शनिवार, २९ डिसेंबर, २०१८

भरती ओहोटी.

*भरती -ओहोटी*

लेखिका :
*नंदिनी म. देशपांडे.*

            ‘आ’  म्हणजे आनंद आणि ‘ई’ म्हणजे ईश्वर. 'आई 'या शब्दाची फोड अशी केली जाते. या अर्थाने आई म्हणजेच ‘ईश्वराला झालेला आनंद' !किती व्यापक अर्थ आहे हा !स्त्रीने इवल्याश्या जीवाला जन्म दिल्यानंतर झालेला आनंद शब्दातीतच असतो. तिच्या शारीरिक सृजनशीलतेला आलेले फुल
म्हणजे तिचे बाळ.

      आपण एखादे फुलाचे रोपटे घरातील बागेच्या कुंडीत लावल्या नंतर काही दिवसांनी त्यावर फुललेले फुल बघून आपल्याला मनस्वी आनंद होतो.  मग बाळ झाल्यानंतर आईला होणाऱ्या आनंदाची उपमा किंवा तुलनाच म्हणा ना! अगदी ईश्वराला होणाऱ्या आनंदाशीच केली जाते. हा एका आईचा सन्मानच म्हणता येईल.

     थोडक्यात आपल्याला निश्चित असे म्हणता येते की,आई आपल्या सोबत असणे, तिच्या सान्निध्यातील आपले अस्तित्व म्हणजे साक्षात ईश्वराच्या सान्निध्यात घालवलेला आपला वेळ नव्हे काय ? आपल्या बाळाची आई होणं हा निसर्गाने स्त्री जातीला बहाल केलेला नितांत सुंदर अनुभव. छोट्या जीवाला नऊ महिने उदरात वाढवणे, त्याच्या अप्रत्यक्ष अस्तित्वाच्या तिच्या उदरात होणाऱ्या खोड्या झेलणे व त्यामुळे होणारा त्रास स्वीकारत निसर्गनियमानुसार ही आई आनंदाने सहन करते. इतर शारीरिक आणि मानसिक वेदना तिला क्लेशकारकच ठरत असतीलही पण केवळ प्रसव वेदना याच तिच्याकडून आनंदाने स्विकारल्या जातात. त्यासाठी स्त्रीच्या जन्माला यावे हेच खरे !

       पण कधीकधी दुर्दैवाने कितीही  ईच्छा  असली तरीही, एखाद्या स्त्रीला काही अपरिहार्य कारणामुळे तर कधी न उमगलेल्या कारणामुळे प्रत्यक्ष शारीरिक दृष्टीने आई होऊन आईपण उपभोगता  येऊ शकत  नाही .आज मानवाने जीवशास्त्राच्या तंत्रज्ञानामध्ये विलक्षण प्रगती साधलेली  दिसून येते. म्हणतात ना, ‘इच्छा तेथे मार्ग’ तो बरोबर काढलाच जातो. किंबहूणा एखादा तरी मार्ग निघतोच.

       पूर्वी मुल ‘दत्तक' घेणे हा एकच उपाय होता. आपल्याच रक्ताचा अंश आपल्याला मिळावयास हवा. या आत्यंतिक इच्छेपायी विज्ञानाने सरोगसी हा मार्ग सुकर करून दिला आहे. एखाद्या दाम्पत्यांचे स्वतःच्याच रक्ताचे, त्या दोघांचेच जिन्स असणारा असा शंभर नंबरी सोन्यासारखा आपलाच अंश, कृत्रिमपणे बाहेर तयार करुन तो तिसऱ्या एखाद्या महिलेच्या उदरात नऊ महिन्यांसाठी भाडेतत्त्वावर वाढवणे आणि त्याचा जन्म झाल्यानंतर ते बाळ आपल्या ताब्यात घेणे. म्हणजे सरोगसी होय. तर असा गर्भ आपल्या उदरात वाढवणारी माता ‘सरोगेटेड मदर’होय.

      आपल्या भारतीय समाजातही गेल्या दहा-पंधरा वर्षात सरोगसीचे फॅड चांगलेच मूळ धरताना दिसून येत आहे.पण या तंत्राचा उपयोग खरोखर ज्यांना आवश्यकता आहे अशांनीच करुन घेणे गरजेचे आहे. आपल्याकडे केवळ गरजेखातर नव्हे तर मुलांची हौस  म्हणून सिंगल पेरेंट ,पहिले मुल  असताना सुद्धा आणखी एक हवे या हट्टापोटी काही सेलिब्रिटी, तसेच नको ते मुल प्रत्यक्ष जन्माला घालून आपली फिगर खराब करून घेणे अशी मानसिकता असणाऱ्या अनेक नट नट्या पैशाच्या जोरावर सरोगसीचा सर्रास वापर करणे पसंत करू लागले आहेत.

       गरीबी  माणसाला स्वस्थ बसू देत नाही. समोरच्या दाम्पत्या कडून या प्रकारासाठी भरमसाठ मोबदला मिळणार.या लालसेने आर्थिक दृष्ट्या दुर्बल महिला कोणताही मागचा पुढचा विचार न करता, स्वतःच्या तब्येतीचा विचार न करता सरोगेट मदर बनून जणू सरोगसी या प्रकाराचा बाजार मांडू पाहत आहेत.  अशी परिस्थिती वास्तव रूप धारण करते की काय अशी दाट शंका निर्माण झाली आहे. भारतातील विपन्नावस्थेत असणाऱ्या लोकांचा गैरफायदा पदेशस्थ नागरिकच नव्हे तर, परदेशात राहणारे भारतीय सुद्धा, भारतात राहून सरोगसी तंत्राने जन्म घेणारे बालक स्वत:चे बाळ म्हणून परदेशात घेऊन जाऊ लागले आहेत. खरंच एवढी भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे.

      हे तंत्रज्ञान विकसित होऊन बरीच वर्षे झाली तरी, एवढे दिवस कोणत्या नियमांचे बंधन नव्हते. त्याचे दुष्परिणाम लक्षात येऊ लागल्यानंतर आता आत्ताच म्हणजे या वर्षीच्या पावसाळी अधिवेशनात सरोगसी वरील नियंत्रणासाठी कायदा बनवणारे विधेयक मंजूर केले गेले. कायद्याच्या चौकटीत जर ही बंधने घातली गेली नसती तर न जाणो भारत हा सरोगसी करणाऱ्या मातांच्या संख्येच्या दृष्टीने खूप वरच्या स्थानावर जाऊन बसला असता. शासनस्तरावर या गोष्टीचा गंभीर विचार केल्यामुळे अशा पद्धतीने बाळाला जन्माला घालण्याच्या व्यापारी मनोवृत्तीच्या व्यक्तींना लगाम घातला असे म्हणावयास हरकत नाही. आपण आशा करूया की कोणत्याही पळवाटा न काढता या कायद्याचे काटेकोरपणे पालन केले जाईल.

       सरोगसी संदर्भात आत्तापर्यंत केलेले विवेचन म्हणजे, वास्तव आणि तांत्रिक बाजूचे झाले. पण भावनिक बाजूने विचार केल्यास, अशा माणसांच्या म्हणजेच सरोगसीसाठी तयार होणारे दाम्पत्य आणि ते स्वीकारणारी माता, यांच्या मनामध्ये किती वादळं उमटत असावित ,याची  कल्पनाच  न केलेली बरी. खोलवर विचार केल्यास नाईलाज म्हणून स्वीकारलेल्या या पर्यायातील दोन्ही पार्टीज जवळजवळ दहा अकरा महिने अत्यंत तणावयुक्त मानसिक अवस्थेतून प्रवास करत असणार हे निश्चित.

      मी तर असे म्हणेन की, या व्यवहारात आर्थिक उलाढाली पेक्षा सुद्धा भावनिक उलाढाल फार मोठ्या प्रमाणावर होत असणार. आपल्या म्हणजे संबंधित  नवरा बायकोच्या हाडामासाचा अंश दुसऱ्या एका परक्या बाईच्या उदरात नऊ महिने नऊ दिवस वाढवण्यासाठी पाठवणे, हे खूपच हिम्मत बांधून करावयाचे काम आहे.  आपले बाळ सुदृढ, निकोप  बनावे म्हणून संबंधित सरोगेटि स्त्रीकडे, तिचे आरोग्य,तिच्या खाण्यापिण्याच्या राहणीमानाच्या सवयींकडे, तिच्या आर्थिक कौटुंबिक परिस्थितीकडे या बाबत तिच्याशी कितीही करार केले तरी डोळ्यात तेल घालून बघणे खूपच जिकरीचे आहे. एवढे सर्व वेळेवर करूनही बाळाला जन्म दिल्यानंतर ती स्त्री बदलणार तर नाही ना?हा ताण घेऊन फिरणे म्हणजे प्रचंड सहनशक्तीचेच  काम आहे .आपल्या भारतीय समाजात कराराचे भवितव्य अतिशय तकलादू आहे हे बहुतेक करार हे मोडण्यासाठीच केलेले असतात. असा काहीसा समज आहे येथे.

      उलट बाजूने विचार केल्यास उदरात वाढणाऱ्या बाळाच्या हालचाली, त्याच्या गोड गोड नाजूक लाथा, त्याचा हवाहवासा वाटणारा स्पर्श,या सर्व गोष्टींना आई-बाबांना मुकावे लागणे ही त्यांची मानसिक घुसमटच म्हणता येईल. बाळाच्या आईला आपण प्रसववेदना सोसल्या नाहीत ही मनाला लागलेली रुखरुख कायम राहणार ती वेगळीच.

      सरोगेटि करणाऱ्या स्त्रीच्या मानसिकतेचा, भावनांचा विचार केल्यास दुसऱ्याचे मूल जरी तिच्या पोटात वाढत असेल,  मोबदला कितीही मिळाला तरीही  वाढणाऱ्या बाळाची नाळ नकळतपणे तिच्याशी जोडली जातेच. भावनांचे मोल पैशात मोजता येणे शक्यच नाही. उदरात वाढणार्‍या बाळात कितीही जीव गुंतवायचा नाही. असे ठरवले तरीही, एका स्त्रीला निसर्ग नियमांच्या विरोधात वागण्याचा पवित्रा स्वीकारावा लागतो. हे एक कटू पण सत्य आहेच.

    आपल्या स्वतःच्या कुटुंबासाठी, त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी दुसऱ्या कुणाच्यातरी बाळाचे उदरभरण आपल्या उदरातून करणे म्हणजे, आपला एक शारीरिक अवयव भाडे घेऊन पणाला लावण्यासारखे नव्हे काय?

      माणसाला त्याचा मेंदू मृत पावल्यानंतर किंवा त्याचा पूर्ण मृत्यू झाल्यानंतर अवयवदानाचे किंवा देहदानाचे काम पवित्र असे मानले जाते. किंबहुना त्यामुळे कितीतरी लोकांना जीवदान मिळते. याचे समाधान मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या आत्म्याला निश्चित मिळते. असे आपण मानतो. पण सरोगसीमध्ये एखाद्या दाम्पत्याच्या संसारात कुटुंबात आनंद, चैतन्य निर्माण करण्याचे काम ही स्त्री करत असते, हे भाग्य हा आनंद ‘याची देही याची डोळा’ प्रत्यक्ष बघणे, हे खरोखरच अवर्णनीय ठरणारेच होय .सरोगेट मदर बनण्याचा काम सुरुवातीपासूनच अतिशय समर्पणाच्या भावनेने केलेले असते .म्हणूनच अनन्यसाधारण महत्त्वाचे आणि आत्मिक आनंद मिळवून देणारे ठरते नक्कीच .

       यासाठी परिस्थिती मोबदला घ्यावयास  भाग पाडते, या स्त्रीला हा भाग निराळा. पण मोबदला घेऊनही आपले मन निगरगट्ट बनवणे ही तिची मानसिक अवस्था तिला खरोखरच कसरत करावयास लावणारी आहे खचितच.

      उपरोक्त प्रकारच्या आर्थिक उलाढालींना लगाम घालण्यासाठी व त्यातून निर्माण होणाऱ्या भावनांची भरती ओहोटी, अर्थात बाळाच्या जन्मा नंतर त्याच्यामुळे आई-बाबांना येणारी आनंदाची भरती व  जिच्या पोटी जन्म घेतला त्या आईच्या भावनांची ओहोटी. यांच्या भावकल्लोळाला बांध घालण्याच्या हेतूने, सरोगसीच्या संकेत आणि नियमांना योग्य तो आकार देत, "भारतीय सरोगसी प्रतिबंधक कायदा २०१६" तयार  करावयाचे शासन स्तरावरचे काम निश्चितच स्वागतार्ह आहे.

     सरोगसीच्या माध्यमातून मूल जन्माला घालणं हा सर्व पैसेवाल्यांचा खेळ आहे. सामान्य किंवा मध्यमवर्गीय लोकांना, कुटुंबांना अजूनही मुल दत्तक घेणे हाच मार्ग  आवाक्यातला वाटतो. त्यामुळे  मूल दत्तक घेऊन त्याचे आई-बाबा बनणे, या पद्धतीवर सरोगसीचा तिळमात्रही परिणाम होणार नाही. हे निश्चित. दत्तक प्रक्रियेतून एका मुलाचे आयुष्य घडवण्याचे होणारे कार्य अलौकिकच आहे. यातून मिळणारे समाधान कोणत्याही मापात मोजता  येणे शक्य नाही.

      थोडक्यात असे म्हणता येते, अगदीच अपरिहार्य परिस्थितीमध्ये जेव्हा टेस्ट ट्यूब बेबीचा विचार होऊ शकत नाही. अशा वेळी मूल दत्तक घेणे आणि सरोगसीच्या माध्यमातून मूल जन्माला घालणे हे पर्याय कायद्याच्या चौकटीच्या बंधनात उपलब्ध होणे.  तो स्वीकारणे. हा मानवाच्या मानसिक प्रगल्भतेचे, सुदृढतेचे आहे असे म्हणता येईल.

*©नंदिनी म.देशपांडे*

💐💐💐💐💐💐

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा