय महिलेला कौतुकाची थाप देण्याची वृत्ती असू शकते.हे तेथील एका लेखात आनंदी बाईंच्या जिद्दी विषयी छापून आल्यामुळे लक्षात येते.
'डॉक्टर होणार'. या निर्णयावर ठाम असणारी आनंदी सहाजिकच आपल्या नवर्याला सोडून परदेशी शिक्षणासाठी जाण्यास धजत नाही. पण गोपाळराव सारखा कायम आपला करारी बाणा जपणारा नवरा, तिला एकटीला अमेरिकेत मेडिसिनच्या शिक्षणासाठी जाण्यासाठी भाग पडतो. तेंव्हा हा माणूस एक नवरा म्हणून आणि एकूणच समाजहित लक्षात घेता किती दूरदृष्टी ठेवून वागणारा व्यक्ती होता. हे लक्षात येते. ही दूरदृष्टी वास्तवात उतरवण्यासाठी अखंड लढा देणारे हे गोपाळराव , विधवेचा उद्धार, ऋतुप्राप्ती नंतर महिलांसाठी घालण्यात आलेले अमानवी नियम यांवरही किंचित मीमांसा करताना दिसून येतात.
गोपाळरावांसारखे समाज सुधारक त्या काळात जन्माला आले म्हणूनच आज, एकविसाव्या शतकात आपण महिला म्हणून सर्व क्षेत्रं पादाक्रांत करत आहोत.याची राहून राहून संपूर्ण सिनेमा बघत असताना कृतज्ञता व्यक्त करावीशी वाटते.
एकदा अमेरिकेत पोहोंचल्यानंतर मात्र मोकळे आकाश मिळते आहे आनंदीला.
त्यांची मनासारखा अभ्यास करत झोकून देण्याची वृत्ती खरोखर अभिमानास्पद आणि वंदनीय अशीच. अभ्यासाचा ध्यास घेऊन अमेरिकेत पोहोंचलेली ही पहिली भारतीय विदूषी, तेथील सहन न होणाऱ्या हवामानामुळे शरीराने आतल्या आत खंगत जाते. त्यावेळी जीव घेणा 'ट्यूबर क्यूलॉसिस'हा आजार तिला विळखा घालतोय हे अमेरिकेतील डॉक्टरांच्या लक्षात येऊनही नाईलाज होतो. त्यावेळी उपचारांची उपलब्धता या आजारासाठी असावयास हवी होती. हे राहून राहून वाटतं.
आपला 'पण'पूर्ण करत जेव्हा डॉक्टर आनंदीबाई गोपाळराव जोशी पदवीदान समारंभात एक भारतीय महिला या नात्याने पदवी स्विकारतात तो क्षण खरोखरच सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावा असाच होता.
भारतीय महिलांना एकोणिसाव्या शतकात शिक्षण घेत असताना किती आणि कोणत्या दिव्यातून जावं लागायचं याचं यथार्थ दर्शन या चित्रपटात घडतं.
डॉक्टर आनंदीबाई जोशी यांची भूमिका करणाऱ्या या प्रति आनंदीबाईंना बघून आपोआप शब्द उमटले मनात.
"दिव्यत्वाची जेथे प्रचिती, तेथे कर माझे जुळती."
अशा विदुषींनी त्याकाळी हे दिव्य केलंच नसतं तर आजही भारतीय महिला अशाच दुर्लक्षित उपेक्षित राहिल्या असत्या म्हणूनच गोपाळराव म्हणतात,
"वाया गेले नाहीत तुमचे प्रयत्न. तर आनंदी तुम्ही अगदी पहिली स्त्री आहात या क्षेत्रात येणारी... भारतीय स्त्रियांना आवाहन देणारी..... शिक्षणाची आणि कर्तुत्वाची क्षेत्रं काबीज करण्यासाठी ललकारी देणारी....अगदी पहिली,पहिलीच स्त्री!"
©नंदिनी म. देशपांडे.
✒✒✒✒✒✒
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा