*कढई*
अहाहा! काय मस्त पाऊस पडतोय. पावसाळी वातावरणातील थंडगार हवा अंगाशी झोंबाझोंबी करतीए...
अशा निवांत संध्याकाळी गरमागरम भजी तेही कांदाभजी खाण्याचा मोह न झाला तरच नवल!
हं, पण माझं "कांदाभजी", या विषयावर लिहून झालंयं,
आज मी दोन कानांची पारंपारिक "लोखंडी कढई", या विषयाला अनुषंगिक लिहिणार आहे...
खरं म्हणजे लोखंडाच्या कढईत केलेली,भजी, पिठलं, ठेचा, खर्डा, किंवा अगदी साधी
फोडणी सुध्दा फार फार खमंग लागते!जातीच्या खवय्यांना सांगणे न लगे....असो.
माझ्याकडे माझ्या आजीच्या,मोठीआई च्या संसारातील छोटीच पण फार जड अशी कानांची लोखंडी कढई आहे...मी ती फार जपून ठेवलीए आणि वापरतेही जपूनच...तिच्याशी माझं भावनिक नातं जोडलं गेलंयं ना....
लहानपणी मोठीआई च्या हातचं या कढईत लावलेलं थालीपीठ आणि वर उल्लेख केलेले पदार्थ वारंवार चाखले आहेत...शिवाय ती निमित्ताने हातात घेतली की, मोठीआई ची आवर्जुन आठवण येतेच...
तर लोखंडी आहे म्हणून तिचे महत्व अजिबात कमी होत नाही बरं का...उलट आता नव्याने, लोखंडी कढईत केलेले पदार्थ कसे आरोग्यवर्धक आहेत हे कळू लागलंयं...
पदार्थाच्या खमंगाई बरोबरच,
रक्तातील लोहाचे प्रमाण वाढवण्यात या कढईचा मोठा हात आहे...
म्हणूनच हल्ली, बिना कानाचे लोखंडी टोपले वजा कढई घेण्याचा "ट्रेंड",वाढत जातोय हे दिसतंयं...
त्या प्रमाणे मी ही एक मध्यम आकाराची टोपले वजा कढई मुद्दाम खरेदी केलीय...पण पारंपारिक कढईची तिला काही सर नाही...साधे पोहे केले त्यात, तर खाली लागले...बुडात नुसती हलकी, मग कशी असणार?
मग तर अजूनच मला माझ्या आजीच्या पारंपरिक कढईची महती वाटू लागली...
तर, असे हे कढई पुराण आता थांबवते. काळाचा महिमा कधी कोणती गोष्ट, वस्तू उजागर होतील हे सांगता येत नाही...त्यातीलच एक अशी कढई!
..... ©️नंदिनी देशपांडे.