#आठवणीतील कविता#
या शृंखलेतली पाचवी कविता,
. "कढ"
सुप्रसिद्ध कवियित्री,
इंदिरा संत (१९१४-२०००)यांची,
"कढ"
ही कविता आज आणली आहे वाचकांसाठी....
"कढ", म्हणजे ऊकळी.हा झाला बोली भाषेतील शब्दशः अर्थ....पण कवियित्री इंदिरा संतांना,आपल्याला जाणवत असलेलं एकटेपण नकोसं वाटण्या ईतपत असह्य झालं असावं, म्हणूनच या त्यांच्या एकटेपणाच्या दुःखावेगात ही त्यांची कविता रचली गेली असावी....
ह्या एकटेपणाला अगदी कढ येईपर्यंत,तो उतू जाई पर्यंत असह्य होत,मन उद्विग्न झालं आहे हेच त्यांना आपल्या,"कढ"
या कवितेत सुचवायचे असावे...
कवियित्री म्हणतात,
माझी कुणीही निंदा केली,मला नावं ठेवली तरी,मी मात्र त्याला नेहमीच नमस्कारच केला आहे...त्याचे आदरातिथ्यच केले....कुणी आपल्या वागण्यातून माझ्याशी कितीही दुरावा निर्माण केला असेल तरी मी मात्र ते सारं विसरुन त्याचा नेहमी प्रमाणेच
सन्मानच केला आहे...
कोणीही माझ्याशी कसेही वागत गेले तरीही मी मात्र त्यांच्याशी कायम चांगलेच वागावयास हवे
माझा मान सन्मान,माझी अस्मिता,मीपण हे सारं सारं बाजूला सारुन....
कायम दुसऱ्यांकडून मी स्वतः गृहितच धरली जाते...माझ्या अस्मितेची दखल इतरांनी तर नाहीच पण मीही घेऊ नये कारण मीच साऱ्यांची मनं जपावित नेहमीच...
खरं म्हणजे,मी माझ्या आयुष्यात कितीतरी जणांची अन्नाची भूक माझ्या घासातला घास त्यांना देत भागवली आहे...कितीतरी लोकांचं दुःख जाणलंयं त्याना आधार दिलाय,त्यांचे अश्रु पुसले आहेत....
पण माझ्या मनात आज दुःखावेगाचा कढ आलाय अगदी,मला ते सहन होत नाहीए...पण माझं मन,माझं दुःख बोलून हलकं करण्यासाठी,माझे अश्रु पुसण्यासाठी मात्र माझ्याजवळ कोणीही नाही,एक तेवढे आभाळ सोडले तर...आणि मनात दाटून आलेला कढ,हे शल्य जाणून घेण्यासाठी मला साथ आहे ती केवळ या अंधाराची... म्हणूनच हा अंधार सुध्दा कवियित्रींना प्रेमळ वाटतोय...
माणसाला आपण इतरांकडून गृहित धरत जात आहोत ही होणारी जाणीव फार क्लेशदायक असते...त्यात आपलं अस्तित्व अगदीच नगण्य होत चाललंय अशी भावना निर्माण होत जाते...यातूनच एकटेपणाही वाढत जतो...नकोसा होण्याईतपतचा एकटेपणा आपोआप बाहेर व्यक्त होऊ लागतो...त्यालाच आपण कढ आलाय अगदी असं म्हणतो...
प्रत्येकाच्या आयुष्यात अशी परिस्थिती उद्भवू शकते म्हणूनच कोणाजवळ तरी 'व्यक्त'
होणं याला अर्थ प्राप्त झालाय असं म्हणावसं वाटतं...
इंदिरा संतांच्या अनेक कविता स्वानुभवाच्या दुःखावेगातून निर्माण झाल्या त्यातलीच ही एक...
प्रामुख्यानं काव्य आणि कथा लेखन करणाऱ्या या कवियित्रिचं मराठी साहित्य क्षेत्रात स्वतःच असं एक मानाचं स्थान आहे....पती नारायण संतही कवी मनाचेच!दोघांचाही एकत्रित असा,"सहवास नावाचा कविता संग्रह प्रसिद्ध झाला आणि तेंव्हापासून इंदिरा संत वाचकांच्या परिचयात आल्या....
आपली साहित्यिक कारकिर्द घडवताना त्यांनी अनेक काव्यसंग्रह आणि ललित कथा संग्रह लिहिले...अनेक पुरस्कारांच्या त्या मानकरी ठरल्या....
त्यांची आम्ही लहानपणी शिकलेली बालकविता,
"रंगरंगुल्या सानुसानुल्या
गवत फुला रे गवतफुला"
ही आजही मनात गुणगुणून जाते...
एक थोर कवियात्री म्हणून नावलौकिक मिळवलेल्या या विदुषीला विनम्र अभिवादन....🙏🏻
आज या निमित्ताने मला सांगावयास हे आवडेल की,इंदिरा संतांची नात,मुलाची मुलगी आमच्या कुटुंब सदस्यांपैकी एक आहे....याचा आम्हा सर्वांना मनस्वी आनंद होत असतो नेहमीच...
©️नंदिनी म.देशपांडे.
संवाद.९४२२४१६९९५.
🌹🌹🌹🌹🌹