शुक्रवार, २९ जून, २०१८

*मला भावलेला युरोप* भाग सात.

* मला भावलेला युरोप*
          भाग. ७

          आल्प्स पर्वतांच्या कुशीमध्ये विसावलेला युरोपचा भाग म्हणजे ,जणू काही प्रत्यक्ष स्वर्गच. प्रत्येक ठिकाणचे आपले असे वेगळे वैशिष्ट्य वेगळेच सौंदर्य.निसर्गाचे एक वेगळेच रूप आपल्या मनावर राज्य करते. माउंट टिटलिसच्या सौंदर्य स्थळांवरुन अजून बाहेरही आलो नव्हतो आम्ही, तर दुसऱ्या दिवशीची रम्य सकाळ आम्हाला,झुंग्फ्रौ येथील निसर्गसौंदर्याचा आस्वाद देण्यासाठी आसुसलेली होती.
      मे महिन्याच्या प्रखर उन्हामुळे अंगाची लाहीलाही अनुभवत असणाऱ्या मराठवाड्याच्या वाळवंटातील आम्ही.पण 'आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन' अशी आमची स्थिती झाली यावेळी. या तीन हजार पाचशे मीटर उंच असणाऱ्या ठिकाणासाठी निघालो आम्ही त्यावेळी.
       आल्प्स् पर्वतांच्या प्रदेशात जसे आपण प्रवेश करतो तसे पर्वतांच्या पोटातून जाणाऱ्या भरपूर रस्त्यांवरुन आपला प्रवास सुरू होतो. ज्याला आपण प्राकृत भाषेत बोगदा (टनेल्स) असे म्हणतो.
      येथील निसर्गाचा कण नि कण जेवढा सुंदर दिसतो ना तेवढेच सुंदर येथील बोगदे सुद्धा. लांबच लांब अंतर स्वतःच्या पोटामध्ये सामावून घेणारे हे बोगदे बनवण्याची तंत्रज्ञान, लाईट्स आणि अर्थातच त्यांचे मेंटेनन्स बघून थक्क व्हायला होते ! स्वित्झर्लंड या देशाला, 'बोगद्यांचा देश'असेही संबोधले जात असावे असे वाटते.एवढे ते  सुंदर बनवलेले आहेत. ही  म्हणजे तेथील सौंदर्यस्थळेच आहेत. यातून होणारा प्रवासही तेवढाच रोमहर्षक ! यामुळे आपण घाटातून वळणावळणाने प्रवास करतोय असे अजिबात जाणवत नाही.अगदी सहज सुंदर प्रवासाची ही अनुभूती आहे.
    ल्यूझर्न ते झुंग्फ्रौ या प्रवासादरम्यान आम्हाला एक निसर्गाचे अप्रतिम   लेणं बघावयास मिळालं.
स्वित्झर्लंड मध्ये प्रवेशताच, बघितलेला ह्राईन धबधबा आणि नंतरचा हा,ग्लेशिअल धबधबा. दोघांचे आपले सौंदर्य, वैशिष्ट्य पूर्णपणे वेगळे.निसर्गत:च वाहात असणार्‍या पाण्याचीच ही दोन रुपं, पण एक स्वतःच्या शुभ्र पणाला आसमंतात व्यापून टाकणारा, तर दुसरा अगदी वरपर्यंत आपल्या उगमस्थानाच्या टोकापर्यंत घेऊन जाणारा, थोडासा भीतीदायक.
          ग्लेशियल वॉटरफॉल! अर्थातच अवनीचे हे लावण्य न्याहाळत न्याहाळत केलेला हा  प्रवास.मन ,वृत्ती आणि शरीर या तिघांनाही उल्हासित बनवणारा. ज्यावेळी आपण या ठिकाणाच्या  पायथ्याशी पोहोचतो ना,त्यावेळी येथे एखादा धबधबा असेल अशी पुसटशीही कल्पना येत नाही आपल्याला. पण, एक भलामोठा उंचच उंच अशा काळ्या पाषाणापासून  बनलेल्या अखंड पहाडाच्या पोटातून आपण काही अंतर लिफ्ट ने तर,काही अंतर उंच पायर्‍यांनी वर चढू लागतो. अजूनही पाण्याचा आवाज नाही की, त्याच्या अस्तित्वाच्या खुणाही नाहीत. असे चांगलेच भयावह वातावरण असणारे हे ठिकाण. केवळ पाषाणात झिरपत जाणारा ओलावा आणि त्यातून निर्माण होणाऱ्या निसरडे पणावरुन स्वत:लाच सांभाळत सांभाळत वरती चढताना आपण पहाडाच्या अगदी वरच्या टोकावर अंधार कोठडीत जातो आहोत असे वाटते. तेथून मग कुठून तरी येणारी पाण्याची धार जेंव्हा आपल्या भेदरलेल्या डोळ्यांना दिसते ना, तेव्हा नि:शब्द व्हायला होते. निसर्गाच्या या रूपाला बघून आपण स्तिमितच होते.
        कुठून तरी पहाडाच्या एका छोट्या कपारीतून सूर्यप्रकाशाचा झरोका दिसतो, तेवढाच काय तो दिवसाची वेळ आहे हा सांगणारा पुरावा.वरती छोट्या असणाऱ्या या धारेच्या मागोवा घेत घेत आपण खाली जेंव्हा उतरत जातो, त्यावेळी पहाडाच्या कडेकपारीतून मिळेल त्या मार्गाने छोट्या छोट्या झऱ्यांना सामावून घेत घेत खाली उंचावरुन आपटत पडणारा पाण्याचा आसुरी नाद करणारा असा हा प्रवाह बघितला.आणि निसर्गाचं हे अद्भुत विश्व जवळून बघितल्याचे समाधान मनाला भरून राहिले.
    आत्तापर्यंत मी माझ्या आयुष्यात बघितलेल्या सर्व धबधब्यांमध्ये मध्ये सर्वात भयानक वाटणारा पण  अफलातून असा हा ग्लेशिअल धबधबा!
       एवढा मोठा गड चढत बघितलेला धबधबा पाहून आम्ही  जेंव्हा गड उतरलो, त्यावेळी मोहीम फत्ते झाल्याच्या आविर्भावात आम्ही युरोपातील सर्वात उंच ठिकाणी जाण्यासाठी 'ल्यूटरबर्न' या ठिकाणी आलो. येथूनच 'कॉगव्हील'नावाची ट्रेन आम्हाला सर्वात उंच असणाऱ्या, (3500 मीटर) युरोपातील स्टेशन वर घेऊन जाण्यासाठी सिद्ध झालेली होती. अशा वर चढत जाणार्‍या अद्भुत रेल्वेमध्ये बसताना फार आनंद वाटला. आपल्याच रेल्वे ट्रॅक सारखाच याही रेल्वेचा ट्रॅक असतो.पण दोन चाकांच्या मध्ये कात्रेकात्रे असणारे आणखीही एका आगाऊ चाकाची आणि त्यासाठी दोन रुळांच्या मध्यभागी एक कात्रणे असणाराच अगाऊ बेल्ट असतो. अशी खास रचना आहे या रेल्वेची. जेणेकरून चढत असताना उतारावर रेल्वेचा तोल जाणार नाही.
         पुन्हा एकदा बहुविध प्रकारचं लेणं लेवून तेवढेच शांत, सोज्वळ अवनीचं बहरलेलं लावण्यं तिच्या या अप्रतिम रुपड्या कडे लक्ष वेधून घेत होतं. जाताना सुरुवातीला हिरवाई च्या  पानाफुलांच्या नक्षीने विणलेली, त्याला शुभ्रधवल अशा जलधारांच्या उंचावरून पडणाऱ्या कंगोर्ऱ्यांचे काठ असणाऱ्या शालूने सजलेली ही अवनी, कॉगव्हील ट्रेन जशी जशी उंचावर चढू लागते,तशी हिरव्या रंगाचा शालू बदलून ती चंदेरी रंगाच्या भर्जरी शालू नेसून तयार झाली आहे असे वाटत होते. सर्वदूर पसरलेल्या आकाशाला गवसणी घालणारे आणि शुभ्र धवल रंगांने सजलेली  शिखरं! त्यांच्याशी स्पर्धा साधण्याचा प्रयास करणारे आकाशातील ढग. या पार्श्वभूमीवर डोकावून खाली बघणारे आकाशी रंगाचे आभाळ !काय विलक्षण विलोभनीय दृश्य दिसत होते ते! संपूर्ण अवकाशावर जणू या शुभ्र पांढर्‍या हिम राजाचे राज्य होते.
        युरोपातील सर्वात उंचावरील रेल्वे स्टेशन वर पोहोंचण्यासाठी लागणारा दीड तासाचा हा वेळ म्हणजे आमच्या डोळ्यांना ही एक मनोहरी अशी पर्वणीच होती.अगदी उंच पॉइंटवर पोहोंचल्यानंतर तर आपण स्वप्नात तर नाहीत ना? अशी शंका येण्याइतपत या ठिकाणची अप्रुपाई जाणवत होती.येथेही तापमान मेंटेन करत बांधलेले हॉल्स आहेत. खूप जणांना या ठिकाणी श्वासाला  अडचण येऊ शकते.आम्हाला ही शक्यता गृहित धरून पूर्वीच कापूर वडीचे पॅक देण्यात आले होते.असा काही त्रास जाणवू लागला तर तो हुंगण्या साठी  याचा उपयोग करा अशा सूचनां सह.
     खरोखर जेंव्हा आम्ही प्रत्यक्ष अगदी उंचीवर होतो त्यावेळी अतिशय देखणा सर्व बाजूंनी केवळ शुभ्र बर्फ बर्फ आणि बर्फच होता! नजरेच्या टप्प्यात न मावणारा, अथांग सागरासारखा पसरलेला! शुभ्रतेचा कळस! डोळ्यांना सुद्धा भूल पडेल की हा बर्फ आहे की धूकं? तेथे थोडा हिमवर्षावही  चालू होताच. अगदी अविस्मरणीय दृश्य आणि अर्थातच त्यातून मिळणारा मोदही तसाच!
         वेगवेगळ्या पहाडांवर व्ह्यू बघण्यासाठी चे केलेली पॉईंट्स ची रचना तर अतिउत्तम.बर्फाळ पहाडांच्या रांगा यातील दऱ्याही बर्फाळ आणि पडणारा पाऊस ही बर्फाचाच! अवर्णनीयच होतं सार. कितीही ठरवले,तरीही खूप जास्त वेळ थांबू शकतच नाही आपण येथे. नाही म्हटले तरी हवेमध्ये ऑक्सिजनचे असणारे कमी प्रमाण आपल्याला थोडेसे घाबरवून सोडतेच. त्यानंतर आम्ही आलो बर्फाच्या महालात. दोन पहाडांच्या कपारीत बनवलेला महाला मध्ये. बर्फात बनवलेल्या शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना म्हणता येईल. येथे अखंड अशा बर्फाच्छादित पहाडाच्या पोटात, वेगवेगळे प्राणी पक्षी यांचे मनोहरी पुतळे बनवलेले दिसून येतात. याबरोबरच एवढ्या उंच ठिकाणी पोहोचण्यासाठी झालेले प्रयत्न व  त्या मागचे तंत्रज्ञान काय आहे? यांची माहिती पुरवणारे प्रदर्शनही होते तिथे.या सर्व बाबी खरोखरच नि:शब्द करून थक्कच करणाऱ्या आहेत. निसर्गाचे वैविध्याने नटलेले रूप डोळ्यात साठवून आम्ही नंतर झ्यूरिच शहराकडे प्रस्थान केले.

       *भाग ७ समाप्त.*
    *क्रमश:*

      *© नंदिनी म.देशपांडे*

🗯🗯🗯🗯🗯🗯🗯🗯

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा